Bluepadतुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा
Bluepad

तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा

S
Shivraj Kulkarni
27th Sep, 2020

Share


गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या, का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या |
उभय पितरांच्या चित्तचोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला ||

नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात ‘बी’ यांची ही कविता आपण सर्वांनी लहानपणी वाचलेली आणि अभ्यासलेली आहे. पण त्यातलं तथ्य थोडं मोठं झाल्यावर कळत जातं. आईच्या महात्म्याची गाणी तर आपण नेहमीच ऐकत असतो, गात असतो पण बाबांवर केलेल्या कविता फारच दुर्मिळ. संदीप खरे यांनी लिहिलेलं आणि सलिल कुलकर्णी यांनी गायलेलं “दमलेल्या बाबाची कहाणी” हे गाणं तूफान लोकप्रिय झालं त्यामागचं कारण देखील हेच होतं की बाबा आणि मुलगी या नात्याविषयी आजवर फार लिहिलं बोललं गेलंच नाही. त्याचं दु:ख किंवा मुलीसोबत असलेले त्याचं नातं हे केवळ लग्नमंडपात डोळ्याला रुमाल लावणार्‍या बापापर्यंतच सीमित ठेवलं गेलं.


आई जशी मुलीला सर्वतोपरी एक चांगली स्त्री बनवण्याचा प्रयत्न करत असते तसा बाप करत नाही. तो तिला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत असतो. तिला काही कमी पडलं तर त्याचा दोष तो स्वत:ला देतो. तो नुसतंच तिला ‘परी’ आणि ‘राजकुमारी’ म्हणत नाही तर तो वागतोही तसंच. ह्या नात्याला मुलगी सुद्धा ‘राजकुमारी’ बनून प्रतिसाद देते. ती बाबाला घोडा बनवते, घार उडाली म्हणत त्याच्या दुखर्‍या पायावर बसून आकाशात झेपावते आणि घरी यायला उशीर झाला की दारात उभी असते, जाब विचारायला. अख्ख्या जगाला नमवायला लावणारा बाबा देखील “राजकुमारी” पुढे मात्र कान पकडतो.

श्रीमंत बाबाकडे तर आपल्या राजकुमारीला द्यायला अनेक गोष्टी असतात. पण गरीब बापाकडे काय असतं? असतं ना. त्याच्या शब्दांचा भांडार, पाठीवरचा हात आणि गालावरचं चुंबन. बाहेरच्या जगात आपल्या गरिबीला हसणार्‍या आणि आपल्याला “लंकेची पार्वती” म्हणणार्‍या लोकांमुळे स्वाभिमान दुखावलेल्या, हताश झालेल्या आणि रडून रडून डोळे सुजवून घेणार्‍या मुलीला ‘बी’ आपल्या कवितेत समजवतात, “तुला घेईन पोलके मखमलीचे, कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे, हौस बाई पुरवीन तुझी सारी, परी यांवरी हा प्रलय महाभारी.” पण मुलीला ह्या सर्व गोष्टी नकोच असतात. म्हणून ती आपलं रडणं सुरुच ठेवते. तेंव्हा बाप पुन्हा म्हणतो, “आता मी त्या देवाला जाऊन विचारतो की तू आमच्या सारख्या करंट्यांना इतकी सद्गुणी मुलं का देतो?” तेंव्हा बाबा आपल्यापासून दूर जाणार या भीतीने मुलगी त्याला विळखा घालते आणि त्याला जाऊ देत नाही. तिच्यासाठी तिचा बाप ना करंटा असतो ना दरिद्री. तो कसा ही असला तरी तो जवळ असावा फक्त, एवढंच तिला वाटत असतं!

बाप हा कोणत्याही काळातील आणि परिस्थितीतील असला तरी त्याच्यासाठी मुलगी जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान असते. जवळ जवळ ४० वर्षांपूर्वी “बी” नी जे म्हटलं तेच आज टेक्नॉलॉजीच्या जगातील बाबा देखील बोलतो. “असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून, असा कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो|” बाबा आपल्या मुलांच्या झालेल्या प्रत्येक गैरसोयीसाठी स्वत:ला जबाबदार धरतो. म्हणूनच तो शक्य तेवढं राबतो, पण ते राबत असताना आपल्या लहानग्यांकडे झालेलं दुर्लक्ष त्याला खात असतं.

पण मुलगी मोठी होत येते तसं तिचं विश्व बदलतं. मित्र मैत्रिणींच्या मांदियाळीत बाबा उपरा होऊन जातो. बाबांच्या जवळ जायला तिला बरं वाटत नाही. बाबाही वाढदिवशी किंवा परीक्षेत चांगले गुण मिळाले तर आशीर्वाद देतो, तेवढाच काय तो स्पर्श. पण बाबा पुन्हा आठवतो तो सासरी गेल्यावर. तिथे बाबाची आठवण मुलीला कायम सतावते. बाबालाही अन्न गोड लागत नाही. म्हणून तो सदा सर्वकाळ मुलीला खुश ठेवण्यासाठी जावयाची मर्जी, मानसन्मान सांभाळत राहतो. ही जगरहाटी शिवरायांनाही चुकली नाही. मुलीच्या माहेरासाठी जशी आई सासरी नांदते तशीच मुलीच्या सुखासाठी कधीही शरणागती पत्करण्यासाठी बाप फेटा बांधून असतो की काय असं मला वाटत राहतं. पण बापाचं, आपल्याला राजकुमारी करणार्‍या सम्राटाचं असं लाचार होणं कोणत्याच मुलीला आवडत नाही. ती प्रसंगी बंड तरी करते नाहीतर सर्व सुखांना लाथ तरी मारते. आजवर अनेक मुलींनी हुंड्यासाठी आईबापाला त्रास होऊ नये म्हणून स्वत:चा जीव घेतला आहे, हे विसरून कसं चालेल?

म्हणून आजचा बाप मुलीला राजकुमारीपेक्षा झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तिने लढलं पाहिजे म्हणून एखाद्या खेळात तरबेज करतो, मिलिटरीत दाखल करतो. प्रत्येक युगातला बाप आपआपल्या परीने असे अनेक प्रयत्न करत असतो. स्त्री भ्रूण हत्या आता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. आता गरज आहे ती मुलीला पुर्णपणे सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्याची. आणि प्रत्येक बाप ते करेल यात शंकाच नाही.

27 

Share


S
Written by
Shivraj Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad