मरणाने केली सुटका.....जगण्याने छळले होते.
"इतकेच मला जातांना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते."
आज राहून राहून कवी सुरेश भट यांच्या या ओळी मनाच्या पडद्यावर फेर धरत होत्या....जणू 'एल्गार'च करत होत्या.
मनातला पाझरं डोळ्यांवाटे बाहेर पडत होता की डोळ्यातले अश्रूं मनातं खोलवर पाझरतं होते...काहीच उमगतं नव्हते.
माझी मावशी... 'चंदना' नाव तिचे, दोन दिवसांपूर्वी हे जग सोडून कायमची निघून गेली होती. "मावशी"..'मा' सी जो होती हैं.. हो तीच मौसी...किती समर्पक आहेना हे नाव या नात्याचे..?
तसे तिचे वय फक्त अठ्ठेचाळीस...हे काही जाण्याचं वयं तर नक्कीचं नाही.आता कुठे तुम्ही या वयात तुमच्या स्वतः साठी जगायला सुरू करणार असता..पण प्रारब्धं म्हणतात ना ते हेचं...
वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी 'वेगनर ग्रॅन्यूलोमॅटोसिस' या दुर्धर आजाराने तिला पछाडले...हा आजार हळूं हळूं तिच्या दोन्ही किडनी खराब करत गेला आणि गेल्या आठ वर्षांपासून डायलिसिस या उपचार पद्धती वर तीचे आयुष्य पुढे अवलंबून राहिले ते कायमचेच...इतके वर्षे सतत होत असलेला औषधांचा मारा एका बाजूने ( जो फायदा थोडा करत होताच पण सोबतीला आपले दुष्परिणाम ही दाखवत होता ) तर डायलिसिस साठी लावण्यात येणाऱ्या सुया आणि त्यांनी तिला होणाऱ्या वेदना एका बाजूला...नियतीच्या त्रासाच्या वेगळ्याचं कात्रीत ती सापडली होती...अधून मधून हा आजार मध्येच डोकं वर काढून आधीचा त्रास कमी होता की काय म्हणून काही ना काही नवीन लक्षणें.. नव्हे "अवलक्षणे" दाखवत होता..अधून मधून कमी होत असणारे रक्ताचे प्रमाण,वेदनेला ही लाजवणारी सांधेदुखी, खाणे कमी आणि पथ्ये जास्त अशी असणारी आहार नियमावली,तोलून मापून प्यावे लागणारे पाणी या आणि अश्या असंख्य संकटावर तिने मोठ्या हिमतीने आणि कसोशीने विजय मिळवला होता.
आजाराचे निदान झाल्यापासून ते आजतागायत चौदा वर्षांचा काळ सरला होता...ही चौदा वर्षे एका परीने तिच्या साठी या पृथ्वीतलावरील वनवासच ठरली होती जणू....ज्यात तिने असंख्य वेदना आणि सहनशीलते पलीकडचा त्रास अनुभवला होता.
वेदनेला अंत नाही,
सोसण्या मी संत नाही
कवी अनिल यांच्या या ओळी तिची मनाची अवस्था इथे अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करतात.
जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांच्या जोरावर तिने या आजाराला आतापर्यंत मात दिली होती...
पण हा आजार त्याची पाळेमुळे अधिक खोलवर नेत राहिला....गेल्या दहा दिवसांपासून फुफ्फुसात झालेल्या 'रक्तस्त्राव' आणि 'जंतुसंसर्ग' या दोन्ही पुढे तिची ही दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र यावेळी कमी पडली आणि ती आम्हा सर्वांना सोडून निघून गेली...
तिच्या या आजारात तिच्या इतकाच त्रास भले शारीरिक नाही पण मानसिक...सहन केला तो आमच्या काकांनी... आणि तिच्या लाडक्या मुलीने.
तिच्या प्रत्येक वेदनेत तिला मायेची फुंकर दिली, खंबीर साथ दिली आणि भक्कम आधार दिला या दोघांनी.पत्नीला अर्धांगिनी म्हणत असले तरी इथे मात्र आमच्या काकांनी तिच्यासाठी आपले अर्धे आयुष्य पणाला लावले होते.
चंदन झिजले जरी तरी त्याचा सुवास मागे दरवळत राहतो त्या प्रमाणे आमची ही चंदना मावशी गेली तरी तिच्या चंदना'सारख्या सुवासिक आणि शीतल आठवणी आमच्या मनात कायम दरवळत राहतील...
आकाशातील ताऱ्यांमध्ये अनोखं
चमचमणारं एक नक्षत्रं बनलीस तू
दूर भले तू गेलीस तरीही
मनात 'चंदना'चा सुवास बनून वसलीस तू.
सुरेश भट यांच्याच ओळीने मी माझ्या चंदना मावशीला अगदी मनापासून भावपूर्ण शब्दांत श्रध्दांजली अर्पण करतो....
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
डॉ अमित.