Bluepadमला सांगा.......सुख म्हणजे नक्की काय असते?
Bluepad

मला सांगा.......सुख म्हणजे नक्की काय असते?

डॉ अमित.
डॉ अमित.
3rd Oct, 2020

Share


मला सांगा.......सुख म्हणजे नक्की काय असते?आठवतंय ना?
खूप सुंदर असं गाणं होतं हे प्रशांत दामले यांनी गायलेलं.एक मार्मिक असा प्रश्न त्यांनी आपल्याला या गाण्यातून विचारला होता. गाणं ऐकताना अंतर्मुख होत सहजचं विचार केला की खरंच काय असतं हे सुखं.
मनासारखं जगणं?हवे ते खाणं पिणं?
खूप खूप पैसे कमावणे?संसारात रमणं?
की आणखीन काही?
खरचं नक्की नाही ना येत ते सांगता?
नाहीच येणार.
जेंव्हा आपण या साऱ्या गोष्टींना वेगळं ठेवून फक्त मनाच्या अश्या अवस्थेचा विचार करतो ज्या अवस्थेत आपण फक्त आणि फक्त मनाच्या एका अश्या पातळीवर असतो जी तुम्हाला तुमच्या वेदना,दुःख,त्रास कष्ट,ताणतणावं काही क्षणांसाठी का होईना याचा विसर पाडायला भाग पाडते.
हीच ती अवस्था,जी म्हणजे सुख.
मग वेदना त्रास दुःख या गोष्टी तुमच्या जीवनात बिलकुल नसतात असे नाही तर त्या तुमच्यावर त्यावेळी वरचढं होत नसतात एवढंच.
मग हे इतके सोपं असताना ह्या सुखासाठी एवढी धडपड कशासाठी.आपण दिवसाच्या कुठल्याही वेळी कुठल्याही क्षणी जर या चांगल्या गोष्टी अथवा चांगल्या आठवणी स्मरत राहिलो किंवा त्या निर्माण करत राहिलो तर आपल्याला दुःख हे दुःख राहणार नाही किंवा त्याची धार बोथटशी होऊन जाईल,ते सुखाच्या मनाच्या अवस्थेवर हावी होणार नाही.मग
तो आपला क्षण सुखाचाचं तर होऊन जाईल,नाही का?


थोडक्यात काय तर सुखं म्हणजे
मनाची मनाला मानवणारी अशी मनोकामना किंवा अशी मनोकायिक अवस्था जी तुमच्या मनमर्जी ला एका वेगळ्याच मोहक पातळीवर घेवून जाते.

अरेच्चा, हे मी काय 'म' 'म' ची भाषा मांडतोय तुमच्यापुढे....हो बरका ही 'म' ची भाषा कधी उलगडते माहिती आहे का?
ती उलगडायला सुरू होते जेंव्हा आपल्यातला अह'म' हा गळून पडतो तेंव्हा... मनातला कुठलाही वह'म'..दूर होतो

ते कसे तर..

मी खूप चांगला,
माझं सगळं बरोबरच असतं,
मी सांगेल तसचं व्हायला पाहिजे,
मी सांगेल ती पूर्व दिशा किंवा
माझ्या सारखं दुसरं कुणीच नाही...

त्या उलट नेहमी

माझ्या सोबतच असं वाईट का होत,
माझंच नशीब फुटकं,
माझ्याशीच लोकं का बरं असं वागतात.
मी कोणाचं काय वाईट केलंय...

या सर्व प्रत्येकातला मी,माझं,मला हा अहमं जर दूर केला तर त्याच उत्तर आपल्याला नक्कीचं मिळेल.

आपण नकळत ह्या अहम मधून बाहेर पडून जेंव्हा आपल्या आत डोकावू तेंव्हा कळेल की अरे मी तर खूप सुखी आहे.समाधानी आहे.
मग जे जे आपल्या समोर येईल किंवा जे जे दान आपल्या झोळीत तो ईश्वर टाकेल ते नक्कीच परिपूर्ण असेल,मनाजोगे असेल..मनाला सुखावणारे असेल.

जेंव्हा आपल्यात
सु...सुसूत्रता मनाची येते
ख...खरेपणा स्वतःशी असतो....तेंव्हाच तर सुख मानवते नाही का?

हेच तर सुख आहे,होय की नाही?


मी वाट पाहत राहिलो
सुखाची.....
ते तर माझ्या पुढ्यातच् होते
अगदी माझ्या नजरेसमोर
मीच त्याला दरवेळी
दुर्लक्षिले.....
अजुन जास्त सुखाच्या अपेक्षेने
हावरटासारखे...
लाळ येई पर्यंत हव्यासाची
पण क्षणं साधला एका क्षणी
जाणवले की आता थांबायला हवे
देण्यातले सुख समजायला हवे
मग बदललो आतून बाहेरून
देत राहिलो आनंद आवर्जून
पाहा कसा झालो सुखी
सुख म्हणजे काय असते
याची चावीच जणू मिळाली कशी.

डॉ अमित.

47 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad