Bluepadसत्कृत्याला कारण असतं, दुष्कृत्याला नाही...
Bluepad

सत्कृत्याला कारण असतं, दुष्कृत्याला नाही...

R
Rakesh Patil
24th Sep, 2020

Share


जगाच्या ज्ञात इतिहासात आजवर इदी अमिन, झुलू, माओ, हिटलर, स्टॅलिन, सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन असे अनेक क्रूरकर्मा होऊन गेलेत आणि अजूनही असे काही लोक आपली दंडेलशाही चालवत अमानवी कृत्ये करीत आहेत. याच सोबत इसवी सनापूर्वी गौतम बुद्ध, पैगंबर, येशू ख्रिस्त, महावीर असे शांतिदूत जन्मास आले. तर इसवी सनानंतर संत कबीर, गाडगे महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, मदर टेरेसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे अशा महान व्यक्तिमत्वांनी समाजात फार मोठे सामाजिक बदल घडवून आणले. जगात चंगेज खान, मुहम्मद घौरी सारखे उन्मादी आक्रमक झाले तसेच शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, चक्रवर्ती सम्राट अशोक यासारखे दिग्विजयी राज्यकर्ते, शककर्ते सुद्धा झाले. जगात हे सर्व घडण्यामागे एक कारण होतं पण हे कशासाठी घडलं ह्याला सुद्धा कारण होतंच असं आपण त्याचे परिणाम बघूनच म्हणू शकतो. म्हणजे जगात सर्व काही कारणासाठी घडतं हे परिणाम सापेक्ष बाब आहे असं मी म्हणेन.


जगात सर्व कारणासाठी घडतं का याचं उत्तर शोधण्यासाठी आपण वरीलपैकी शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं तर उत्तर ‘हो’ असं मिळतं. कारण मुघलांनी इथल्या जनतेवर चालवलेले अन्याय अत्याचार संपवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक लढे दिले. बुद्धाचं उदाहरण घेतलं तरी उत्तर होकारात्मक मिळतं. कारण जगात शांति प्रस्थापित होऊन माणसाच्या आयुष्यातून दु:ख निघून जावं यासाठी बुद्धाने सर्व जगाला शांतीचा संदेश दिला. ही बाब आपण समजाच्या चांगल्या भवितव्यासाठी झटणार्‍या प्रत्येकासाठी बोलू शकतो. पण तिथे आपण इदी अमिन, हिटलर, माओ, चंगेज खान यांची उदाहरणे घेऊन बोलू लागलो तर उत्तर होकारार्थी मिळेल काय? ह्या क्रूरकर्मांचा जन्म कोणत्या कारणासाठी झाला होता? त्यांनी जगात जे काही विकृत कृत्य केलं त्यातून काय साध्य होणार होतं? उत्तर अर्थातच नकारार्थी आणि दु:खदच असेल. यातून साध्य काही झालं नाहीच उलट इतिहासात वाईट काळ म्हणून नोंद झाली. अशी नोंद होण्याला काही जण हेच साध्य म्हणू शकतात. आणि काही लोक तर माणसाने, शासकाने कसं असू नये याचं उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या कृत्यांची निर्मिती झाली असं म्हणू शकतात. पण असं म्हटल्याने आपण त्यांचं एक प्रकारे समर्थन करीत आहोत असा भास होतो. जगात सर्व कारणासाठी घडतं तर ते कारण मानवाच्या हिताचं असलं पाहिजे, अहिताचं नाही.

जे येईल त्याला सामोरं जाणं हा माणसाचा सहज गुणधर्म आहे. मुळात सहजता हाच निसर्गाचा एक भाग असलेल्या माणसाचा महत्वाचा गुणधर्म आहे. हा गुणधर्म माणसाच्या मनात वयाच्या साधारण ३ वर्षापर्यंत असतो असं ढोबळ मानाने म्हणायला हरकत नाही. पण नंतर तो आपल्या सभोवतालचे संस्कार आत्मसात करून त्यावर अंमल करू लागतो. त्याला काही तरी हवं असतं, काही तरी मिळवायचं असतं म्हणून तो अभ्यास, मेहनत, संशोधन करीत राहतो. ते त्याच्या आणि कधी समाजाच्या ही हिताचं असतं. याचा अर्थ त्याने जे काही केलं ते स्वहित आणि समाजहितासाठी केलं असं म्हणू शकतो. पण जर त्याने भ्रष्टाचार केला, कोणाला धमकी दिली, कोणाशी वैर घेतलं, एखाद्याला जीवानिशी संपवलं तर त्याला ‘स्वस्वार्थ’ ह्या कारणाखेरीज आणखी कोणतं कारण असू शकेल? अशा विघातक घटनांचं सुद्धा आपण जर “जे काही होतं ते कारणासाठी होतं” असं समर्थन केलं तर आपण दुष्प्रवृत्तींना वाट मोकळी करून देत आहोत असा त्याचा अर्थ होईल.

आपल्या बाबतीत जेंव्हा काही वाईट घटना घडते तेंव्हा सुद्धा आपण देवाच्या मर्जीपुढे कोणाचं काय चाललं आहे असं म्हणून स्वत:ला हतबल तर करतोच शिवाय घडलेल्या घटनेची जबाबदारी आपण आपल्या शिरावर घेत नाही. इथे सुद्धा देवाची मर्जी साध्य व्हावी म्हणून अमुक एक वाईट घटना घडली असं म्हणणं हा शुद्ध बेजबाबदारपणा आहे. अशी देवाच्या मर्जीची भीती घालूनच शेकडो वर्षे वंचितांवर अन्याय होत आले आहेत. तुमच्यासोबत जे काही घडत आहे हे विधिलिखित आहे, ते ईश्वराचं साध्य आहे असं अशिक्षित आणि कनिष्ठ वर्गातील लोकांना सांगून त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्यात उच्चवर्ण यशस्वी झाला आहे. पण आता मात्र तो जागृत झाला आहे. सर्व काही कारणासाठी घडत असेल तर ते कारण किमान मानव हिताचं असायला हवं एवढं तरी त्याला कळत आहे.

गौतम बुद्धाने दु:खाचं कारण सांगताना दु:खी माणसाला यातना होऊ नयेत म्हणून “सर्व काही कारणासाठी घडतं,” असं सांगितलं. पण त्यापुढे ते म्हणतात, “त्या कारणाला प्रश्न विचारू नका, त्यावर विश्वास ठेवा.” अर्थात, कोणतं कारण? कसलं कारण? असले प्रश्न विचारत बसाल तर ते कारण प्रत्यक्षात आणण्यासाठी करायच्या कृती तुमच्याकडून होणार नाही. काहीतरी चांगलं होईल यावर विश्वास ठेऊन उठलात तर योग्य कर्म करू शकाल. पुढे काही चांगलं होणार असेल म्हणून काही तरी वाईट होतं हे देखील खरं आहे. माणसाला आपल्यातील उणिवा समजण्यासाठी त्यांच्याकडून चुका होतात. ह्या चुका त्यांना सुधारण्याच्या कारणासाठी आणि त्यातून महत्कार्य घडण्यासाठी होतात. काही चुका तत्काळ तर काही युगानुयुगे प्रयत्न करून सुधाराव्या लागतात त्यामुळे कर्मावर आणि त्याच्या कारणावर विश्वास ठेवावा असं बुद्धाने सांगितलं आहे.

आपल्या हातून सत्कृत्य घडत असेल तरच तुम्ही “जे काही होतं ते कारणासाठी होतं” असं म्हणा अन्यथा ही उक्ती आपल्या जीवनातून रद्द करा आणि केवळ कर्म करीत रहा.

68 

Share


R
Written by
Rakesh Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad