Bluepadब्लॉग कसा लिहावा...
Bluepad

ब्लॉग कसा लिहावा...

Vinisha Dhamankar!
Vinisha Dhamankar!
29th Nov, 2021

Share


मी शाळेत असल्यापासून मला मनात येईल ते लिहून ठेवण्याची सवय होती. ते कोणाला दाखवावं असं देखील कधी वाटलं नाही. त्यामुळे जे लिहिलं होतं ते तसंच बंद वहीत बंदिस्तच राहून गेलं. नंतर जेंव्हा व्यावसायिक रित्या वर्तमान पत्र आणि नियतकालिकांमधून लिहिण्याची वेळ आली तेंव्हा विषय आणि शब्द यांना मर्यादा पडत गेल्या. पुन्हा एकदा जे लिहायचं ते लिहिण्यासाठी वही जवळ करत गेले. पण ९०चं दशक ओलांडलं आणि डिजिटल दुनियेत प्रवेश झाला. तेंव्हासुद्धा फार काही बदललं नव्हतं. खरं जेंव्हा जेंव्हा बदल घडतात तेंव्हा तेव्हा तो बदल हा शेवटचा असंच आपण मानत असतो. पण कॅलेंडरवर २००० हे वर्ष झळकू लागलं आणि कॅलेंडरची पानं उलटावी तशा घडामोडी तंत्रज्ञानाच्या जगात होऊ लागल्या. रोज नवीन काही तरी समोर येई, कधी कम्प्युटरच्या नव्या वर्जनच्या रूपात तर कधी मोबाइलच्या. वहीची जागा कम्प्युटरने घेतली होती. पण पुन्हा तेच. कम्प्युटरच्या वर्ड फाईल मध्ये लिहायचं आणि ते तसंच बंद करून ठेवायचं. गूगलने ब्लॉग्ज सुरू केले आणि मग मात्र विश्व बदलू लागलं. ब्लॉग्ज म्हणजे काय हे समजायलाच एक दोन वर्ष निघून गेली.


ब्लॉग्ज म्हणजे काय हे समजलं तेंव्हा इंटरनेटवर उपलब्ध असलेले ब्लॉग्ज वाचण्यात पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचण्याप्रमाणे मजा येई. तेंव्हा वाटे की हे आपलं काम नाही. मग कोणा तरी मैत्रिणीचा ब्लॉग वाचला आणि डोक्यात लख्खन प्रकाश पडला की, अरे हे तर आपण ही करू शकतो. पण हे काय वही उघडून त्यात तासन् तास लिहीत बसण्याएवढा सोपं नव्हतं. तंत्रज्ञानात बुद्धी यथातथाच असल्यामुळे “हे आपलं काम नाही” असं म्हणून तिकडे कानाडोळाच केला. पण हळू हळू तंत्रज्ञान तितकं जटिल नाही हे समजू लागलं.
पण आपण सर्व काही वहीत आणि कम्प्युटर वर लिहीत असताना ब्लॉग का लिहावा असा विचार मनात आला आणि त्याची उत्तरेही मिळाली.

  1. आपण व्यक्त होतो, आपली स्वत:ची मते, अनुभव सर्व जगातील लोकांना सांगतो.
  2. आपण जर ओरिजिनल लेख सातत्याने लिहिले तर त्यासाठी गूगल तुम्हाला पैसे ही देते.

ही उत्तरं मिळाली आणि मग ऑफिसमधल्या एका सहकार्‍याच्या मदतीने ब्लॉग साकार झाला. त्याला उचित असं नाव दिलं जे जगात अन्य कुठल्याही ब्लॉग किंवा वेबसाइटचं नसेल. मग जे काही मनात असेल आणि जे लोकांना सांगावंसं वाटे ते मी लिहू लागले. म्हणून आज मी माझ्या अनुभावातून आलेल्या काही टिप्स तुम्हाला देत आहे.

सर्वात आधी ब्लॉगचा विषय ठरवा. हे आवश्यक नाही पण तुम्हाला एक दिशा देण्यासाठी गरजेचं आहे. कारण तुमच्या विषयाप्रमाणे तुम्ही ब्लॉगला डिजाइन सुद्धा करू शकता. तुमचा ब्लॉग प्रवासासंबंधी असेल, रेसेपी, वाचन, साहित्य, राजकारण, मनोरंजन, वैद्यकीय, खेळ, तंत्रज्ञान अशा कोणत्याही विषयाचा असू शकेल. तुमचा ब्लॉग हा जगभरातील लोकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून खुला असतो त्यामुळे एखाद्याला प्रवासाविषयी वाचायचं असेल आणि तुमचा ब्लॉग अशाच विषयांसाठी असेल तर तो वाचक तुमचा ब्लॉग इंटरनेटवर सहज शोधू शकतो. एक विषय ठरवल्याने तुमच्या ब्लॉगला अधिक वाचक मिळू शकतात.

ब्लॉग लिखाणाचा उद्देश्य अधिक वाचक मिळवणे हाच असतो कारण यामुळे कदाचित तुम्ही पैसे कमवू शकता. त्यामुळे तुम्ही दुसर्‍या वेबसाईट किंवा ब्लॉगवरचं लिखाण कॉपी पेस्ट करून लिहू नये. गूगलला ह्या गोष्टी फार लवकर समजतात आणि तुमची वाचक संख्या वाढली तरी त्याला तेवढी रेटिंग मिळत नाही.

आपल्या ब्लॉगवर शक्यतो फोटो आणि इन्फोग्राफिक्स टाकू शकता. हे फोटो सुद्धा ओरिजिनल असावेत, तुम्ही काढलेले किंवा तुम्ही चितारलेले. इन्फोग्राफिक्स तुम्ही स्वत: कोरल ड्रॉ आणि फॉटोशॉप मध्ये बनवू शकता. इन्फोग्राफिक्स म्हणजे चित्र आणि / किंवा आलेखांच्या माध्यमातून लोकांना योग्य माहिती देणं. ह्या चित्रांमुळे अनेक लोक तुमच्या ब्लॉगकडे आकर्षित होतात.

गूगलच्या Blogger सह WordPress, Constant Contact Website Builder, Gator, Tumblr,  Medium, Squarespace, Wix आणि Ghost असे ब्लॉग प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही ब्लॉग बनवू शकता.Bluehost, HostGator, SiteGround, DreamHost, Cloudways, GoDaddy, A2Hosting, GreenGeeks, iPage ह्या ब्लॉग आणि वेबसाइट हॉस्टिंग साइट्स आहेत, ज्या पैसे घेऊन तुमच्या ब्लॉगला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात.

आपल्याला उत्तम ब्लॉग लिहायचा असेल तर बाकी कोणत्याही गोष्टी पेक्षा “माहिती” हे एवढे एकाच तत्व आवश्यक आहे. तुमची माहिती चांगली, नवीन आणि उत्तमरीत्या लिहिलेली असेल तर वाचक तुमच्या ब्लॉगकडे आकर्षित होणारच. गो ब्लॉगिंग...

76 

Share


Vinisha Dhamankar!
Written by
Vinisha Dhamankar!

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad