Bluepadएसपी बालसुब्रमण्यम – तुझ बिन तरसे नैना
Bluepad

एसपी बालसुब्रमण्यम – तुझ बिन तरसे नैना

Saurabh Zemse
Saurabh Zemse
29th Sep, 2020

Share

“आते जाते, हसते, गाते, सोचा था मैंने मन में कई बार”

अत्यंत निरलस शब्द, सहज चाल आणि सुंदर गायकी असलेलं हे गाणं आमच्या पिढीचं अँथम बनलं होतं. असं म्हणतात की, उमलत्या वयात तुम्ही जे काही ऐकता, पाहता आणि आत्मसात करता ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहतं. हे गाणं सुद्धा त्यापैकीच एक. त्यातलं पुरुषाच्या आवाजातील “यही सच है, शायद, मैने प्यार किया” हे पद तर आम्हा मुलींसाठी जीवघेणं ठरायचं. गायकाने ते इतकं समरसून गायलेलं होतं की ते आपल्यासाठीच म्हटलं गेलं आहे असं वाटायचं, आजही तसंच वाटतं. हा जीवघेणा आवाज एसपी बालसुब्रमण्यम यांचा होता हे कळल्यानंतर समस्त कानसेन त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर आलेल्या सलमान खान आणि इतर कलाकरांच्या सर्व चित्रपटांच्या ऑडिओ कॅसेट्स एसपींच्या गाण्यासाठी विकल्या जायच्या. त्यांच्या आवाजातील थोडा रवाळ मधाळपणा “मेरे रंग में रंगने वाली” सारख्या रोमॅंटिक गाण्याला खोडकर बनवायचा तर “रोजा जानेमान” सारख्या दु:खी गाण्याला अधिक दर्दभरा करायचा. असा हा आवाज एक पोकळी निर्माण करून कायमचा शांत झाला आहे. एसपींचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते.
गेल्या महिन्यात एसपी यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांना चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासाअंती ते कोविड-१९ पॉजिटिव निष्पन्न झाले. तेंव्हापासून त्यांचा कोरोनाशी लढा सुरू होता. २५ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १ च्या सुमारास रुग्णालयाने एसपी निवर्तले असल्याचे जाहीर केले आणि समस्त मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.
एसपींचे पूर्ण नाव श्रीपति पंडितराध्युला बालासुब्रमण्यम आहे. त्यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लौर इथे झाला. त्यांचे वडील एसपी संबामूर्ति हे हरिकथा सांगायचे. त्यांचेच गायकीचे गुण बहुधा एसपी बालसुब्रमण्यम यांच्यातही उतरले असावेत. त्यांची आई सकुंतलम्मा ह्या गृहिणी होत्या, त्यांचं २०१९ मध्येच निधन झालं. एसपी यांना २ भाऊ आणि ५ बहिणी होत्या. त्यांची एक बहीण एसपी शैलजा ह्या दक्षिणेतील एक नावाजलेल्या गायिका आहेत.
एसपी यांनी गाण्याचं रीतसर शिक्षण तर घेतलं पण त्यांनी चेन्नईच्या जेएनटीयू ह्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पण त्यांना टायफोइड झाल्यानंतर त्यांनी आपलं शिक्षण सोडलं. पण त्याच सोबत त्यांनी गाण्याचं शिक्षण कायम ठेवलं. १९६४ मध्ये तेलगू संस्कृतिक संस्थेने आयोजित केलेली गायन स्पर्धा त्यांनी जिंकली. त्यांनी एक ग्रुप तयार केला ज्यात इलयाराजा सारखे दक्षिणेतील काही दिग्गज कलाकार सुद्धा होते. १५ डिसेंबर १९६६ रोजी पार्श्वगायक म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली ती “श्री श्री श्री मर्यादा रामन्ना” या तेलगू चित्रपटात. १९६९ मध्ये “एयर्कई एन्नुम इलाया कन्नी” हे पहिलं तामिळ गाणं त्यांनी गायलं. त्यानंतर त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केलं. त्यांनी इलयाराजा आणि एस. जानकी यांच्यासोबत सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अनेक गाणी गायली. १९८० साली “संकराभरनम” या चित्रपटातील “संकरा नादसरीरापरा” या गाण्याने त्यांना अंतर्राष्ट्रीय ख्याति मिळवून दिली. या गाण्यासाठी त्यांना त्यांचं पहिलं राष्ट्रीय परितोषिक मिळालं.
त्यानंतर आला “एक दुजे के लिए”. भारतीय चित्रपट सृष्टीत माइल स्टोन ठरलेल्या या चित्रपटच्या यशात त्याच्या गाण्यांचा फार मोठा सहभाग होता. मग ते “तेरे मेरे बीच में” असू दे की चित्रपटांच्या शीर्षकांवर आधारलेलं “मेरे जीवन साथी” हे गाणं असू दे. एसपींना या सर्व गाण्यांसाठी दुसरं राष्ट्रीय परितोषिक मिळालं. त्यांनी इलयाराजा आणि एस. जानकी यांच्यासोबत १९८३ साली गायलेल्या “सागर संगम” आणि १९८८ साली गायलेल्या “रुद्रवीरा” या गाण्यांसाठी त्यांना आणि इलयाराजा यांना राष्ट्रीय परितोषिक मिळालं.

“हम आपके है कौन” या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि सलमानखानचा आवाज म्हणून ते ओळखले जाऊ लागले. मात्र त्यांनी अनेक कलाकारांना आवाज दिला आहे. यात कमल हसन, संजय दत्त, अरविंद स्वामी असे अनेक कलाकार आहेत. त्यांनी भारतातील जवळपास सर्वच संगीतकारांसाठी गाणी गायली आहेत. तब्बल ६ भारतीय भाषांमधील चाळीस हजार गाणी त्यांच्या नावावर आहेत. यासोबत कैक स्टेज शोज आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले आहेत.
एसपी हे उत्तम अभिनेते सुद्धा होते. त्यांनी “मुकाबला” या चित्रपटात प्रभुदेवाच्या मित्राची भूमिका अगदी उत्तम वठवली आहे. २०१६ मध्ये त्यांना “इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया” तर्फे “सिल्वर पीकॉक मेडल” देऊन सन्मानित करण्यात आलं. २००१ मध्ये पद्मश्री आणि २०११ मध्ये पद्मभूषण हे पुरस्कार त्यांना मिळाले.

“तिकीट खरीद के, बैठ जा सीट पे, निकाल ना जाए कहीं चेन्नई एक्सप्रेस” हे वयाच्या सहासष्टाव्या वर्षी गायलेलं गाणं एखाद्या तरुण गायकालाही लाजवेल एवढं एनर्जेटिक आहे. हे त्यांचं शेवटचं कमर्शियल गाणं आहे. अलीकडे कोविड योद्ध्यांच्या सन्मानार्थ इलयाराजा यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यात एसपी सुद्धा गायले. असा हा मखमली आवाज आता शांत झाला आहे. त्यांचा पुढील प्रवास सुखकर होवो, ही प्रार्थना.

30 

Share


Saurabh Zemse
Written by
Saurabh Zemse

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad