Bluepad | Bluepad
Bluepad
संभ्रमात शेतकरी राजा
Mridula Shinde
Mridula Shinde
22nd Sep, 2020

Share


संभ्रमात शेतकरी राजा

आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे इथला राजा हा शेतकरीच आहे. आणि तो पहिल्यापासून स्वतंत्रच होता. त्यानेच स्वातंत्र्यानंतर पडलेल्या दुष्काळात देशातील लोकांना अन्न देऊन जगवलं. तो आपल्या शेतात जे उगवत होता ते तो बाजारात विकतच होता. देशातील लोकांचं भरण पोषण करण्यासाठी त्याने हरित क्रांति आणली. आणि त्यासोबत आणलं रसायन मिश्रित अन्न धान्यसुद्धा. कारण ते जर केलं नसतं तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पोसायचं कसं हा प्रश्न उभा राहिला असता. याचा परिणाम म्हणून शेतामधून कॅन्सर उगवू लागला. आणि अशा रसायन मिश्रित अन्न धान्याला निर्यात करण्यावर प्रतिबंध आले. एकीकडे निर्यातीवरचे हे प्रतिबंध असताना दुसरीकडे रातोरात नवीन बिलं आणण्यात वाकबगार असलेल्या मोदी सरकारने आता तीन विधायके संसदेत आणि राज्यसभेत आणली आणि विरोधक आणि समर्थकांच्या प्रचंड गदारोळत आवाजी मतदानाने ती विधेयके पास सुद्धा केली. आता परीक्षेची वेळ आली आहे ती शेतकर्‍यांच्या खर्‍या प्रश्नांची.

या विधेयकांमुळे शेतकऱ्यांमध्ये जी अस्वस्थता आहे ती विनाकारण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे. पंतप्रधान त्यांच्या नेहमीच्या स्टाइलने “शेतकरी राजा आता त्याला वाटेल त्या किमतीला त्याची उत्पादनं थेट ग्राहकांना विकू शकतो” असं शेतकर्‍यांच्या पायातील मणामणाच्या बेड्या कशा आम्ही तोडून टाकल्या आणि शेतकरी राजाला कसा स्वतंत्र केलं ह्या थाटात सांगत असले तरी सत्यस्थिति या आत्मस्तुती पेक्षा खूप वेगळी आहे.

सरकारच्या मते या विधेयकांचा कायदा झाला की शेतकरी आपल्या संभाव्य पिकाच्या विक्रीसाठी त्यांना हवे त्याच्याशी दर निश्चित करून शेतमाल विक्रीचा आगाऊ करार करू शकतील. म्हणजे एका अर्थी कंत्राटी शेतीची त्यास मुभा राहील. या नव्या कायद्यांमुळे शेतकरी आणि त्यांच्या पिकांचे संभाव्य ग्राहक या दोघांनाही सोयीची अशी एक नवी व्यवस्था तयार होईल, असं ते म्हणतात. या गोष्टीकडे भारतीय शेतकर्‍यांच्या संदर्भात नीट पहिलं तर वस्तुस्थिती खरंच अशी आहे का? काही अगदी मूळ मुद्दे आहेत ज्याकडे सरकार पाहत नाहीये असं दिसतंय. शेतकरी आजवर आपला माल थेट ग्राहकांना विकत नव्हता कारण त्याचं उत्पन्न हे काही १० – २० किंवा अगदी १०० किलो मध्ये येत नाही तर ते अनेक एकर जमिनीत घेतलेलं अनेक क्विंटल मध्ये येत असतं. आज वर बाजार समित्यानी हे धन्य विकत घेतलं आणि शेतकर्‍याला त्याचा हमी भाव मिळाला की शेतकर्‍याच्या घरात दिवाळी साजरी होत होती. पण आता जर त्याने थेट ग्राहक किंवा बाजारच्या आत आणि बाहेर असं स्वत: विक्री करायची म्हटली तर तो सर्व माल एका वेळी विकू शकणार नाही. त्यासाठी त्याला गोदामांची गरज लागेल. जी सर्वच शेतकर्‍यांकडे आता नाहीये. बाजार समित्या शेतकर्‍यांकडून घेतलेलं धान्य एकत्र करून त्यांच्या गोदामात ठेवून ते किरकोळ बाजारात विकत होते. ही सोपी आणि सहज पद्धत होती. त्यात अडते, दलाल याचं फावत होतं, पण शेतकर्‍याला त्याच्या मालाचा हमीभव म्हणजेच किमान निर्धारित मूल्य मिळत होतं. पण आता शेतकर्‍यांनी स्वत:च्या मनाप्रमाणे आपला माल विकावा असं म्हटल्यावर त्यात किंमतीवरून युद्ध माजणार नाही का? याला स्पर्धा कशी म्हणता येईल? बर्‍याच विरोधानंतर आता सरकार म्हणतंय की प्रत्येक मालास ‘किमान आधारभूत किंमत’ असणार आहे. पण ते “शेतकर्‍यांनी मनाला वाटेल त्या किमतीला विकावं” या त्यांच्या आधीच्या निर्णयावर काहीच बोलत नाहीत.

शेतकर्‍यांचा माल सरकारी यंत्रणांनी नाही घेतला तर तिथे खाजगी रिटेल मार्केट वाले तयार बसलेले आहेतच. आणि त्यांच्या मनाप्रमाणे शेतकर्‍यांकडून माल घेणार हे निश्चित. सरकारी खरेदी यंत्रणांवर किमतींच्या बाबतीत नियंत्रण ठेवता येऊ शकतं पण खाजगी कंपन्यांवर नियंत्रण कोण ठेवेल? मग तो माल किरकोळ बाजारात शेवटच्या ग्राहकाला कितीला विकला जाईल याची कल्पनाच केलेली बरी.

याशिवाय खाजगी रिटेल कंपन्या आपल्या वस्तु घेताना जैविक, सैंद्रिय, नैसर्गिक अशा पद्धतीने शेती केलेली आहे की रासायनिक खताची आहे ते सुद्धा पाहतात. जैविक, सैंद्रिय, नैसर्गिक पद्धतींच्या वस्तु परदेशी पाहुण्यांची ऊठबस करणार्‍या हॉटेल्सना पुरवतात, अर्थात त्यांचे दर “मन मानेल तसे असतात”. मग अशा कंपन्या रासायनिक खतांचा वापर करणार्‍या शेतकर्‍यांकडून माल विकत का घेतील? सरते शेवटी शेतकर्‍यांना आपल्या रसायन विरहित मूळ शेतीकडे यावं लागेल. पण असा द्राविडी प्राणायाम पूर्ण होई पर्यन्त माल विकला न गेल्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या जगण्याच्या प्रश्नावर निर्माण झाला तर याला जबाबदार कोण असेल? सध्या या बिलात अनेक त्रुटि आणि अनेक उच्च दावे आहेत. शेतकरी संभ्रमात आहे. त्या सर्व त्रुटि दूर करून जर तो कायदा झाला तरच त्याचा बळीराजाला काही फायदा होऊ शकतो. अन्यथा बाकीच्या अनेक दाव्यांप्रमाणे हा सुद्धा पोकळ दावा ठरेल.

27 

Share


Mridula Shinde
Written by
Mridula Shinde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad