Bluepadमानसिक वृद्धीसाठी ध्यानधारणा
Bluepad

मानसिक वृद्धीसाठी ध्यानधारणा

J
Juhi Jadhav
25th Sep, 2020

Share


निसर्ग ज्यावेळी एखाद्या सजीवाला जन्माला घालतो त्याचवेळी त्याच्या निरोगी आयुष्याची साधने त्याच्यासोबत देत असतो. उदाहरणार्थ जेंव्हा तो माणसाला जन्म देतो तेंव्हा त्याच्या शरीरात अनेक प्रकारचे रस, पेशी, हॉर्मोन्स इत्यादी गोष्टी देतो, त्या सर्व गोष्टींची जपणूक माणसाने केली तर तो आपलं जीवन व्यवस्थित जगू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागलं तर एखाद्या चीर पडलेल्या टाकीतून पाणी निघून जावं तसं आपल्या शरीरातून रक्त वाहून गेलं असतं. पण निसर्गाने रक्तात थ्रोंबिंस बनण्याची प्रक्रिया ठेवल्यामुळे रक्त वाहण्याला अटकाव होतो. पण तेच एखाद्या मधुमेह असणार्‍या व्यक्तीत हे थ्रोंबिंस बनत नाहीत आणि जखम वाहती राहून त्या जागी गॅंगरीन होऊन तो अवयव शेवटी सर्जरीने काढावा लागतो. याचाच अर्थ आपल्याला निसर्गाने जे दिलं आहे त्याची सर्वतोपरी काळजी आपणच घेतली पाहिजे. जसं आपलं शरीर हे सर्व सोईनी सुसज्ज हॉस्पिटल आहे तसंच आपलं मन हे एक मंदिर आहे. थोडं सैरभैर झालं की त्याची शांति भंग होते. पण थोडासा प्रयत्न केला तर ते पुन्हा ताळ्यावर येतं. आपलं मन हे बुद्धी आणि शारिर क्रियेशी जोडलेलं आहे. त्यामुळे मन जर स्थिर, प्रबळ आणि प्रेमळ असेल तर बुद्धी विवेकी, जिज्ञासू आणि निर्णयक्षम बनते, शरीर आपल्या सर्व क्रिया योग्य पद्धतीने करू लागते. म्हणून मन सुदृढ असणं फार आवश्यक आहे. यासाठीचा राजमार्ग म्हणजे ध्यान धारणा.
“ध्यान म्हणजे एकाग्रता नव्हे तर ध्यान एकाग्रतेच्या विरुध्द आहे,” असे आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी म्हणतात. गाढ झोपेपेक्षा प्रगाढ विश्रांती ध्यानामुळे मिळते. जेंव्हा मन चंचलतेपासून मुक्त होऊन शांत, स्थिर होतं तेंव्हा ध्यान लागतं.


ध्यानाचे असंख्य लाभ आहेत. काही फायदे वैश्विक आहेत, म्हणजेच आपल्याला बाहेरच्या जगाशी कराव्या लागणार्‍या रोजच्या संघर्षात यशस्वी होण्यात ध्यान खूप मोठी भूमिका बाजवतो. समस्त मानव जातीमध्ये कधीही आणि कश्यानेही कमी होणार नाही असा आनंद शोधण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. ध्यानामुळे हि तृप्ती प्राप्त होते. आपल्या जीवनात सर्व काही ठीक चाललेले असून देखील आपण असहज होतो. ध्यान आपणास ज्ञात आणि अज्ञात अश्या दोन्ही तणावापासून मुक्ती देऊन विश्राम आणि स्थिरतेची अनुभूती देते. आपण जीवनातील चढ उतारांचा विश्वास, स्थिरता आणि संपन्नतेने सामना करू शकतो. महत्वाचे हे आहे की सततच्या ध्यानामुळे आपल्यामध्ये एक लवचिकता येते. आपण आपल्या भावना आणि परिस्थितींना खंबीरपणे सामना करू शकतो. दुःखाच्या प्रसंगी ध्यानासारखा सल्लागार दुसरा कोणीही असू शकत नाही.

ध्यान मानसिक वृद्धीसाठी नितांत आवश्यक आहे. ध्यानामुळे मन शांत होतं. एकाग्रता वाढते, संवादात सुलभता येते, आकलनशक्तीमध्ये स्पष्टता येते, सृजनशीलता वाढते, कौशल्यांचा विकास होतो, आंतरिक शक्ती स्थिर होते, मन आणि शरीरावर उपचार करून ते निरोगी ठेवता येतात.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात ध्यानाचे महत्त्व खूप वाढले आहे. ध्यान वर्क लाईफ बॅलंस प्राप्त करण्यासाठी खूप गरजेचे आहे. ध्यानामुळे आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आल्याने आपापसातील विश्वास, रचनात्मकता, नवीन शोध आणि यायोगे प्रज्ञेस चालना मिळते.
नाते संबंधांमध्ये सुधारणा होते. आपला स्वभाव मधुर आणि इतरांशी मन मिळाऊ होऊ लागतो. लोकांना जसे आहे तसे स्वीकारण्याची क्षमता वाढू लागते. हे स्वभाव सर्वत्र उपयोगाचे असले तरी एकत्र काम करण्याच्या ठिकाणी यांचे महत्व खूप आहे. ध्यानाच्या नियमित सरावाने शरीर, मन आणि आत्म्याला लाभ होतो. ध्यानाचा गहरा अनुभव कामाच्या ठिकाणी आणखी सक्रीय बनवतो.

ध्यानचे अनेक प्रकार आहेत. जसे की विपश्यना ज्यात एका ठिकाणी मांडी घालून आणि डोळे मिटून बसून केवळ श्वास आणि उच्छवास यांना त्रयस्थ बनून पाहणं जसं की एखाद्या इमारतीचा वॉचमन इमारतीत येणार्‍या आणि जाणार्‍या व्यक्तींवर फक्त लक्ष ठेवत असतो. त्यांना कुठेही आडकाठी करीत नाही. दूसरा प्रकार आहे मंत्रोच्चारण. एक मंत्र घेऊन त्याची आवर्तने करणे. एक सोपा प्रकार म्हणजे माइंडफूल मेडिटेशन. हे करत असताना ध्यान मुद्रेत बसावं, डोळे बंद करावेत आणि मनात जे विचार येतील त्यांना साक्षी भावाने पाहावं. ते विचार येतात तसे निघून जातात. यामुळे तुम्ही एका विचारात अडकून पडत नाही. असं अनेकदा केल्याने हळू हळू विचारांची गर्दी कमी होऊन मन आणि मेंदू शांत होऊन प्रगल्भ होतात.
अशा प्रकारे ध्यानचे अनेक प्रकार आहेत. मानसिक प्रबलता, प्रसन्नता आणि प्रगल्भता हे ध्यानाचे मूळ उद्देश आहेत, ते साध्य करणारा कोणताही ध्यान प्रकार तुम्ही निश्चित करू शकता

35 

Share


J
Written by
Juhi Jadhav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad