Bluepadजीवाची मुंबई........ नि आयुष्याची दुबई.
Bluepad

जीवाची मुंबई........ नि आयुष्याची दुबई.

डॉ अमित.
डॉ अमित.
27th Sep, 2020

Share

जीवाची मुंबई..... नि आयुष्याची दुबई.


आपण म्हणतो ना कधी कधी काय यार सारखं सारखं तेच तेच आयुष्य जगायचे चला एखाद्या दिवशी जीवाची मुंबई करू,म्हणजे काय तर मनातल्या सुप्त इच्छा मनसोक्त पूर्ण करून हवे तसे जगून बघणे.
तसाचं काहीसा विचार करून ठरवले की आपण पण तसचं करू पण इथे नव्हे तर
दु-नियेतले ब-रेच अजुबे ई-कठ्ठे ज्या देशात आहेत त्या दुबई येथे जावून.
तीन चार महिन्यांपूर्वी आलेला हा विचार माझ्या
जीवा-भावाच्या मित्रास बोलून दाखवला.हो नाही हो नाही करत तो ही तयार झाला आणि बघता बघता आमचा दुबई वारीचा वार जवळ येवून ठेपला.

पहाटे पहाटे विमानातूनच दिसणारा सोनेरी दिव्यांचा झगमगाट सोन्याच्या दुबईत पाऊल ठेवण्यापूर्वी मनाला सुखावून गेला,लखाकून गेला.
विमानतळ ते हॉटेल पर्यंतच्या प्रवासाला घ्यायला आलेली एक छान चकाकती आरामदायी गाडी आम्हाला
भुरदिशी कधी हॉटेल पर्यंत घेवून गेली कळलेच नाही.
आमच्या ट्रिप ची सुरुवातच झाली ती डेझर्ट सफारी ने.डेझर्ट सफारी म्हणजे काय तर एका छानश्या आरामदायी (Land Cruiser) हवा सोडलेल्या गाडीत बसून वाळूंच्या चढ उतारावर हिंदोळे घेणारा फेरफटका.
आमचा त्या गाडीचा ड्रायव्हर होता पाकिस्तानी.
आम्ही भारतीय म्हटल्यावर खूप अदबीने आणि प्रेमाने बोलला आमच्याशी.जणू कोणी आपलाच जवळचा मित्र दूर देशी गेल्यावर भेटतो बोलतो अगदी तसा.
डेझर्ट सफारी हा तर आमच्या रोमांचकारी दुबई सफरीचा ट्रेलर होता,खरा चित्रपट तर अजुन बाकीचं होता.

मिरेकल गार्डन म्हणजे जादुई दुबई नगरीचा जादुई बगीचा.आयुष्यात कधीच बघितली नसतील इतक्या विविध प्रकारची फुले जवळ जवळ ५० लाख प्रकारची फुले,त्यांची रंगसंगती त्यांना दिलेला वेग वेगळा प्राण्यांचा कार्टून्सचा आकार डोळ्यांची पारणे फेडत होता.

बुर्ज खलिफा..एक अनोखा आविष्कार
मानवनिर्मित जगातील सर्वात उंच इमारत (८२८ मीटर) जिला बांधायला ५ वर्षे लागली.जिच्यात १६३ मजले आणि ५७ लिफ्टस आहेत.फक्त एक ते दीड मिनिटं लागली असतील आम्हाला १२४ व्या मजल्यावर पोहोचायला.तेथून दिसणारे दुबई शहर म्हणजे आकाशच जणू खाली अंथरले आहे हा सुंदर नयनरम्य आभास.
साफ करायला सुरु केले की ३ महिने लागतात आणि लगेच दुसरा राऊंड सफाईचा सुरू होतो.
संध्याकाळच्या वेळी केली जाणारी बुर्ज खलिफा ची रोषणाई,त्याला जोडून असलेला म्युझिकल फाऊंटन शो आणि लागूनच असलेला दुबई मॉल जणू त्रिवेणी संगम होता सुंदरतेचा.
बॉलिवूड थीम पार्क,हिंदी चित्रपट सृष्टीला समर्पित मायानगरी.
ज्यात आम्ही पहिल्यांदाच रावण,क्रिश, शोले,लगान ,डॉन या हिंदी चित्रपटांचा अनोखा अदभुत ४ डी अवतार पाहिला,अनुभवला.
अबु धाबी ची ग्रँड मशीद म्हणजे वास्तू कलेचा आणि श्रध्देचा अनोखा संगम.जिच्यात जगातील सर्वात मोठा हाताने बनविलेला गालिचा जो की नमाज पढण्या साठी तयार केला आहे.
फरारी वर्ल्ड...अबू धाबी चा आणखी एक रोमांचकारी अंगावर शहारे आणणारा प्रकल्प.
जिथे आम्ही चार अश्या राईड केल्या की ज्या आम्ही आयुष्यात कधीच अनुभवल्या नव्हत्या.
पोटात गोळा येणं,जीव मुठीत घेणं,प्राण कंठाशी येणं,हृदयाचा ठोका चूकणं,श्वास रोखून धरणे या आणि अश्या बऱ्याच मराठी म्हणी आणि त्यांचा अर्थ आम्ही पहील्यांदाच शब्दशः अनुभवला.
अटलांटिस द पाम.....सर्वात मोठा वॉटर पार्क जिथे एका बाजूला पंच तारांकित हॉटेल्स ची श्रेणी एका रांगेत थाटाने उभी आहे तर दुसरीकडे दुबई सारख्या वाळवंटी भागात इतकया पाण्याचा वापर करून निर्माण केलेलं पाण्याचं आगळ वेगळं जग.
या वॉटर पार्क मध्ये आम्ही सर्वांनी नवनवीन आणि रोमांचकारी पाण्यातल्या राईड केल्या.अक्षरशः आम्ही सगळे दिवसभरात कित्येकदा धुवून निघालो आणि परत वाळलोही याची आम्हालाच गिनती नाही.
थंडी आणि थ्रील यांचा अनोखा संगम आम्ही एकाच वेळी अनुभवत होतो.
ग्लोबल व्हिलेज...सर्व दुनिया दुबईत सामावून घेणारं एक छोटंसं खेडं.जिथे सगळ्या जगाचं कल्चर थाटात उभं केलं आहे,साकारले आहे.
इथे असणारं सगळ्यात अंगावर शहारे आणणारे आकर्षण म्हणजे इथला स्टंट शो.दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचा अफलातून स्टंट शो.जणू एखादी गाड्या हवेत उडवत खिळवून ठेवणारी हॉलिवूड स्टंट फिल्म लाईव्ह पाहतो आहोत असं २० मिनिटे एकसारखं जाणवत राहतं.या सर्व स्टंटमन ना त्रिवार सलाम.
दुबई डॉल्फिनारियम..डॉल्फिन माश्यांचा अनोखा शो.जिथे डॉल्फिन मासे वेगवेगळ्या कसरती पाण्यात व पाण्याबाहेर करून आपल्याला दंग करून सोडत होते.
बुर्ज अल अरब....एकमेव सप्त तारांकित हॉटेल जे की समुद्र किनारी जुमेराह बीच वर निसर्गरम्य वातावरणात दिमाखाने उभे आहे.
दुबई फ्रेम....एक अशी अदभुत फ्रेम १५० मीटर उंच जगातील सर्वात उंच फ्रेम जिच्या एका बाजूला जुने दुबई शहर तर दुसऱ्या बाजूला मॉडर्न दुबई.त्या फ्रेम च्या सर्वात उंच मध्यभागात काचेवरून जेंव्हा आम्ही खाली पाहत पाहत चाललो त्या वेळी अक्षरशः आम्हाला गरगरल्याचा भास होत होता.

या सर्व दुबईच्या अनोख्या दुलईत आम्हाला मात्र अधून मधून ह्रुदयात धडकी भरवत होते ते दुबईचे दिर्हम(AED).
आपल्या पेक्षा वीस पट जास्त मजबूत तिथला रुपया.
साहजिकच तिथल्या वस्तू पण आपल्या पेक्षा वीस पट महाग.जिथे पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त ते हे दुबई
जिथे रस्ते एकदम स्वच्छ ते हे दुबई
जिथे जागतिक रेकॉर्डस जणू वाहतात ते हे दुबई
जिथे नियम मोडला की भरगच्च फाइन लागतो ते हे फाइन दुबई
जिथे स्त्रियांचा खूप आदर केला जातो ते हे दुबई
जिथे अरबी कमी आणि भारतीय जास्त आहेत ते हे दुबई
जिथे सोने चकाकते आणि मने उजळते ते हे दुबई
जिथे पाऊस कमी पण हौस जास्त ते हे दुबई.
जिथे पिकते कमी पण विकते जास्त ते हे दुबई

मी असं ऐकलं होतं की दर दोन ते तीन वर्षांनी दुबई मध्ये नवनवीन आश्चर्यांची भर पडत असते त्यामुळे मला वाटतं,नव्हे त्यांचं ते ध्येयचं आहे की २०२१ पर्यंत टुरिझम मध्ये जगात नंबर एकवर पोहोचण्याचं.कारण जे निर्माण करायचं ते वर्ल्ड रेकॉर्डच्या उद्देशानेच अशी दुबई ची ख्याती आहे.

अशी ही आमची दुबई ट्रिप शेवटच्या टप्प्यात आली ती म्हणजे परतीच्या प्रवासाला.
सहा दिवस अक्षरशः हा हा म्हणता सहजच गेले आणि हो खिशाचा भार पण हा हा म्हणता हलका कसा झाला कळलंच नाही.
थोडीशी गम्मतं....जाता जाता.

पुन्हा भेटू असेच तुम्ही आणि मी जगण्याच्या या सफरीत.
कसा वाटला तुम्हाला माझा हा दुबई सफरीचा प्रवास,
नक्कीच तुम्हीही माझ्या सोबत होता असा अनुभव आला की नाही लेख वाचल्यावर,आला ना?
अवश्य कळवा.

डॉ अमित.


44 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad