Bluepad | Bluepad
Bluepad
व्हॉटसॅप चॅटिंग करताय? सावधान
S
Shivraj Kulkarni
1st Oct, 2020

Share


सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाच्या तपासात अनेक गोष्टी उघड होऊ लागल्याने काही लोकांचे धाबे दणाणले आहेत. यात ड्रग कनेक्शन समोर आल्याने प्रथम दर्शनी तरी सगळ्यांच्या रडारवर बॉलीवुडचे अभिनेते आणि अभिनेत्री असले तरी हळू हळू हा रोख संपूर्ण ड्रग माफीयांकडे वळेल अशी अपेक्षा. हे सर्व प्रकरण उघड व्हायला मदत झाली ते अभिनेत्रीच्या व्हाट्सअप चॅटची. यात प्रामुख्याने लक्ष्य बनलेल्या दीपिका पडूकोनचे तिच्या मॅनेजर करिश्मा सहा सोबतचे व्हाट्सअप चॅट समोर आल्याने केवळ बॉलीवुड मध्ये नाही तर व्हाट्सअप वापरणार्‍या प्रत्येकाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

व्हॉटसॅप चॅटिंग करताय? सावधान

खरं तर व्हाट्सअप चॅट सुरक्षित चॅट असतात. मेसेज करणारा आणि मेसेज रिसिव करणारा यांच्या व्यतिरिक्त हे चॅट कोणीही वाचू शकत नाही. खुद्द व्हाट्सअप सुद्धा नाही. याला एंड टू एंड एनक्रिप्शन म्हणतात. याची खातरजमा तुम्ही आता सुद्धा तुमच्या व्हाट्सअपच्या सेटिंग मधील प्रायव्हसी ह्या मेनू मध्ये जाऊन करू शकता. मग असं असताना दीपिकाचे चॅट इतक्या उघडपणे कसे काय समोर आले हा प्रश्न आहे.

कायदा अंमलबजावणी अधिकार लक्षात घेता व्हाट्सअपचे काही वेगळे नियम असल्याचं व्हाट्सअपच्या ब्लॉग वर म्हटलेलं आहे. व्हाट्सअप चॅट उघड करण्याचे काही नियम आहेत. आणि त्या नियमात बसत असेल आणि अत्यंत विश्वासू असेल तरच ९० दिवसाचे चॅट उपलब्ध होऊ शकतात. कारण ९० दिवसांनंतर व्हाट्सअप सर्व चॅट पुर्णपणे डिलिट करून टाकतो. मग दीपिकाचे २०१७ सालचे चॅट कसे मिळाले. तर याचं उत्तर आहे सायबर पद्धती. अनेकदा आपण आपले काही मेसेज सेव करतो आणि ते गूगल ड्राइव किंवा अॅपल क्लाऊड किंवा आय क्लाऊड वर सेव होतात. आणि हे रिकवर होण्यासाठी केवळ त्या व्यक्तीचा फोन आपल्याकडे असणं पुरेसं असतं. या द्वारे फोनचं क्लोनिंग करून हे असुरक्षित म्हणजेच अनप्रोटेक्टेड चॅट सायबर सेल आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट पुन्हा मिळवू शकतात.

याचा दूसरा साधा मार्ग हा आहे की कोणत्याही चॅटचा स्क्रीनशॉट करून तो आपण आपल्या गॅलरीत जरी सेव केला तरी तो क्लाऊड वर सेव होतो आणि तो आपण डिलिट केल्यानंतर ही आपल्याला कधीही परत मिळवता येतो. दीपिका आणि रियाच्या बाबतीत हेच झालं असण्याची शक्यता आहे आणि ते चॅट आता सर्वत्र झाल्याने व्हाट्सअप वापरणार्‍या देशातील ४ कोटी जनतेच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

लक्षात असू द्या की, मोबाइलच्या जगात “डिलिट” ही संकल्पना किंवा व्यवस्था केवळ तुमच्या फोन मधली गर्दी कमी करण्यासाठी असते. कोणतंही चॅट, फोटो, विडियो कधीही कायमचे डिलिट होत नाहीत.

तंत्रज्ञान आपलं जीवन सहज बनवत असलं तरी ते बर्फाखालून वाहणार्‍या ज्वालामुखी सारखं असतं. जराशा आघाताने ते फुटून वर येऊ शकतं. तरुण मुलींनी आणि स्त्रियांनी याचं भान ठेवणं फार आवश्यक असतं. तुमच्या लहानशा कृतीने तुमचं आयुष्य बरबाद होऊ शकतं. त्यासाठीच आपली वर्तणूक आणि आपल्या सवयी चांगल्या ठेवणं आवश्यक आहे.

46 

Share


S
Written by
Shivraj Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad