Bluepadआधार
Bluepad

आधार

उज्ज्वल कोठारकर
उज्ज्वल कोठारकर
5th Oct, 2020

Share

आधार
मालतीबाई शरदचं पत्र घेऊन किती तरी वेळा वाचत होत्या.पत्रातला मजकूर वाचून त्यांचं मन आनंदानं भरून गेलं.डोळे समाधानाने भरून आले.त्यांचा शरद कायमचा त्यांच्या जवळ रहायला येतोय हे कळल्यावर त्या भारावून गेल्या होत्या.
मालतीबाईचा तीन खोल्यांचा एक सुंदर ब्लॉक होता.एक बेडरूम, हॉल आणि लहानसं स्वयंपाकघर.शरद आता इथं बदलून येणार म्हणजे त्याला स्वतंत्र बेडरूम हवी म्हणून त्यांनी आपलं बस्तान हॉलमध्ये हलवायचं ठरवलं.त्यांचे पलंग,मच्छरदाण्या गाद्या त्या शरद नि संध्या साठी ठेवणार होत्या.
त्याप्रमाणे त्यांनी ती खोली रिकामी केली.अण्णांना म्हणाल्या
" शरद च्या आवडीप्रमाणे त्या खोलीला आपण गुलाबी रंग देऊ"
" पण रंग नुकताच तर दिलाय आपण.पुन्हा नसता खर्च कशाला?अण्णा म्हणाले
मालतीबाईना हे पटलं नाही.नुसताच रंग नाही तर खिडक्या दारांचे पडदे सुद्धा त्यांनी नवीन शिवले. खोलीच्या रंगाप्रमाणे भिंतीवर एक सुंदर निसर्ग दृष्याचं पोस्टर विकत आणून लावलं.शो केस ला नवीन पॉलीश आणून लावलं.खोली त्यांनी पूर्ण बदलून टाकली.शेवटी अण्णा म्हणाले सुद्धा.
" शरद आपलाच मुलगा आहे.जावई नव्हे.इतकी का खोली सजवता?तो आल्यावर त्याला हवी असेल तशी तो लावेल."
"केवढा मोठा ऑफिसर आहे तो!त्याला शोभेशी खोली हवी.संध्याही श्रीमंतांची मुलगी आहे.आरामात राहिलेली.लग्नापासून फक्त चारच दिवस इथे होती.आता पहिल्यांदाच इथे राहायला येणार आहे ती."
अण्णांना हसू आलं नि मालतीबाईना मुलगा नि सून आता इथंच राहायला येणार म्हणून झालेला आनंद पाहून बरं ही वाटलं.
आता घरची जवाबदारी सूनेवर सोपवून मालतीबाई स्वस्थपणे आराम करणार होत्या.मुलाच्या सहवासात शांतपणे दिवस काढणार होत्या.सुनेला म्हणणार होत्या.
"आता एकदा नातवाचं तोंड पाहिलं आणि त्याला खेळवलं की बस्स !"
नातवाच्या नुसत्या कल्पनेने सुध्दा मालतीबाई आनंदून जात .ते मनोहर दृश्य पाहत त्या आनंदून जात.ते मनोहर दृश्य पाहत त्या दिवस मोजू लागल्या.
आज मालतीबाई लवकर उठल्या. आज शरद आणि संध्या येणार होते.गाडी स्टेशनवर येण्याच्या अर्ध्या तास अगोदर त्या अण्णांना घेऊन स्टेशनवर पोहोचल्या .
फर्स्ट क्लास मधून उतरणारा शरद दृष्टीस पडतात मालतीबाई दोन पावलं पुढे गेल्या.त्यांना वाटलं शरदला एकदम जवळ घ्यावं. त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवावा आणि म्हणावं
' बरं झालं इथे बदलून आलास ते.फार आठवण यायची तुझी!'
त्यावर तो म्हणाला असता
' मी सुद्धा तुझ्या आठवणीने फार बेचैन होत होतो म्हणून तर इथे बदली करून घेतली'
पण हे सगळे मनातले विचार होते.सारं सामान उतरल्यानंतर शरद बरोबर च्या दुसऱ्या मित्रासह कुठेतरी निघून गेला.
" शरद ही खोली तुझ्यासाठी तयार करून ठेवलीय" मालतीबाई घरी आल्यावर त्याला म्हणाल्या.शरद ने खोली निरखून पाहिली. खोली फारच सुंदर दिसत होती.मालतीबाईना वाटलं शरद त्याबद्दल काही म्हणेल. उलट संध्या म्हणाली.
" शरद खोलीला ए सी नाही शी! कसं रे जमायचं ?आणि किती लहान आहे रे खोली."
मालतीबाईचं मन एकदम नाराज झालं. त्या खोलीसाठी त्यांनी कारण नसताना कितीतरी खर्च केला होता.महिनाभर त्या खपल्या होत्या.अण्णांच्या रागाची पर्वा न करता त्यांनी कष्ट केले होते.
पण आपलं नाराज मन त्यांनी सावरलं.विचार केला मोठ्या घरची सवय असलेली संध्या श्रीमंतीत वाढलेली आहे.चैनीच्या वस्तूच ती आजपर्यंत वापरत आली होती.तेव्हा तिचं खोलीबद्दल कुरकुर करणं स्वाभाविक आहे.
शरद ने मग रात्री आईला सांगितलं.
" माझी पाच दिवसाची रजा आहे.उद्या आम्ही महाबळेश्वला जातोय".
मालतीबाई त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिल्या.आईला सोडून कुरकुर करणारा शरद,नोकरीसाठी दूर जातांना कमालीचा अस्वस्थ होणारा शरद,आज इतक्या दिवसांच्या विरहानंतर आईची भेट होते न होते,तिच्याशी धड न बोलता,लगेच बायकोला घेऊन मजेसाठी ट्रीपला जाणारा शरद!
एका क्षणात मालतीबाईना हे सर्व आठवलं.त्यांचा जीव गलबलला.त्यांना वाटत होतं की ,ही रजतो आपल्या सहवासात घालवेल पण ?
पुन्हा मालतीबाईनी स्वतःची समजूत घातली.या वयात बायकोचंच आकर्षण जास्त राहणार.जात असले चार दिवस बाहेर तर बरोबरच आहे.
शरद ची रजा संपली.तो कामावर हजर झाला.मालतीबाई ना वाटलं आता तरी संध्या घरात लक्ष देईल.आपल्याला घरकामात मदद करेल.तेवढीच आपल्याला मोकळीक मिळेल.देवदर्शनाला जाता येईल.
स्वयंपाक तर सोडाच पण संध्याकाळचा चहा करायला सुद्धा संध्या खोलीबाहेर येत नव्हती.शरद कामावर गेल्यावर संध्या दिवसभर खोलीतच असायची.संध्याकाळी शरद घरी आल्यावर ती म्हणायची.
" चल मी तयारच आहे,वॉश घेऊन कपडे बदल".
" चहा पाणी काही हवंय की नाही?" मालतीबाई म्हणायच्या."
" नको बाई ते करत राहिली तर अंधारच व्हायचा बाहेर पडायला.होईल हॉटेलमध्ये हो ना शरद ..?"
मग शरद ही हो ला हो लावायचा.
" खरं आई,कशाला त्रास करतेस?घेऊ आम्ही बाहेरच ..."
" अरे बाहेर कशाला?घर आहे ना आपलं?मी आहे ,तुझी बायको आहे."मालतीबाई म्हणाल्या.
" दिवसभर तर ती एकटीच असते.आता दोघांनी एकत्र मिळून फिरायला जाण्याऐवजी पुन्हा आपलं स्वयंपाक घरात घुटमळत रहायचं म्हणजे?" शरद पुन्हा म्हणाला.
आता मालतीबाईना शरद चा रागच आला.जन्मदाती आईच्या भावना न जाणता पत्नीचं कौतुक?तिच्या भावनांची कदर?
पण मालतीबाई गप्प बसल्या. काही दिवसांनी होईल सारं ठिक असा त्यांनी विचार केला.आणि रागावलेल्या अण्णांनाही त्यांनी शांत केलं.
आणि मग एक दिवस दोघे रात्री बरेच उशिराने फिरून घरी आले.अण्णानी जेवून घेतलं होतं पण मालतीबाई शरद साठी थांबल्या होत्या.
हसत हसत शरद संध्या घरात शिरले.
" चला आता लवकर तुमच्या आवडीचे दही वडे केले आहेत मी.माझं ही जेवण व्हायचं आहे अजून ?"मालतीबाई जेवणाची तयारी करत म्हणाल्या.
" पण आई आम्ही जेवून आलो.फार भूक लागली होती"शरद ने सांगितले.
" तरी मी तुला सांगत होतो,जेवून घे म्हणून.तू त्यांची वाट पाहत बसली उपाशीपोटी.पण ते मात्र तुझी पर्वा न करता बाहेरून जेवून आले" अण्णा संतापले होते.
" असू द्या हो ! मी नाही तरी रात्री कुठे फारसं जेवत असते".मुलांची बाजू त्यांनी सावरली.
संध्या तणतणत खोलीत गेली.तिच्या रडण्याचा आवाज मालतीबाईच्या कानावर गेला.त्यांनाच अपराध्यासारखं वाटू लागलं.खोलीत जाऊन तिची समजूत घालावी म्हणून त्या खोलीच्या दाराशी आल्या.खोलीच्या आतून संध्याचे शब्द कानी पडले.
" तरी मी म्हणत होते.बदली कॅन्सल कर म्हणून.इथे ही अशीच कटकट होणार.हया म्हाताऱ्यांबरोबर रहायचं म्हणजे सगळी बंधन पाळायची.दिवसभर पदर खोचून काम करा वर बोलणी ही खात बसा ." तिचे हुंदके चालूच होते.
" क्वार्टर मिळायला अजून वेळ आहे.तो पर्यंत जर सांभाळ.त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस."शरद तिला समजावीत होता.
" हो तुला काय होतंय नुसतं सांगायला!तिथे म्हणाला होता जागा मिळेपर्यंत आपण हॉटेलमध्ये राहू ".
" हो!पण ते दिसायला अगदी वाईट दिसेल."
" हो म्हणून मी बोलणी खात राहू?प्रत्येक गोष्टीत म्हाताऱ्या माणसांनी तोंड खुपसलेलं मला आवडत नाही.इथे हे असंच चालणार.त्यापेक्षा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर मनाला शांतता तरी मिळेल."संध्याची कुरकुर सुरू होतीच.
" मी पण तेच म्हणतेय " धाडकन दार उघडून खोलीत शिरत पुढे येत मालतीबाई म्हणाल्या.
" आपल्या माणसाचं राग करणारी,म्हातारपणाचं अपमान करणारी,घराला घर न मानणारी,नवऱ्याला हातातलं खेळणं बनवणारी स्त्री घरची लक्ष्मी कधीच होऊ शकत नाही.नवऱ्याच्या आई बापाचं मन दुखवणारी स्त्री या घरात राहू शकत नाही"एक आवंढा गिळून त्या पुढे म्हणाल्या.
"शरद,आपल्या माता पित्यांना दुःख देणारा,त्यांची पर्वा न करता निव्वळ बायकोला जपणारा हा सुपुत्र नव्हे.तुला मुलगा म्हणायची मला लाज वाटते.बस्स झाली तुमची मिजास.मला ही हे नको झालंय. वाट मोकळी आहे.दार उघडं आहे.हया क्षणी या घरातून चालते व्हा! "
" शांत हो अगोदर "अण्णा आत आले.मालतीबाईला उद्देशून म्हणाले.
" लग्नानंतर मुलगा हा आई वडिलांचा नसतो.हे तू विसरली होती.त्यावर आई वडिलांपेक्षा त्याच्या बायकोचं हक्क असतो.आई वडील मुलांना जन्म देतात,सर्व लाड पुरवून,शिकवून त्याला मोठं करतात.त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतात हे त्यांचं कर्तव्यच असते.पण मुलांनी आपले करत स्वतः समजायला हवी.त्यांची जाण त्यांना असायला हवी.तू त्यांच्या कडून आधाराची अपेक्षा का ठेवते? आपण दोघचं एकमेकांचे खरे आधार आहोत."
दूर उभा राहून शरद सारं ऐकत होता.त्याची नजर जमिनीला खिळली होती .घडलं हे सगळं अनपेक्षित होतं.
मालतीबाई अण्णांच्या जवळ गेल्या.त्यांचं मन त्यांना सांगत होतं की हाच तुझा खरा आधार.
इकडे संध्या आपल्या सामानाची आवरासावर करायला लागली होती.
समाप्त
उज्ज्वल कोठारकर
वर्धा

24 

Share


उज्ज्वल कोठारकर
Written by
उज्ज्वल कोठारकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad