© या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत. त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसा संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सदरील कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित. या कथेचा कोणताही भाग अंशतः अथवा पूर्णतः कोणत्याही स्वरूपात लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय सादर करू नये. तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व वादांसाठी न्यायालयीन कार्यक्षेत्र "माढा" राहील.
पोलिस स्टेशनमध्ये संध्याकाळची हजेरी झाली होती. पी. आय. साहेब एल. सी. बी. च्या लोकांना घेऊन चर्चा करण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले होते. ठाणे अंमलदार दिवस भराच्या दगदगीने वैतागला होता. साहेब त्यांच्या केबिन मध्ये गेल्याची खात्री होताच त्यानं मस्त पैकी तंबाखूचा बार लावायला सुरुवात केली होती. अतिशय इमानदारीने त्यानं सगळा चुना त्या चिमूटभर तंबाखूमध्ये रगडून नाहीसा केला. त्याच्या चेहऱ्यावरील समाधानाची लकेर मिश्रण परफेक्त झाल्याची ग्वाही देत होती. रोजच्या ओळखीच्या जागी ते मिश्रण विराजमान झालं आणि त्याची समाधी अवस्था सुरु झाली. आज विशेष उल्लेख करावा असं काही घडलं नव्हतं. रोजच्या रुटीन कामामुळे एकंदर सगळंच वातावरण थोडंस आळसावल्या सारखं होतं. तिकडे वायरलेस वर डेली रिपोर्टींग सुरु होतं. मधूनच खरखरत एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढत वायरलेस चा सेट स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. बाकी तसं वातावरण नॉर्मल होतं.
तेवढ्यात तिशीच्या आसपासची एक बाई पोलिस स्टेशन मध्ये आली. सुमारलेल्या डोळ्यात अर्धवट काजळ, स्लीव्हलेस ब्लाऊज तोही अतिशय खोल गळ्याचा, रोज गडद रंगाची लिपस्टिक लावून लावून त्या लिपस्टिकचाच रंग ओठात उतरून लाल भडक झालेले ओठ, नेटची साडी बेंबी खाली चार बोटं नेसलेली. एखाद्या बाई माणसाच्या नजरेत जाणवणार पोलिस स्टेशन बद्दलच नवखेपण हिच्या नजरेत जाणवत नव्हतं. आपल्याला नेमकं कुठं जायचंय हे तिला निश्चित माहिती होतं. त्यामुळे वाटेत येणाऱ्या जाणाऱ्या दोन चार हवालदारांना सलाम ठोकत ती थेट ठाणे अंमलदाराच्या खोलीत शिरली. "सायेब हायती का?" तिनं सावकाश विचारलं. ठाणे अंमलदारांन दप्तरातून मुंडक वर काढून तिच्याकडे पाहिलं आणि हाताने खुण करून समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. हातातील पेन दप्तरावर तसाच ठेवून तो उठला आणि दरवाजा मधूनच समोर लावलेल्या झुडुपांच्या बुडख्यात लांबलचक पिचकारी मारली. तंबाखूचा चोथका बोटान काढून झाडीत भिरकावला, टेबलावरची बाटली उचलून पाण्यानं चुळ भरली आणि परत फिरताना तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं "कमळे... तू हितं.... आन ती बी या टायमाला? काय प्रॉब्लेम हाय काय?" तिला खांद्या वरच्या हाताचं काहीच वाटलं नव्हतं. "व्हय... जरा सायबास्नी भेटायचं हाय" "का गं.... मला सांगाय सारखं नाय काय?" हसत हसत खोचकपणे त्यानं विचारलं. "तुमास्नी सांगन्या सारखं असत तर आल्या आल्या नसतं व्हय सांगितलं? धंद्याची खोटी करून सायबाची वाट बगत नसते बसले" तिच्या आवाजात नेहमीचा नकली लाघवीपणा नव्हता... थोडा देखील. आज या बाईचं नक्कीच चांगलंच काहीतरी बिनसलं आहे याची जाणीव झाल्यानं ठाणे अंमलदारनं या विषयावर जास्त बोलणं टाळलं आणि "मिटिंग मदी हायत. संपली की मग जा" असं सांगून परत मुंडक दप्तरात खुपसलं. पदराशी चाललेला तिचा स्त्री सुलभ चाळा तिची अस्वस्थता दर्शवत होता. तिच लक्ष सारखं घड्याळाकडे होतं. अधून मधून उगाचच साहेबांच्या केबिनकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्याकडे पहात होती. या सगळ्या प्रतीक्षेत जाणारा प्रत्येक क्षण तिला वर्षा सारखा वाटत होता. घड्याळची चाल मंदावल्या सारखी वाटत होती. शेवटी आकाराच्या सुमारास एल. सी. बी. सोबतची मिटिंग संपवून साहेब बाहेर आले. साहेबांना पहाताच कमळी वेगानं साहेबां कडे गेली. साहेब पाठमोरे उभे होते. "सलाम सायेब". कमालीच्या आवाजाकडे पहात साहेबांनी विचारलं "एवढ्या रात्री तू इथं"? साहेबांच्या बोलण्यात रग होती पण सर्वसामान्य माणसांना बोलण्यात जेवढी असायची तेवढी नव्हती. "मगाच आले सायेब, दोन तीन घंटे झालं" साहेबांनी मनगटा वरच्या सोनेरी घड्याळात पहातच विचारलं "बोल.... काय झालं?.... कशासाठी आलीस"? कमालीची पोलिस स्टेशन, ठाणे अंमलदार, छोटे साहेब, मोठे साहेब या सगळ्यांची भीती मोडली होती. या सगळ्यांनी कधी ना कधी तिच्यापुढं नांग्या टाकल्या होत्या. "रेपची केस करायची हाय सायेब" तिनं सरळसोट सांगितलं. इतकावेळ तिला टाळायचा प्रयत्न करणाऱ्या साहेबांची तंद्री या वाक्यानं भंगली "कुणा वर झालाय रेप? कोण करणार आहे कंप्लेंट? आणि कुणा विरुद्ध आहे? रेप झालेली व्यक्ती कुठंय?" साहेबांनी अतिशय गंभीर होऊन विचारलं. "मला करायचीय कंप्लेंट सायेब. माझाच रेप झालाय" साहेबांना नेमकं काय आणि कसं व्यक्त व्हावं हे कळेना.क्षणार्धात त्यांची गंभीर मुद्रे वर आश्चर्य, कुतूहल असे अनेक भाव एकदमच दिसू लागले. कदाचित एखादी सामान्य स्त्री अशी तक्रार घेऊन आली असती तर साहेबांच्या चेहऱ्यावरील भाव तसू भर बदलले नसते पण कमळी..... एक धंदेवाली अशी तक्रार करतेय म्हणाल्यावर नेमकं काय करावं ते त्यांना सुचत नव्हतं. मुळात पैसे कमावण्यासाठी दिवसभर अनेकजणांना अंगावर घेणाऱ्या कमळी वर रेप होऊ शकतो हेच त्यांना रुचत नव्हतं. एका वेश्येवर रेप कसा काय होऊ शकतो हाच विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. त्यामुळे नेहमीच्या प्रोटोकॉल प्रमाणे आधी तक्रार नोंदवून घ्यावी आणि पुढील कारवाई करावी. कि आधी या सगळ्या प्रकरणाची खातरजमा करून घ्यावी आणि मग तक्रार नोंदवून घ्यावी या संभ्रमावस्थेत साहेब होते. "माझ्या केबिन मध्ये बोलू" म्हणून साहेब त्यांच्या केबिनकडे निघाले. मागोमाग कामाळीपण निघाली. इतकावेळ सुस्तावलेल्या ठाणे अमलदाराचे डोळे आणि कान या बोलण्याने टवकारले गेले. विषयाची सखोल माहिती मिळविण्यासाठी तो या ना त्या निमित्ताने बाहेर जाऊन त्या दोघांच्या बोलण्याचा कानोसा घेत होता. पण दोघेही साहेबांच्या केबिनमध्ये गेल्याने त्याचा हिरमोड झाला.
साहेब गंभीर मुद्रेने स्वतःच्या खुर्चीत विराजमान झाले. पाठीमागे रेलत साहेबांनी विचारलं "आता सांग नेमकं काय झालं? कुठं झालं? कसं झालं? सविस्तर सांग" "आज तब्येत बरी नव्हती म्हणून धंद्यावर बसले नव्हते. आन ईळभर झोपून बी लई कटाळली व्हती म्हणून मग सांजच्याला तळ्यावर चक्कर माराय गेले व्हते" कमळी सगळा घटनाक्रम आठवत होती. एखादा सिनेमा पूर्ण रिवाईंड करून पहिल्या पासून सुरु केल्याप्रमाणे. कमालीच्या धंद्याला सुट्टी नसायचीच. त्या पाच दिवसात सुद्धा नेहमीच गिर्हाईक आलं तर बसावंच लागायचं. नाही म्हणाल आणि ते गिर्हाईक जर दुसरीकडे गेलं तर ते कायमच तुटायची शक्यता जास्त. रतीबाची काही गिर्हाईक असणं आणि ती संभाळण खूप गरजेचं होतं तिला. आज खूप दिवसांनी, दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनी कमळी तळ्याकाठी आली होती. बराच काळ फक्त त्या तळ्यातील पाणी, त्यावर उठणारे तरंग पहात होती. आवेगाने जन्माला आलेला तरंग आपला प्रवास संपे पर्यंत स्वतःच्या अस्तित्वाच्या खुणा सुद्धा मागे ठेवत नाही. मुळात तशा काही खुणा मागे ठेवण्याचा त्याला काही अधिकार असतो का? आणि जरी ठेवल्या तरी त्याच कोणाला सोयरसुतक? एकाची जागा दुसऱ्यानं घेणं आणि तेही पहिल्याच्या अस्तित्वाच्या खुणा कायमच्या पुसत, हाच आजच्या दुनियेचा एकमेव शाश्वात नियम. पाण्यावर उठणारा प्रत्येक तरंग कमळीला त्याच्यावर स्वार करून घेऊन तिला तिच्या भूतकाळात घेऊन जात होता. पुढच्या आठवणी आपसूकच मागच्या आठवणी पुसत होत्या. तिच्या मामानेच केलेला तिचा सौदा, त्या दहा बाय दहाच्या खोलीत जस्मिन, गुलाब, चंदन, मस्क, केवडा आणि न जाणे कोण कोणत्या अत्तरांच्या संमिश्र वासानं तयार झालेला एक विचित्र वास, त्यात मिसळला गेलेला पावडरचा सुगंध, गुलाबी साडीतली रेश्मा कस्टमरला खुश करण्यासाठी काय काय करीत होती ते त्या झिरझिरीत पडद्या तुन स्पष्टपणे दिसणं, त्याबद्दल तिला काहीच न वाटणं, कंडोम म्हणजे नेमकं काय? तो कसा असतो आणि कसा व का वापरायचा असतो हे कमलीला इथे आल्यावरच कळालं होतं, गल्लीत शिरणाऱ्या माणसाच्या रंगरूपाकडे दुर्लक्ष करून फक्त त्याच्या पाकिटाचा अंदाज घ्यायची नजर, चिरेबंद माल म्हणून आक्कान कस्टमर समोर मांडलेलं आपलं प्रदर्शन. प्रदर्शन कसलं.... लिलाव... स्वतःच्या डोळ्या देखत झालेला अब्रुचा सौदा, तो जीवघेणा पहिला प्रसंग, असाहाय्य अशा वेदना, त्या दिवशी झालेल्या जखमा शरीरावर कमी पण मनावर जास्त खोलवर उमटल्या होत्या. हळूहळू सगळंच मरत जाणं, वेदना-संवेदना, भाव-भावना, ईच्छा-आकांक्षा आणि स्वप्न. आणि आता या सगळ्यांच्या थडग्यावर बेमुर्वतपणे साडी गुढघ्या पर्यंत वर करून बसणं, मादक चाळे करून नजरेस पडणाऱ्या प्रत्येक नराला भुलावण, बोलावणं आणि..... बसवणं. किती काळ लोटला होता? किती अनुभव आले होते? कोणते चांगले आणि कोणते वाईट? काहीच हिशोब नव्हता. आज किती तरी दिवसांनी कमळी स्वतः सोबत मनसोक्त गप्पा मारत होती. काहीही न बोलता. मावळतीची किरणं, त्यांची लाली पाहिली आणि क्षणभर तिला वाटलं हा सूर्य सुद्धा आपल्याच वयाचा आहे. लवकरच अस्ताला जाणारा. क्षणभर सूर्याकडे पाहिलं आणि ती माघारी फिरली. हा झालेला सगळा संवाद डोक्यात घेऊन.
एव्हाना तिन्हीसांज टळत आली होती. कमळी स्वतःच्याच तंद्रीत निघाली होती. काही अंतरावर दोन चार माणसं त्याच्या चारचाकी गाडी जवळ काहीतरी करीत उभी होती. एरवी असं आड रस्त्याला कोणी दिसलं असतं तर त्याला गिर्हाईक करायची प्रक्रिया कमळी नं केव्हाच सुरु केली असती. पण आज तिचं लक्ष्य या सगळ्यांकडे नव्हतं. पायाखालचा रस्ता तुडवीत कमळी पुढे निघाली होती. "आज ही कमळाच फुल हिकडची वाट कसं काय चुकलं म्हणायचं"? या प्रश्नानं ती भानावर आली. ते तिचं नेहमीच कस्टमर होतं. आपसूकच नकली हास्य आणि बनावट प्रेमभाव तिच्या चेहऱ्यावर आले. "काय नाय बरं वाटत नव्हतं म्हणून जरा फिराया आले व्हते. आता निघाले म्हागारी. आन तुमि हितं काय करताय"? असं म्हणत म्हणत कमळी त्याच्याजवळ गेली. "आता आजारी पडाया काय झाल तुला"? आता या प्रश्ना वर नेहमीच्या सवयी प्रमाणे कृत्रिम लाघवी भाषेत कमळी म्हणाली "चार-चार, पाच-पाच दिस येत नाहीसा, नविन ठिकाणा घवला दिसतंय बसायला? आता नेहमीच माणूस असं टाळाया लागल्यावर दोसरा काढल्यावणी व्हणारच की" अर्थात ही फक्त त्या कस्टमरला खुश करण्यासाठी केलेली मायावी शब्द रचना होती. बरेच पुरुष, असल्या बोलण्याला लगेच भुलतात हे तिला अनुभवातून आलेलं शहाणपण होतं. ते ईथ कामी आलं. असं काही तरी मधाळ बोलून पुढच्या एक दोन दिवसात त्याला आपल्याकडे बसायला बोलावणे हाच त्यामागचा शुद्ध हेतू. पण कमालीचं हे बोलणं त्यानं मनावरचं घेतलं. नकळत कधी इशारे झाले आणि त्याच्या सोबतची माणसं कधी पांगली ते कळालंच नाही. मुळात बाराभानगडीत रमणारा माणूस साधा आणि सरळसोट कसा असेल? त्यानं गप्पा सुरूच ठेवल्या आणि नुकतीच घेतलेली नवीन पपईची बाग पहायला आल्याचं तिला सांगितलं. "आता आलीच हायस तर मग चल की, तू बी बघ..... आमची नवीन बाग"असं म्हणून तिला आग्रह केला. मनात नसताना केवळ कस्टमर तुटू नये म्हणून कमळी त्याच्या सोबत निघाली. दोघेही गप्पा मारत मारत गाडी पासून दूर जाऊ लागले, एका शेताच्या दिशेने. वाटेत बर्याच नकली काळजीवाहू गप्पा झाल्या. बरच अंतर आत गेल्यावर एका कुडाच्या झोपडी जवळ येऊन दोघे थांबले. आधीच तब्येत खराब, त्यात इतकावेळची बडबड आणि पायी चालण यामुळे कमळी पार दमून गेली होती. तिच्या घश्याला कोरड पडली होती. मनात नसताना आज इथवर आलोय खरं आता पटकन बाग पहायची आणि लवकरात लवकर खोली जवळ करायची या विचारातच कमळी पिण्यासाठी पाणी शोधू लागली. तिला बाहेर काहीच दिसलं नाही . आत पाण्याचा डेरा ठेवलेला असावा न्हणून कुडाच्या झोपडीत शिरली. तिथं एका कोपऱ्यात डेरा ठेवलेला होता, त्यावर एक चेमटलेला एक स्टीलचा तांब्या होता. तिनं तांब्याभर पाणी घेतलं आणि गटागटा रिकामा करू लागली. तेवढ्यात कसलातरी आवाज झाला म्हणून तिनं वळून पाहिलं तर त्यानं आत येऊन दाराला कडी घातली होती. तोंडात असलेलं पाणी नरड्याच्या खाली उतरण्यापूर्वीच त्यानं कमलीला घट्ट मिठी मारली. आवेगाने तिला किस करू लागला. या असल्या सगळ्या गोष्टींना सरावलेली कमळीनं सावकाश पाणी नरड्याखाली ढकललं आणि म्हणाली "आज नगं..... तब्येत बी बरी न्हाय आन.... आज दुसराच दिस हाय. दोन रोजान या आन करा की सवडीनं जसं पाहिजे तसं" पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट त्याच्या हालचालींचा आवेग वाढतच गेला. एखाद्या भुकेल्या शिकारी प्राण्यासमोर मासांचा गरम तुकडा टाकल्यावर तो ज्या अधाशीपणाने चवताळून त्याच्यावर तुटून पडावा तसा तो कमळी वर तुटून पडला. सुरुवातीचा कमळी चा लाघवी, प्रेमळ स्वर आता जरा रुक्ष झाला होता. "आवं नगं म्हणते न्हवं..... जरा ऐका की.... आत्ता नगं". पण त्याच्या कानावर कमालीचे शब्द पडतंच नव्हते. त्याला दिसत होता तो फक्त एका मादीचा उन्नत देह. त्याला माज होता स्वतः नर असल्याचा आणि धुंदी होती ती समोर एक मादी असल्याची. आता मात्र कमालीचा संयम सुटला "आरं भडव्या, व्हय ना बाजूला.... एक डाव सांगितलेलं समजत न्हाय व्हय नाय म्हणलेलं" म्हणत त्याला आपल्या पासून दूर रेटू लागली. पण त्याच्या आडदांड ताकदी पुढे तिचे हे प्रयत्न म्हणजे बालिश चाळे वाटत होते. शेवटी वासनेची आलेली गरळ ओकूनच तो तिच्यापासूनच दूर झाला. खिशातून शंभराच्या दोन नोटा काढल्या आणि तिच्याकडे फेकल्या. स्वतःचा शर्ट व्यवस्थित केला, पॅन्टच्या पाठीमागच्या खिशातून कंगवा काढून भांग पाडला आणि बाहेर पडण्यासाठी दाराकडे निघाला. दार उघडलं आणि बाहेर पडण्यापूर्वी एकदा तिच्याकडे पाहिलं. त्याला वाटलं आपल्याला पाहिजे तिथे सर्व्हिस मिळाली, कमलीला खुश करावं. त्यानं खिशातून अजून एक शंभराची नोट काढली आणि तिच्या दिशेनं भिरकावली. आणि समाधानी चेहऱ्याने बाहेर पडला. शंभराच्या तिन्ही नोटा जमिनीवर निपचीत पडल्या होत्या, कमळी सारख्याच. कमालीच्या डोळ्यात पाण्याचा डोह साठला होता. बराच वेळ ती जमिनीवर तशीच पडून होती. वाऱ्या च्या झुळुकीवर नोटांमध्ये थोडी हालचाल होत होती पण कमळी मात्र तशीच निपचीत पडली होती. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. तशाच उद्विग्न अवस्थेत कमळी त्या झोपडी बाहेर पडली. डोक्यात असंख्य प्रश्नां ची चक्रे वेगानं फिरत होती पण तिची चाल मात्र मंदावलेली होती.
हा सगळा प्रसंग साहेबांना पुन्हा आठवून सांगताना कमळी च्या डोळ्याच्या कडा आपसूकच पाणावल्या. दुःख शारीरिक वेदनेच नव्हतं. दुःख होतं ते स्वतःच्या शरीरावर सुद्धा आपली मालकी नसावी याचं. धंदेवाली असली म्हणून काय माझा माझ्या शरीरावर अधिकार नाही? हे शरीर कोणाच्या हवाली करायचं हा सर्वस्वी माझाच निर्णय हवा. पण तो निर्णय घेण्याची सुद्धा मुभा आपल्याला नसावी? साहेबांनी सगळी हकीकत ऐकून घेतली. "मला आता सांग, कोण होता तो? कुठं राहतो? तू ओळखते का त्याला?" कमळी पोलिस स्टेशन मध्ये आली होती ती पुरता निर्धार करूनच आली होती. माझ्या मनाविरुद्ध माझ्या सोबत कोणीही शरीर संबंध ठेवू शकत नाही, धंदेवाली असले तरी या शरीराची मालकीण आहे मी. माझ्यावर अन्याय झालाय, मला न्याय मिळालाच पाहिजे. "सायेब आदी माझी फिर्याद लिहून घ्या. त्यामंदी समदं सांगते, नाव, गाव, वळख. तुमी लिव्हायला तर घ्या" पूर्वानुभवातून तिच्या मनात शंका येत होती की साहेब कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा कायदेशील कारवाई करतील आणि प्रकरण रफादफा करतील. साहेबांना कमळी कडून अश्या उत्तराची अपेक्षा नव्हती. "एफ.आय.आर. तर दाखल करूच पण आधी कच्ची कंप्लेन्ट तर लिहून घेऊ दे" असं म्हणत साहेबांनी प्रिंटर मधला एक कोरा कागद काढला, खिश्याचा महागडा सोनेरी पेन काढला आणि कंप्लेन्ट लिहून घ्यायची तयारी केली. ती तयारी करत असताना तिच्याकडे न बघत साहेबांनी थोड्या हळू आवाजात विचारलं "पार्टी कशी आहे गं? मजबूत आहे का"? मघाशी मनात शंकेची पाल चुकचुकलेली होतीच पण या वाक्यानं तिला आता खात्री वाटू लागली की साहेब सेटलमेंटच करणार पैसे घेऊन. ती काही न बोलता खुर्चीत तशीच बसून राहिली. तिचा मानस ओळखून साहेबांनी आता स्पष्टच बोलायला सुरुवात केली. "हे बघ कमळे, तू बोलून चालून धंदेवाली. रोज किती जणांसोबत झोपतेस तुला तरी माहिती आहे का? बरं त्या बिचाऱ्यानं शंभर रुपये ज्यादा दिले पण म्हणतेस. आग याचा अर्थ तुला तुझ्या कामाचे जास्तच पैसे मिळाले ना? असं समज एका कस्टमरला बाहेर जाऊन सर्व्हिस दिली. कशाला विषय वाढवतेस? मी आत्ता तुझी एफ.आय.आर. फाडतो आणि कारवाई सुरू करतो. पण तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? सगळे हसतील तुझ्यावर. धंदेवाली वर कुठं रेप होत असतोय होय? उगी दार मोकळं ठेवून मोरीला बोळा लावायची काम करू नकोस. तुला त्याच्याकडून पैसेच काढायचे असतील तर तसं स्पष्ट सांग. तू फक्त तुझा आकडा सांग, मी तुला मिळवून देतो. उग हि असली कागद रंगवत बसलो तर त्यात ना तुझा काही फायदा आहे ना माझा. आपले इतके जुने संबंध आहेत म्हणून एवढ सांगतोय.
कंप्लेन्ट करून कोणाचाच फायदा नाही." कमालीची शंका खरी ठरली होती. पण अन्याय हा अन्यायच असतो ना? कि माणूस बदलला की अन्यायाच्या सुद्धा व्याख्या बदलतात? कोणीही माझ्या शरीराचा ताबा घेऊ शकत नाही माझ्या ईच्छे विरुद्ध, जरी मी शंभर जणां सोबत झोपत असले तरी. केवळ मी एक वेश्या आहे या कारणामुळे कोणालाही हि मुभा मिळू शकत नाही. पण साहेबांचं सगळं बोलणं ऐकून तिला वाटलं या भडव्याच मुस्काड फोडाव आणि विचारावं कि माझ्या जागी तुझी बायको असती तर किती रुपयात सेटलमेंट केली असती तू? आता ईथे थांबण्यात काहीच अर्थ नाही हे कमळी ओळखून चुकली. ती काहीही न बोलता उठली आणि तडक केबिन बाहेर पडली. ती निघून जाताना हातचं गिर्हाईक गेलं म्हणून साहेबांना जरा वाईट वाटलं पण ते केवळ बघत बसण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते.
आता पोलिसांच्या नादी लागण्यापेक्षा डायरेक्त वकीलाकडे जायचं आणि कोर्टातच आपली फिर्याद नोंदवायची. आणखी काय करता येईल ह्या विचारातच कमळी खोलीवर पोहचली. खोलीवर येताच चार बादल्या थंडगार पाणी अंगावर ओतून घेतलं. कधी नव्हे ते तिला स्वतःच्या शरीराचा राग येत होता. अंग थंड पडलं होतं पण डोक्यातील विचारांचं वादळ काही केल्या शांत होत नव्हतं. डोक्यात फक्त विचार, तर्क आणि वितर्क. झोपण्याचा प्रयत्न करीत होती पण डोळ्याला डोळा काही केल्या लागत नव्हता.एकदा वाटायचं की आपल्या नेहमीच्या वकील कडे जावं. एरियात रेड पडली किंवा एखादी पोरगी लॉजवर सापडली कि त्यांना तो सोडवून आणायचा. तर परत वाटायचं लॉजवरून पोरी सोडवणं आणि ही केस फार वेगळी आहे. त्याला जमेल का? की त्याच्यापेक्षा दुसराच एखादा चांगला वकील गाठावा? कमलीला भांजाळल्यागत झालं होतं. समजत नव्हतं नेमकं काय चूक काय बरोबर, काय करावं काय करू नये. काहीच सुचत नव्हतं. यासगळ्यात पहाटे पहाटे कधी डोळा लागला कमलीला सुद्धा समजलं नाही. आज तिच्या शरीरापेक्षा मनच जास्त दमल होतं.
सकाळी जाग आली ती खिळीत सुरु असलेल्या रेखा आणि मिनलच्या मस्कराच्या बाटलीवरून चाललेल्या कुरबुरीमुळे. झोप मोड झाल्यामुळे दोघींवर खेकसून कमळी आवरण्यासाठी उठली. अंघोळ वगैरे करून साधी साडी घालून कमळी तयार झाली. पण इतक्या वर्षात भडकपणा तिच्यात असा मुरला होता की तिच्या साध्य वेशातपण तिचं वेगळेपण गर्दीतसुद्धा तिला गर्दीपासून वेगळं करायचं. सकाळी नऊ दहाच्या सुमारास कमळी वकिलाच्या ऑफिसात जाऊन धडकली. खोलीवर दाखवली जाणारी जवळीक आणि आपलेपणा वकील आज ऑफिसमध्ये दाखवत नव्हता. बाहेर आपलं काहीही नातं असलं, संबंध कितीही जवळचे असले तरी ऑफिसमध्ये कोणी आलं तर दोघात फक्त वकील आणि आशील एवढंच नातं वकील साहेब सांभाळायचे. शेवटी ज्याच्या त्याच्या धंद्याची तत्व ज्याची त्यानंच संभाळायची असतात. डेली रुटीन प्रमाणे कमलीला चहा पाणी झालं. "बोला, काय झालं? कोणत्या पोलिस स्टेशनमध्ये आहेत पोरी? किती जणी आहेत"? कमळी कडून काहीच उत्तर न आल्याने फायली मधलं डोकं वर काढून उत्तराच्या अपेक्षेने चष्म्याच्या फटीमधून वकीलान तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही गप्पच होती. कमळी स्वतःच्याच विचारात हरवून गेली होती. तिला भानावर आणत वकीलानं पुन्हा एकदा तिला विचारलं "अगं मी काय विचारतोय? कितीजणी आहेत आणि कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत"? "कुनालाच नाय सोडवायच सायेब. फकस्त तुमची मदत पायजे. काळ पोलिस चौकीवर गेलते. पन माझ्यावर अन्याय होऊ शकतो हेच त्यास्नी पटत न्हाय. धंदेवालीवर कुठ रेप व्हतो का? हयोच प्रश्न समद्यांच्या तकुऱ्यात. म्या काय बाय माणूस न्हाय? मन बाटल आन शरीर नासवल म्हणून मला दुसरा कायदा व्हय? स्वतःच शरीर इकन ह्यो माझा धंदा हाय सायेब. तुमच्या सारखं हायत म्हणून ईकाव लागत स्वतःला या हरामी बाजारात. तुमच्या बी धंद्यात तुमी खऱ्याचं खोटं आन खोट्याच खरं करताच की. समद्यांना माहितीय तरी बी तुमाला कुनी ये खोटारड्या नाय म्हनत. ओ वकील सायेब मनत्यात. आमच्या कामात नाय आमी कुणाची फसवणूक करत. दिलं तर समाधानच देतो तरीबी मग आमास्नीच असा दुसरा कायदा कशापाय?" वकिलाला नेमकं समजेना हि अशी का बोलते आहे. क्षणभर विचार करून व थोडं गंभीर होऊन त्यानं विचारलं "मला समजेल अशा भाषेत सांगशील का नेमकं काय झालंय ते"? कमळी एवढी वैतागली म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं लफडं असणार ह्या विचाराने मनातल्या मनात फी किती आणि कश्या स्वरूपात वसूल करावी याची आकडेमोड सुरु झाली. नेहमीच्या सवयी प्रमाणे वकील साहेब आपल्या आशिलाला धीर देऊ पहात होते. पण असल्या कोरडया सहानुभूतीचा, सांत्वनाचा कमलीला कंटाळा आला होता. कंटाळा म्हणण्यापेक्षा तिला किळस वाटायला लागली होती. वकीलान चार पाच कोरे कागद काढले. डावी बाजू मुडपून त्याचा समास केला हातात पेन घेतला आणि विचारलं "सांग, काय काय झालं? कसं झालं? कुठं झालं? अगदी सविस्तर सांग सुरवाती पासून" कित्येकदा शैया सोबत केल्यामुळे वकील साहेबांपासून काहीही लपविण्यासारखं नव्हतं. कमळीनं तिची कॅसेट परत रिवाईंड केली आणि पहिल्या पासून लावली. ती प्रसंग आठवताना तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता तरीही ती बोलत राहिली. वकील त्याला महत्वाचे वाटणारे मुद्दे कागदावर खरडत होता. एखादा मुद्दा समजला नाही तर परत नीट विचारुन घेत होता. व्यवस्थित उलगडा झाला की तो मुद्दा दुरुस्त करीत होता. कमळी सगळं ईत्यभूत सांगत होती. आपला आशील आपल्याला खरोखरच खरी माहिती सांगतोय कि स्वतःच्या सोयीनं सोयीस्कर बदल करून सांगतोय हे वेळोवेळी तपासून पहात होता. वकील मधूनच तिला थांबवायचा आणि न समजल्याचा आव आणून आधी सांगितलेल्या मुद्द्या बद्दल विचारायचा. मग आधीची मिळालेली माहिती आणि नव्यानं मिळालेलं स्पष्टीकरण यात काही तफावत येते का ते पडताळून पहायचा. वकीलान जवळपास सगळ्या कसोटीवर कमलीला पारखून पाहिलं. कमळी खरचं खरं बोलत आहे याची त्याला खात्री पटली.
कमळीनं घडलेला सगळा प्रसंग आणि पोलीस स्टेशनमध्ये मिळालेली वागणूक सांगितल्यावर कमळीपेक्षा वकीलालाच त्या पोलीस अधिकाऱ्याचा जास्त राग आला. "आता तू नुसतं बघचं, मी त्या अधिकाऱ्याला कसा सुता सारखा सरळ करतो ते. अंगावर वर्दी आली म्हणजे कसही वागणार काय हे लोक? स्वतःला समजतात तरी कोण हे? तू नुसतं बघचं आता त्याची मस्ती कशी उतरवतो ते." असलं आणि अजून बरच काही नकली आणि काळजीवाहू बोलून झाल्यावर त्याला थोडी आपली एनर्जी कमी झाल्या सारखं वाटलं. मग बेल मारून त्यानं प्युन कम ज्युनियरला बोलावून दोन कॉफी आणायला सांगितल्या. आता टेबलावरचे मघाशी खरडलेले कागद नजरेखालून तो घालू लागला. वाचताना मधूनच त्यानं दोन चार पुस्तकं काढली, तीन चार किलो वजनाची. खरडलेले मुद्दे आणि त्या अनुषंघाने त्या पुस्तकात काही तरी शोधलं. परत त्या कागदा वर काही तरी नोंदी केल्या. कमालीचं सगळं सांगून झालं होतं. आता वकिलाच्या हालचालींकडे पाहण्या पलीकडे ती काहीच करू शकत नव्हती.अचानक वकिलाला काहीतरी आठवलं. त्यानं एक दोन कागद चाळले आणि एक कागद हातात घेऊन कमळी ला विचारलं "हि घटना केव्हा घडली"? "काल.... सांजच्या वक्ताला" कमळीच हे उत्तर ऐकून वकील थोडा निराश झाला. त्यानं सगळी पुस्तकं मिटली आणि टिपणं काढलेले कागद बाजूला सारले. त्याच्या चेहऱ्याच्या रंगात झालेला बदल कमळीला सुद्धा जाणवला. बाजूला सारलेली कागद पेपरवेट खाली ठेवली आणि खुर्चीला पाठ टेकत, एक हात खुर्चीमागे नेत आरामात मागे पुढे करत तिला म्हणाला "काल मेडिकल केली का तुझी"? कमलीला काहीच समजलं नाही. औषध आणि कंडोम मिळतात त्या दुकानाला मेडिकल म्हणतात एवढीच तिला माहिती होती. तिला वाटलं काल झाल्या प्रसांगान आपल्याला काही शारिरीक दुखापत अथवा ईजा झाली असेल म्हणून काळजीपोटी वकील विचारत असेल असे तिला वाटलं. स्वतःच्या बुद्धीच्या कुवतीनुसार विचारल्या प्रश्नाचा अर्थ लावून कमळीनं उत्तर दिलं "आवं त्याला औषधपानी कशाला लागतंय? रोज सतराशे साठ जणं ठोकट्यात. तिथल्या जागच्या वेदना कवाच मरून गेल्यात. आता काय बी वाटत न्हाय बगा" अगदी निर्विकारपणे तिनं सांगितलं. वकिलाच्या लक्षात आलं की तिची काही तरी गल्लत झालीय. मग त्याने एखाद्या बलात्कार झालेल्या स्त्रीची मेडिकल करणं म्हणजे नेमकं काय ते नीट समजावून सांगितलं. काल पोलिस स्टेशनमध्ये घडल्या प्रकारानं व्यथित होऊन ती डायरेक्त तिच्या खोलीवर गेली होती. खोलीवर सुद्धा कोणालाच काहीच बोलली नव्हती. त्यामुळे खोलीवर जरी कोणाला याबाबत माहिती असली तरी ती कमळीला मिळण्याचा प्रश्नच नव्हता. "बरं.... असू दे... आज आंघोळ केली आहेस का? आणि आतले कपडे धुतले आहेत की तसेच आहेत"? किमान अंघोळ झाली नसेल तर कपड्यांवरून आणि शरीरा वरून काही डी. एन.ए. सॅम्पल मिळतील या अपेक्षेने वकीलान विचारलं. अशा केस मध्ये हुकमी एक्क्याचं पान म्हणजे डी. एन.ए. टेस्ट. पण कमळीन काल खोलीवर चार बादल्या अंगावर ओतून घेतल्या होत्या आणि आज सकाळी स्वच्छ अंघोळ केली होती. त्यामुळे हे कळताच वकिलाचा पुरता भ्रमनिरास झाला. आणि एकंदरच हि सगळी एक होपलेस केस आहे हे त्याच्या लक्ष्यात आलं. मग कोणी प्रत्यक्षदर्शी होतं का? कोणी तुला आणि त्याला एकत्र शेताकडे जाताना पाहिलं होतं का? रेप होताना कोणी पाहिलं का? अशा प्रश्नाची सरबत्ती सुरु केली. यातल्या एकाही प्रश्नाच उत्तर होकारार्थी नव्हतं. आता कमळी चा बांध फुटला "व्हती कि ती चांडाळ चौकडी. पर ती बी त्येचीच मानस. त्याच्या इरोधात कसं बोलत्याल? समजा तुमालाच माझा रेप करायचा असता तर तुमी किती जणांसमोर केला असता? काय ईचारता सायेब? तुमच्या सोबत ते मी राजी खुशीत बसते तरी बी कुनाला काय बी दिसू नये म्हणून मदी पडदा असतोय. वकिलाला त्याच्या कपाळावर थोडा ओलसरपणा जाणवला. त्यानं हळूच मागच्या खिश्यातून पांढराशुभ्र रुमाल काढला आणि कपाळ कोरड केलं. तिच्या या बोलण्यानं वकील निरुत्तर झाला होता. शेवटी एक मोठा सुस्कारा टाकत त्यानं कमळी ला सांगितलं "हे बघ कमळे, तुझ्याकडे कोणताच साक्षीदार नाही की कसलाच पुरावा सुद्धा नाही. आता आपण फिर्याद जरी नोंदवायला भाग पाडली तरी कोर्टात केस जास्तकाळ टिकणार नाही. जसं तुझ्याअवर अन्याय झालाय हे खरं आहे तसंच मी सांगतोय ते सुद्धा खोटं नाही. केस करून तुझा काही फायदा होईल असं काही वाटत नाही. यापेक्षा एक काम करू, तुझ्यावर ज्या कोणी अन्याय केला त्याकडून चांगला आर्थिक मोबदला घेऊन हे प्रकरण इथेच थांबवलेलं बरं" वकीलाचं हे बोलणं ऐकून कमळीला वाटलं तो पोलिस स्टेशन मधला साहेबच वकिलाच्या वेशात येऊन बोलतोय. हि सगळी माणसं एकाच जातकुळीची वाटत होती कमळीला कोणावर अन्याय झाला की त्यात न्याय मिळावून देण्याच्या नावाखाली आपल्या घशात मलिदा कसा पडेल याच्यासाठीच सगळा आटापिटा. जेवढ्या आशेने आणि मदतीच्या अपेक्षेने कमळी वकीलाकडे आली होती त्यापेक्षा कित्येक पटीने दुःखी आणि निराश होऊन ती त्याच्या ऑफीसामधून बाहेर पडली. आपल्याला न्याय मिळणं केवळ अशक्य आहे या विचारानं कमळी खोलीच्या दिशेनं सरकू लागली. आता पुढं काय करावं? कुठं, कशी आणि कुणाकडे दाद मागावी काही समजत नव्हतं. पण काहीही करून त्या माणसाला अद्दल घडली पाहिजे असं तिला वाटत होतं. म्हातारी मेल्याच दुःख नव्हतं पण काळ सोकावेल याची भीती होती. खरंच हा समाज किती कातळ पाषाणासारखा कठोर आहे नाही. माझ्यातल्या धंदेवाली कडे वखवखल्या नजरेनं पहाताना मी सुद्धा एक स्त्री आहे या मूळ गोष्टीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करणारा. स्त्री म्हणजे जर केवळ उपभीगाची, हक्काची वस्तू म्हणून तिच्याकडे पहाणाऱ्या समाजाला कोणत्याही स्त्री देवतेला पूजण्याचा नैतिक अधिकार आहे? किती हि दांभिकता? किती हे दुतोंडी गांडुळासारखं वागणं?
डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं होतं, दिशा सापडत नव्हती. मेंदूला आलेल्या झिणझिण्या अंगभर पसरत होत्या आन उपाय सुचत नसल्यामुळं आपोआप ओसरत पण होत्या. पण यासगळ्याशी तिच्या पर्स मधल्या मोबाईलला काहीही देणंघेणं नव्हतं. दर दोन चार मिनिटांनी तो आवाज करून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. सुरुवातीला कमळीच लक्षच नव्हतं, नंतर लक्ष गेलं पण तिनं दुर्लक्ष केलं. आता मात्र त्या डिस्टर्ब करणाऱ्या आवाजानं ती वैतागली. नेमका कसला एवढा आवाज काढतोय ते पहायला तिनं मोबाईल काढला. तेवढ्यात परत मोबाईलने आवाज केला आणि त्यासोबत एक मेसेजपण आला की 'आपल्या फोनची मेमरी फुल झाली आहे. कृपया काही आयटम डिलीट करा'. आता काल तळ्यावर जाताना तर मोबाईल घेतला होता. आणि सगळा मोबाईल एकदम रिकामा करून घेतला होता तरीही हा असा मेसेज? नक्की आपल्या मोबाईलला काय झालं हे पहाण्यासाठी तिनं ते बटन दाबलं. नीट निरखून पाहिलं. इतकावेळ कोमेजलेला आणि काळजीनं काळवंडलेला तिचा चेहरा एकदम खुलला. चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली.
त्यादिवशी तळ्यावर गेल्यावर काही निवडक ठेवलेली गाणी ऐकून झाल्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे कमळीनं मोबाईल ब्लाऊज मध्येच ठेवला होता निघताना. ती तळ्यापासून निघाल्यापासून ते त्या कस्टमर सोबत त्या झोपडीत जाई पर्यंतच सर्व काही रेकॉर्ड झालं होतं. पण झटापट सुरु झाली आणि मोबाईल जमिनीवर पडला. त्यात आता फक्त त्या झोपडीचा पत्रा दिसत होता पण आवाज मात्र सुस्पष्ट होते. तिचा नकार स्पष्टपणे छापला गेला होता. कमळी मनोमन सुखावली होती आता. तिला वाटलं केवळ पुरावा नाही म्हणून माझ्यावर झालेल्या अन्यायाची सौदेबाजी करणाऱ्या सगळ्यांच्या मुस्काडात मारेल असा पुरावा आहे आता आपल्या हाती. आता ना पोलिस स्टेशन, ना वकील. थेट प्रेस वाल्यांकडे जायचं. मग तेच या सगळ्याचा पाठपुरावा करतील. सगळ्यांना धारेवर धरतील. थोडं थांबली स्थिर झाली आणि परत विचार केला की एवढं सगळं करून आपल्याला खरचं न्याय मिळेल? कि तिथंही अशीच सौदेबाजी चालेल? आपला प्रेक्षकवर्ग वाढावा म्हणून माझी वस्तुस्थिती तिखटमीठ लावून एकदम चमचमीत करून दाखवली जाईल? आज फक्त एका गावात बदनाम असलेली मी एका क्षणार्धात देशाच्या प्रत्येक घरात बदनाम होईल. आणि माझी तशी बदनामी करताना कोणाला काहीही वाटणार नाही. स्वतःच्या अब्रुचा रोज दोनशे रुपयात सौदा करणाऱ्या धंदेवालीची बदनामी कशी काय होऊ शकेल नाही का? सगळेजण आनंदानं सकाळच्या चहा सोबत या बातमीचा आस्वाद घेतील. चॅनलचा प्रेक्षकवर्ग वाढेल आणि सकाळच्या चहावेळी गप्पा मारण्यासाठी अनेकांना एक विषय मिळेल एवढंच काय ते होईल. आणि यासगळ्यात माझ्यावर झालेला अन्याय सगळेच जण सोयीस्करपणे विसरून जातील. कारण इथे प्रत्येकाला रोज काही ना काहीतरी नविन लागतं. कोणाला बाई, कोणाला बाटली आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित सुशिक्षित लोकांना बातमी. न्याय मिळेलच याची खात्री??? कुठेच नाही.....
दोन मिनिटं शांतपणे विचार केला आणि मनाचा पक्का निर्धार करून तिनं तो व्हिडीओ डिलीट केला. मोबाईल परत ब्लाउजमध्ये ठेवला. आता मोबाईल आणि मन दोघेही स्थिर, शांत झाले होते. गती संथ होती पण त्यात एकप्रकारचा आत्मविश्वास जाणवत होता. चालता चालता तिला एक विचार सुखावून गेला आणि ती स्वतःशीच हसू लागली. तिला वाटलं आपली आणि या देशाच्या लोकशाहीची अवस्था एकसारखीच तर आहे. कोणीही मग्रूरनं यावं आणि हवं तसं ठोकून जावं. सगळ्यांना सगळं कळतं, माहिती असतं, सगळं दिसतं फक्त योग्यवेळी योग्य तो पुरावा मिळत नाही म्हणून मग दोषी सुद्धा उधळ माथ्यान, मोकाट वावरतो समाजात स्वतःच्या प्रतिष्ठेची नकली कातडी अंगावर वागवत. खरंच आपली अवस्था ही डोळे असून आंधळ्या, कान असून बहिऱ्या, तोंड असून मुक्या आणि पाय असून लंगड्या लोकशाही सारखीच तर आहे. आता कमळीला स्वतःच दुःख थोडं हलकं झाल्या सारखं वाटत होत तिला आता कोणीतरी समदुःखी मिळालं होतं...... लोकशाही.