द अनप्लान्ड ट्रिप..... गोष्ट बापलेकाच्या सहप्रवासाची.
आज हा लेख परत पुन्हा आठवायच कारण म्हणजे की बऱ्याच दिवस झाले या कोरोना आणि लॉक डाऊन मध्ये कुठेच भ्रमंती करायला मिळाली नाही...भ्रमंती मला दर काही दिवसांनी आठवतेच.
असाच मागच्या वर्षी मी आणि माझ्या मुलाने मिळून केलेली सफर आठवली...ती तुमच्याशी आज शेअर करतो आहे.
तसे फिरायला जायचं म्हटलेे की मी एका पायावर तयार.मग ती ट्रिप एका दिवसाची असो की मोठी.
पण ट्रिप म्हटले की प्लॅनिंग, तिच्यासाठीची खरेदी आणि बरीच तयारी.हो पण आमची ही ट्रिप काही ठरवलेली प्लान्ड ट्रिप नव्हती.
निमित्त होते माझ्या मावसभावाचे लग्न जे होते जळगाव ला.तसे जळगाव ला जाण्याचा योग पहिल्यांदाच आला.
बार्शी पासून जळगाव म्हणजे खूपच आडवळणी गाव. डायरेक्ट गाडी नाही,ना बस ना रेल्वे.दोन्हीही बदलून बदलून जावे लागणार होते.त्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची गर्दी.रेल्वे रिझर्व्हेशन्स एकदम फुल्ल. वेटींग चे तिकीट मिळाले जी कन्फर्म व्हायची शक्यता
गावाप्रमाणेच आणि नावाप्रमाणेच RLWL (remote location waiting list) दूरची.
लग्न रविवारी संध्याकाळी होते.दोन दिवसात बार्शी जळगाव बार्शी प्रवास करायचा होता. प्रवास थकवणारा तर होताच पण त्यापेक्षा शिकवणारा जास्त होता.वेगळा अनुभव देणारा होता. मनात विचार चमकून गेला माझ्या मुलालाही सुट्ट्या आहेत तर त्याला सोबत घेवून जावे. हा अनुभव त्याच्या संगतीने घ्यावा.
सहज त्याला बोललो तो तर माझ्या पेक्षाही जास्त उत्साही... टूनकन उड्या च मारायला लागला.पण मनात थोडी धाकधूक होती.मी त्याला एकट्याला घेवून कधीच गेलो नव्हतो.तिकट कन्फर्म नव्हते,प्रवास जास्त होता...दगदग होणार होती.पण त्या पठ्ठ्याने म्हणजे शर्विलने या सगळ्याची तयारी दाखवली आणि सुरू झाला आमचा जळगाव साठीचा प्रवास.
उन्हाळ्याच्या दिवसांत तसाच गर्मीने धूर निघत होता त्यात गावाचे नाव जळगाव म्हणजे नावातच जाळ होता.असा धूर आणि जाळ एकत्र जणू उन्हाळ्यात शेकोटी शेजारी बसण्या सारखा अनुभव होता.
निघायचा दिवस येईपर्यंत तिकिटं कन्फर्म नव्हती आणि शेवटी झाली देखील नाहीतच.
मग ऐन वेळी ती कॅन्सल करून स्लीपर कोच जी सोलापुरातून औरंगाबाद पर्यंत व तेथून बदलून जळगाव पर्यंत मिळाली.जायचे वांदे थोडे मिटले..
रात्री ८ वाजता सुरू केलेला प्रवास १४ तासात संपला.सकाळी ११ ते रात्री ८ आमचा जळगावातील मुक्कामाची वेळ आणि परत परतीचा प्रवास तो परत तितकाच.
लग्नात दुपारचे जेवण थोडे हटके होते.राजस्थानी दाल बाटी आणि सोबतीला बैंगण चा गरगट्टा त्याला गट्टे का सागची जोड.चवीला छान,अस्सल खानदेशी चव.
मन आणि पोट दोन्ही तृप्त होईपर्यंत जेवलो आम्ही बाप-लेक.
तृप्तीची ढेकर देवून सर्व पाहुणे मंडळींशी बोलून आम्ही दोघे Avengers ना भेटायला आयनॉक्स ला गेलो.
त्यांचा एंड गेम का काय तो ३ डी मध्ये बघायला.तसा मी हॉलीवूड चित्रपटांपासून थोडा दूरच राहतो.पण बालहट्ट मला तिकडे घेवून गेला. आमचा प्रवास थोडा होता की काय म्हणून अवेंजर्सची टीम आम्हाला टाइम मशीन ने कुठल्या कुठे भूतकाळात घेवून जात होती.मी जणू सर्व प्लॅनेट फिरून आलो की काय असे मला क्षणो क्षणी वाटत होते.अडीच तासाच्या या विश्व भ्रमंती नंतर मी पुन्हा एकदाचा या पृथ्वीतलावर स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करू लागलो.
जळगाव आयनॉक्स त्या मानाने खूप थंड वाटला....
तिथला एसी आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा....असो.
संध्याकाळी लग्नाची गडबड सुरू झाली.वरातीमागे घोडे आम्ही सजून तयार होतो....नवरदेवाची वरात खूप वेळ देवाच्या मंदिरातच थांबून राहिली.
नवरा नावाचा देव आज बायको नावाच्या देवी पुढे शरण जाण्यापूर्वी खऱ्या देवाशी जणू हुज्जत घालत होता. तो देव त्याला सावधान करत होता तर हा नवरदेव हट्टाला पेटला होता.अखेर....तो क्षण आलाच...अरेच्चा म्हणजे लग्नाचा मुहूर्त जवळ आला असे म्हणायचे आहे मला.
लग्न तसे अर्धा तास उशिराने लागले त्यामुळे आम्ही तात्काळ परतीच्या प्रवासाला लागलो.रात्री ८ वाजता सुरू केलेला प्रवास जागोजागी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे बराच लांबत होता आणि खड्ड्यांमुळे ती वाट आमची जणू वाटचं लावत होती.असो जे मनाला वाटलं ते बोललो वाट्टेल ते नाही.
३६ तासांतील २६ तास प्रवास....
आम्ही बापलेक दोघांनी एकत्र अनुभवला होता.हा प्रवास आमच्यावर जणू खूप हसला आणि थोडा रुसला होता.....झालेल्या दगदगी मुळे रुसला असे म्हटले मी.पण ही ट्रिप आम्ही दोघांनी खूप खूप एन्जॉय केली.तुम्हाला ही आवडेल का आपल्या छकुल्या सोबत अशी ट्रिप काढायला....मग उशीर कशाला?
चलो बॅग भरो और निकल पडो......
डॉ अमित.
२० मे २०१९.