Bluepadमुलीला जगू द्या, ती तुम्हाला जगवेल...
Bluepad

मुलीला जगू द्या, ती तुम्हाला जगवेल...

Tanaya Godbole
Tanaya Godbole
6th Oct, 2020

Share

मध्यंतरी एका भोजपुरी सिनेमा पदर्शित झाला होता. `पांचाली'. भोजपुरी असला तरी भलताच गाजला होता. त्याला कारण होतं ते त्याचा विषय आणि त्याची मांडणी. वर्षानुवर्षे स्त्री भृणहत्या झाल्यामुळे भिलपूर या गावात स्त्री उरतच नाही. त्याच गावात नाही तर आजूबाजूला अनेक गावात स्त्री नसतेच तरी किंवा अगदी एक-दोनच असतात. त्यामुळे भिलपुरच्या रहिवाश्यांमध्ये असलेल्या फक्त पुरूष गावकर्‍यांमध्ये आपापल्या वंशवृद्धीचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी त्यांना निश्चितच एका स्त्रीची आवश्यकता असते. दूरच्या एका गावात एक विवाह योग्य मुलगी आहे असं या सर्व गावकर्‍यांना कळतं. त्यातलं एका कुटूंब त्या मुलीला आपल्या घरची `लक्ष्मी' करण्यात बाजी मारतं. पण प्रश्न येतो तो त्या कुटूंबातील ६ मुलांपैकी नेमकी कुणाशी त्या मुलीची गाठ बांधायची याचा. शेवटी कुटूंबपमुख मोठ्या मुलाशी तिचा विवाह लावण्याचं ठरवतो. म्हणून तिथे भाऊबंदकी होते, हाणामारी होते. आणि ठरतं की ती मुलगी या सहाही मुलांची `बायको' होईल. पण त्या आधी कुटूंब प्रमुख असलेला `बाप' त्या मुलीला `आजमावेल'. `फिर वो सबके लिए परोसी जाएगी' असा आदेश देतो. एका मुलाशी करायचं म्हणून थातूरमातूर लग्न करून तिला घरी आणलं जातं. एका प्रशस्त खोलीत तिची `बडदास्त' ठेवली जाते आणि रोज, अष्टौप्रहर ती या सर्व कोल्हयांचं खाद्य बनत राहते. तिला दिवस जातात `मूल नेमकं कोणाचं?' यावरूनही वाद होतात. आणि एवढं सगळं होऊन अक्कल न आलेल्या या बुरसट मेंदूना तिच्या पोटीही पुन्हा `मुलगाच' हवा असतो. आता तिला प्रश्न पडतो की, `मुलगाच झाला तर, सहा नवरे आणि एक सासरा या सात जणांच्या वर आणखी एकाची तर भर पडणार नाही ना?'


मन विषण्ण करणारी ही कथा चित्रपटात आहे तोपर्यंत ठीक आहे, प्रत्यक्षात घडली तर...? स्त्री भृणहत्या ही समस्या आपल्या देशात निर्माण झाली हीच मुळात आश्चर्याची गोष्ट आहे. इतक्या देवी-देवता, मातृदेवता, गावदेवी, कुलदेवी असतानासुद्धा स्त्रीच्या जन्मावर असं बंधन घातलं जाणं घडतंच कसं?

खूप बुरसटलेल्या परिस्थितीतून समाजाने स्थित्यंतर करत स्वत:ला परिवर्तीत केलंय पण अजून त्याचा म्हणावा तसा परिणाम झालेला नाही. `मला मुलगाच होणार आणि मुली शेजार्‍याला’' ह्या मानसिकतेने आता घृणास्पद रूप घेतलंय. अन्यथा आपल्या पोटच्या गोळ्याला कुत्र्यांसमोर टाकताना आई-वडील इतके निगरगट्ट कसे होऊ शकतात? मुलीला आज कायद्याचं सर्व प्रकारचं संरक्षण मिळालं आहे, तरीही मुलगी का नको? आई हवी, बहिण हवी, मैत्रिण हवी, बायको हवी पण मुलगी नको, का?

मुलगी ही आनंदाची एक सुंदर लकेर आहे, हास्य फुलांची बाग आहे. निसर्गाचा लाडिक आविष्कार आहे. ती ज्याच्याकडे नाही त्याला हे जीवन कसं कळेल. मुलीला जगू द्या ती तुम्हाला जगवेल.

गेल्या काही वर्षात ‘मुलीला जगू द्या’ असा संदेश अनेक माध्यमातून देण्यात आला आणि जनगणनेत त्याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं. २००१ मध्ये संपूर्ण भारताचे मुलगा मुलगी गुणोत्तर दर १००० मुलामागे ९३३ मुली असा होता. तो २०११ मध्ये ९४३ असा झाला आहे. १००० मुलांमगे ७०० मुली ह्या गुणोत्तरापासून झालेला हा प्रवास निश्चितच दिलासा देणारा आहे. पण अजूनही समान नाही. केंद्र सरकारचं ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या मोहिमेने खूप फरक पडला आहे. याचं प्रतिबिंब २०२१ मध्ये होणार्‍या जनगणनेत दिसेल.

भृणहत्या हे एक पातकच आहे. शिवाय निसर्गाचं चक्र मोडलं तर तर त्याला पूर्वपदावर आणायला निसर्गच समर्थ आहे. पण तो भडकणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी.

34 

Share


Tanaya Godbole
Written by
Tanaya Godbole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad