Bluepadमला बी पर्यटनाला येऊंद्या की रं..
Bluepad

मला बी पर्यटनाला येऊंद्या की रं..

Madhura
Madhura
27th Sep, 2020

Share


“पायाने केला जातो तो प्रवास आणि मनाने केली जाते ती यात्रा.”
या वाक्यात एकाच प्रक्रियेची दोन रूपं दिसतात. त्यात मुंबईतील लोकांना (अर्थात लॉकडाउनच्या आधीच्या) प्रवासाविषयी विचारलं तर ते “नको तो प्रवास” असंच उत्तर येईल. कारण हा प्रवास जरी भाकरीचा चंद्र मिळवण्यासाठी होत असला तरी तो करणार्‍याच्या अंगात आभाळात कडाडणारी वीज पकडण्याची धमक असावी लागते. हा प्रवास फार कमी वेळा आनंददायी असतो. पण तो रोजचा प्रवास असल्यामुळे आज आपण त्याच्याविषयी बोलणार नाही आहोत. आज आपण काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा संस्कृतिक सौहार्द जपण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रवासाविषयी बोलणार आहोत. निमित्त आहे आजच्या जागतिक पर्यटन दिनाचं. सर्वात आधी सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा.
आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. दरवर्षी एक राष्ट्र याचं यजमान पद स्वीकारतो आणि दरवर्षी या पर्यटनाचा एक विषय असतो. पहिल्या म्हणजे १९८० साली पर्यटनाचा विषय होता “सांस्कृतिक वारसा आणि शांती आणि सामाजिक सौहार्द जपण्यात पर्यटनाचे योगदान”.

२०१८ साली ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन' हे मुख्य उद्दिष्ट ठेवून पर्यटन दिन साजरा केला गेला. पूर्ण वर्षभर जगभरातील सर्व देशांनी त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, योजना, सुविधा यांचे नियोजन केले. तर २०१९ मध्ये विषय होता, “पर्यटन आणि नोकऱ्या: सर्वांसाठी चांगले भविष्य”. या निमित्ताने पर्यटन क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींवर जगभरात चर्चा आणि उपाय योजना करण्यात आल्या.

यावर्षीचा विषय आहे “पर्यटन आणि ग्रामीण विकास”. यंदा एक नाही तर अर्जेंटीना, ब्राजील, पॅराग्वे, उरूग्वे आणि चिली या देशांनी यजमान पद स्वीकारलं आहे. आजचा पर्यटन दिवस अशा काळात आला आहे जेंव्हा लोक आपल्या घरातून सुद्धा बाहेर पडू शकत नाहीत. इतर वेळी पर्यटन दिवस म्हटलं तर आपण “उचला बॅग नि चालू पडा” असा होरा घेऊन येतो. आता मात्र गल्लीत फिरलं तरी कोरोनाच्या दहशतीत. पण यामुळेच जगभरातील व्यवसाय ठप्प पडले. केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात गावातून शहरात मोल मजुरीसाठी आलेले लोक आपआपल्या गावी निघून गेले. त्यामुळे मुळात ते आपल गाव सोडून शहरात आले किंबहुना जगण्यासाठी त्यांना शहरात यावं लागलं यामुळे ग्रामीण भागात असलेल्या सोयी सुविधा आणि रोजगाराच्या अत्यल्प संधी आणि त्याचीही नसलेली शाश्वती याकडे फक्त सरकारचं नाही तर सामान्य जनतेचं ही लक्ष्य गेलं. यासाठीच यावर्षीचा पर्यटन दिन सुद्धा त्याच ग्रामीण विकासासाठी समर्पित करण्यात आला आहे.

प्रवासाचा मुख्य उद्देश आपण इतरांना जाणून घेणं आणि आपण स्वत:लाही जाणून घेणं हा असतो. कोणत्या परिस्थितीला आपण कसं तोंड देतो यावरून आपल्याला आपल्या क्षमता समजतात. आजकालच्या मेसेजच्या भाषेत त्याला “स्वत:ला एक्सप्लोअऱ करणं म्हणतात. पर्यटनामुळे आपल्याला आपल्यासारखीच माणसं किती विपरीत परिस्थितीत किंवा निसर्गाच्या किती जवळ किंवा कारखान्यांच्या किती जवळ राहतात हे कळतं. तिथले लोक कोणतं अन्न खातात, कोणता पेहराव घालतात याची माहिती होते. एखाद्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य असेल तर त्यावर गावकरी, विशेष करून स्त्रिया आणि स्थानिक प्रशासन काय तोडगा काढतात. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कुठे आहेत आणि त्याचा किती लोकांना थेट किंवा टँकरने फायदा होतो हे आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतं. शेतामध्ये वापरलं जाणारं खत हे नैसर्गिक आहे की रासायनिक हे स्वत:च्या डोळ्यांनी पाहता येतं. रासायनिक असल्यास त्याचे तोटे आपल्याला त्यांना समजावून सांगता येतात.

याशिवाय सर्वात मोठी गोष्ट दिसते ती जातीयतेची. खेडी अजूनही जातीयतेचे आखाडे आहेत. त्यात नेमकी काय असमानता आहे, त्यातील अज्ञान किती टोकाचं आहे, शिक्षणाची दशा आणि दिशा नेमकी काय आहे, या सगळ्याला स्थानिक राजकारण कसं कारणीभूत आहे, पोलीस यंत्रणेचा रोल काय हे सर्व पाहता येतं. हे झालं सामाजिक अभ्यास म्हणून पर्यटन करताना पहायच्या गोष्टी. नैसर्गिक पर्यटन हा तर लिहिताना लहान पण अनुभवताना खूप मोठ्ठा विषय आहे. हा केवळ अनुभवण्याचाच विषय आहे.

"केल्याने देशाटन , पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा, ज्ञान येतसे फार....” चला तर मग एक वही घ्या आणि... आणि यावर्षी नाही पण एकदा का सर्व सुरळीत झालं की “कुठं कुठं जायाचं” याची लिस्ट तयार ठेवा. तूर्तास... घर बसल्या... पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

30 

Share


Madhura
Written by
Madhura

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad