Bluepad | Bluepad
Bluepad
मंत्र एक.....फायदे अनेक.
डॉ अमित.
डॉ अमित.
18th Sep, 2020

Share


मंत्र एक.....फायदे अनेक.
मंत्र एक.....फायदे अनेक.


अरेच्चा शीर्षक वाचून काय येतंय मनात?मी डॉक्टरकी सोडून नवीनच काही चालू तर नाही ना केले? मी मांत्रिक -तांत्रिक वगैरे झालो की काय असा तर विचार नाही ना करायला लागलात लगेच तुम्ही?
हं दूर दूरवर ते शक्य नाही,असो.

एक सुंदर असा तीन अक्षरी मंत्र किंवा तत्सम काहीही म्हणा,अशी तीन अक्षरे जी तुमच्या आयुष्याची तीनही टप्पे म्हणजेच बालपण,तरुणपण,म्हातारपण या टप्प्यामध्ये तुमचे आयुष्य बदलवून टाकतील किंवा ते मार्गस्थ करतील.

ही तीन अक्षरे....

ओम नमः
सबसे क्षम
सबको क्षम....

हो हीच ती तीन अक्षरे...पण आपले पूर्ण आयुष्य बदलवून टाकण्याचे सामर्थ्य आहे या तीन अक्षरात.

ओम नमः

आपण आपल्या दिवसाची सुरुवातचं जर ओम नमः या शब्दाला स्मरून केली म्हणजेच आपल्या ईश्वराला,आपल्या मात्यापित्याला आणि आपल्या गुरूला स्मरून केली,त्यांना नमन करून केली तर आपले शरीर पोझिटिव्ह ऊर्जेने नक्कीच प्रेरित होईल.ही ऊर्जा मग दिवसभर आपल्या कामात आपल्याला उपयोगी पडत राहील.
जेंव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेंव्हा ती गोष्ट हमखास चांगलीच होते.तो दिवस हा नक्कीच आपल्या आयुष्यातला आनंदाचा दिवस होईल.
हेच सूत्र कुठलेही चांगले काम करताना अमलात आणायचे.
मग ती गोष्ट सुरू करताना किंवा एखादे चांगले काम करताना मुहूर्त वगैरे बघण्याची काहीही आवश्यकता राहणार नाही.


सबसे क्षम...

आपण आपल्या रोजच्या जीवनात कळत-नकळत जाणतेपणे किंवा अजाणता आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला शब्दाने अथवा कृतीने कधी कधी दुखावतो,ती व्यक्ती मग आतून दुःखी होते.
या सर्वांची आपण मनापासून क्षमा मागायची.भले ती व्यक्ती समोर असो वा नसो.ही क्षमा फक्त वरकरणी सॉरी या इंग्रजी शब्दा पुरती मर्यादित न राहता ती आपल्या अंतःकरणातून,मनातून व्यक्त झाली पाहिजे.मग पाहा त्यामुळे आपल्या स्वतःलाही मनःशांती नक्कीच मिळेल.
ही क्षमा जर आपण त्याला व्यक्तिशः मागितली तर ती व्यक्तीही नकळत सुखावली जाईल.त्याने तुमची नातीही मग सुधारायला,टिकवायला मदत होईल.

भगवान महावीर स्वामींनी सांगितलं आहे की

क्षमा वीरस्य भूषणम्..

किती खरं आहे नाही.कारण क्षमा मागायला खरंच वाघाचं काळीज लागतं...
जैन धर्मात पर्युषण पर्व हा उत्सव खूप आनंदात साजरा होतो.यात क्षमावली किंवा क्षमापणा किंवा उत्तम क्षमा ज्यात वर्षभर आपल्या हातून घडलेल्या चुकांसाठी आपण सर्वांची मनापासून क्षमा मागतो.

सबको क्षम...

नुसती क्षमा मागणे याने क्षमा पूर्ण होत नाही.क्षमेची दुसरी बाजूही तितकीच किंबहुना त्याहून अधिक महत्वाची आहे.ती म्हणजे क्षमा करणे.जर आपल्यालाही कोणी दुखावलं असेल,त्रास दिला असेल,आपल्याशी वाईट वर्तणूक केली असेल त्या सर्वानांही आपण मनापासून क्षमा करायची.
त्याने केलेल्या वाईट कृतीला मनातून कायमचे काढून टाकायचा प्रयत्न करायचा.

या सर्वांमुळे होत काय की आपल्या मेंदुरुपी कॉम्प्युटर मध्ये असेलला अनावश्यक डाटा कायमस्वरूपी डिलीट होतो आणि आपल्या मन रुपी मेमरी कार्ड मध्ये चांगल्या गोष्टीसाठी आणखी जागा मोकळी होते.
मनातले घृणा, क्रोध, बदला,राग,तिरस्कार हे संवेदनशील व्हायरस लोप पावतात.
आपलं मन मग त्याच त्याच कटू आठवणीने हँग होणार नाही.

थोड अवघड वाटेल हा मंत्र सुरुवातीला तंतोतंत पाळायला...पण अशक्य नक्कीच नाही.
हे जेंव्हा आपण रोजच अंगवळणी उतरवतो तेंव्हा ते अशक्य न राहता सहज शक्य होते.

हो आठवणीने, फक्त सकाळीच नाही तर रात्री झोपताना देखील हा मंत्र तुम्ही उच्चारा....आपल्या दिवसभराच्या घडामोडीत तुम्ही तुमच्या साठी केलेलं हे छोटंसं सिंहावलोकन असेल.जे तुम्हाला वेळोवेळी माणूस म्हणून आनंदाने जगण्यात,तुमच्यात मानवता द्विगुणित करण्यात नक्कीच मोलाची मदत करेल.


प्रेम करण्यापूर्वी तू क्षमा कर
कारण क्षमा केल्यास
प्रेम आपोआप निर्माण होईल
जे चिरकाल असेल....

पुन्हा एकदा मी मनापासून हा मंत्र उच्चारतो,


ओम नमः
सबसे क्षमा
सबको क्षमा....


डॉ अमित.

41 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad