Bluepadसंयमाचे चार दिन सर्व मिळून जगूया
Bluepad

संयमाचे चार दिन सर्व मिळून जगूया

Vinisha Dhamankar
Vinisha Dhamankar
16th May, 2020

Shareरोज सकाळी उठून तो हॉस्पिटलला निघे, बछडी त्याची खिडकीमधून टकामका बघे....
आठव पूर्वीची तिच्या डोळ्यांमध्ये साठे, आठवणींचा हुंदका तिच्या कंठामध्ये दाटे....
बाबा येईल परतून आज लवकर घरी, आई समजावी तीस स्वत: रडू लागे जरी....
आई सांगत बसते गोष्ट बाबाच्या कामाची, बाबा वाचवतो जीव सेवा करतो रुग्णांची....
बाबा रोज तपासतो मरणप्राय माणसाला, औषधाचे डोस देतो दूर करतो रोगाला....
बाबा रुग्णांनी नेहमीच वेढलेला असतो, रुग्णही त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहतो....
आज कोरोनाने केले सर्व जगाताला मुके, बाबा विसरून जातो तुझे घ्यावयाचे मुके....
लोक हतबल झाले सार्‍या जगतात आता, देव ईश्वर सरले, डॉक्टरच बनले त्राता....
एका एका जीवितला वाचवीत आहे बाबा, कोरोनाच्या फैलावावर आहे मिळवीत ताबा....
पण त्याचीच प्रकृती त्याच्या ताब्यामध्ये नाही, विषाणूचा हल्ला रोखणे त्याच्या हातामध्ये नाही....

त्याने प्रयासही केले तरी कमीच पडेल, एक लहानशी चूक आणि आजारी पडेल....
शासनाने त्याचा सुद्धा जरा विचार करावा, डॉक्टरांना सुद्धा थोडासा आराम मिळावा....
सर्व जणांना जसा प्रिय त्यांचा जीव आहे, आम्हालाही आता आमचा बाबा हवा आहे....
रात्रंदिवस राबती तिथे मावशी अन् मामा, त्यांनाही भेटू दे जरा त्यांच्याही पिल्लांना....
रोज मृत्युचं तांडव आणि लोकांची नाराजी, माणसातल्या देवाची अशी विटंबना व्हावी? ....
एका शवाच्या शेजारी एक रुग्ण झोपवताना, त्यांना आनंद का होतो असे हाल झेलताना? ....
लोक वाचवावे आधी की शव हलवावे आधी, तुम्ही करा याचा न्याय काही बोलण्याच्या आधी....

शासनाची दिरंगाई लोटे मृत्युच्या दरीत, तुम्ही डॉक्टरवर जाता का हो हल्ले करीत? ....
शोभा डॉक्टरांची नाही आपल्या राष्ट्राची होते, जिथे डॉक्टर हतबल तिथे सेवा पराभूत होते....
त्याचा पांढुरका कोट आज उदासीन झाला, त्याच्या सेवेवर जेंव्हा तुमचा प्रहार हो झाला....
माझे बाबा तसे नाही जसे तुम्ही हो समजता, त्यांचं कर्तव्यच आहे हे तुम्हीही मानता....
थोडा संयम बाळगा, थोडं सहकार्य करा, डॉक्टरच्या कौशल्यावर थोडा भरवसा करा....
तुम्हासही माहीत नाही हे सरणार कधी, माझ्या बाबाचे कर्तव्य सांगा सरणार कधी? ....
ते तेंव्हाही जाणार जेंव्हा तुम्ही सुखी असाल, त्यांच्या सेवेला खंड कधी नाही पडणार ....
या संकटाचा सामना सर्व मिळून करूया, संयमाचे चार दिन सर्व मिळून जगूया ....
संयमाचे चार दिन सर्व मिळून जगूया, संयमाचे चार दिन सर्व मिळून जगूया....

माझी पर्यावरणावरती कविता वाचा ह्या लिंक वर -
https://www.bluepad.in/article?id=5ea027858e706c000797f40e

36 

Share


Vinisha Dhamankar
Written by
Vinisha Dhamankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad