Bluepadमोबाइल सारा, पहा आसमंत सारा....
Bluepad

मोबाइल सारा, पहा आसमंत सारा....

D
Divya Shinde
30th Nov, 2021

Share


चार्ल्स डार्विनने माणसाच्या उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडताना माणूस चालताना जनावराप्रमाणे हात आणि पाय अशा चार अवयवांनी चालत, कालांतराने वाकलेल्या स्थितीत येऊन मग इरेक्ट म्हणजेच उभा कसा झाला याचा पूर्ण संशोधित अभ्यास मांडला आहे. माणसाच्या ज्ञात इतिहासाच्या काळापासून माणूस इरेक्टच आहे पण आता कदाचित या उत्क्रांतीतील पुढचा टप्पा येऊ घातला आहे असं म्हटलं जात आहे. आजकाल आपण ज्याप्रकारे मान खाली घालून मोबाइल आणि लॅपटॉप सारख्या गॅझेट्स वर काम किंवा टाइमपास करत असतो त्यावरून तो उत्क्रांतीचा काळ फार लांब नाही असं म्हटलं जात आहे. याला भरीस भर म्हणून रसायन युक्त अन्न खाल्याने अलीकडे कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे आणि हे रसायन युक्त पदार्थ खाऊन आताच्या पिढीत जे काही शारीरिक बदल होतील ते पुढच्या हजार एक किंवा त्याही पुढच्या पिढ्यांमधील माणसांचे गुणधर्म म्हणून विकसित होतील असे काही तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे ही उत्क्रांतीची प्रक्रिया होऊ घातली आहे असं आपण सुद्धा मानायला जागा आहे. पण प्रश्न उरतो तो आजच्या जीवंत असलेल्या माणूस जातीच्या जगण्याचा. पुढे हजारो वर्षांनंतर येणार्‍या बदलासाठी आपण आपलं आजचं जगणं जगायचंच विसरलो आहोत असं तर होत नाहीये ना?


माझंच उदाहरण घ्या. अगदी पूर्वी नाही तर दहा एक वर्षांपूर्वीपर्यन्त योगासनाच्या क्लासमध्ये शिकवलेली “कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम” ह्या सकाळच्या प्रार्थनेने दिवस सुरू होत होता. आज तसं होत नाही. आज जाग आली की आधी फोन हातात घेतला जातो. मग व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर वर किती मेसेजेस, विडिओ, फोटो, गुड मॉर्निंग, हॅप्पी मॉर्निंग, गुड डे, सोबत अनंत शुभेच्छा, कोणाकोणाचे वाढदिवस, विनोद, राजकीय टिप्पणी, ट्विट्स, रिट्विट्स, कोरोनाची आकडेवारी, मेडिकल सल्ले, फेक मेसेज, काऊंटर मेसेजेस, अनंत वेबसाइट्सच्या लिंक हे सर्व पाहणं म्हणजे सकाळची आन्हिकं झाली आहे. हे सोशल मीडिया प्रकरण पुरे झालं की मग मेल पाहणं, गरज असल्यास त्यांना उत्तरं देणं. मग आपला दिवस सुरू होतो. झोप घेऊन फ्रेश झालेले डोळे पुन्हा एकदा तरवटल्यासारखे होतात. आरशातलं आपलंच प्रतिबिंब आपल्याला भयाण दिसू लागतं.

आपण हे जे काही सोशल मीडिया वर पडलेले असतो ह्याला फक्त एकच कारण आहे, आपण इन्फॉर्मेशन मध्ये कोणाच्याही मागे राहू नये म्हणून. एकमेकांना विरोध करताना आपल्याकडे एखाद्याच्या वर्च्युयल तोंडावर फेकायला उत्तर असलं पाहिजे म्हणून आपला ह्या सगळ्या युनिवर्सिट्या मधून शिक्षण घेण्याचा आटापिटा सुरू असतो. आजकाल सोशल मीडियावर दोन तीन शिव्या वाचल्या शिवाय (किंबहुना दिल्या घेतल्या शिवाय) आपला दिवस सार्थकी लागला असं वाटत नाही. खरंच याने आपली माणूस म्हणून वृद्धी होते का?

मी स्वत:वरच केलेलं संशोधन शेअर करीत आहे. अर्थात हे शेअर करण्यासाठी सुद्धा मला त्याच सोशल मीडियाचा वापर करावा लागत आहे. पण आता त्याला इलाज नाही. किंवा आपण असं म्हणूया की सोशल मीडियाचा वापर आपण आवश्यक त्या गोष्टींसाठी करूया. आता आवश्यक काय आणि अनावश्यक काय हे मात्र तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे.
तर आपण माणसाने ज्या काही तांत्रिक वस्तू निर्माण केल्या त्या आपलं आयुष्य सुलभ करण्यासाठी केल्या आहेत हे आधी लक्षात असू द्या. पत्र, निरोप, भेटीगाठी यामध्ये जाणारा वेळ टाळता यावा हा मुख्य उद्देश. तो सध्या झाला की मग डोकं वर काढून आपल्या परिसराचा वेध घ्यावा. सकाळी उठल्यावर बाल्कनीतील तुळस, फुलझाडं आणि इतर झाडं पहावीत. सकाळच्या शुद्ध हवेत पोटभर श्वास भरून घ्यावा. अर्धा तास व्यायाम करावा. संध्याकाळी नुसताच फेर फटका मारून यावं. स्वत:चीच स्वत:ला सोबत करावी. रात्री झोपताना दिवस कसा गेला ते एक डायरी मेंटेन करून लिहावं. अधेमधे गरज असल्यास किंवा आवश्यक नोटिफिकेशन आल्यास सोशल मीडिया पहावा. जेवण, नवीन रेसिपी, साफ सफाई, ऑफिसचं काम, प्रवास या दरम्यान मोबाइल वर थोडा टाइमपास केलात तरी चालतंय की. पण अगदी ठरवून १५ मिनिटं टिपी करावा.

आयुष्याला एका मोबाइलमध्ये जखडून टाकू नका. मोबाइल नव्हता, तेंव्हाचे दिवस आठवा किंवा तुम्हाला अगदीच तरुण असाल तर आपल्या पालकांशी याबाबतीत गप्पा मारा. तुम्हाला नेट्फ्लिक्स वर एखादी ट्रेंडिंग फिल्म न पाहिल्याचं दु:ख जेवढं होणार नाही तेवढं तुम्हाला झाडावर चढता येत नाही याचं होईल. बघा, प्रयत्न करून बघा... हजारो पिढ्यांनंतरच्या पिढ्यांना काही चांगल्या सवयी सुद्धा तुम्हालाच कॅरि फॉरवर्ड करायच्या आहेत. तेंव्हा आता जगून घ्या.... फार उशीर करू नका.

41 

Share


D
Written by
Divya Shinde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad