Bluepadशेतात उगवणारा कॅन्सर
Bluepad

शेतात उगवणारा कॅन्सर

P
Poorva Shelar
18th Sep, 2020

Share


“साहेब गेला तो कंटाळून. अरे, लुटण्यासारखे राहिले काय होते या देशात. धंदा बुडीत खाती जायला लागला --- फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा!” हो, अगदी बरोब्बर. पुलंच्या “अंतु बर्वा” मधलं वाक्य. १९४७ साल. इंग्रज आपला देश सोडून गेले तेंव्हा देशात दुष्काळ पडला होता. अन्न पाण्यावचून माणसं मरत होती. तिकडे दुसर्‍या महायुद्धात विजय मिळवूनही ब्रिटनची अतोनात हानी झाली होती. भारतात स्वातंत्र्याचे नारे बुलंद होत होते. अशा अवस्थेत भारताचा रथ रडत खडत हाकण्यात काहीच हशील नव्हतं. स्वातंत्र्याला आणखीही अनेक बाबी जबाबदार होत्या, पण भारताची खस्ता हालत हे देखील एक कारण होतं. भारतातील राज्यकर्त्यांच्या समोर या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता.


शेवटी १९६० साली भारताच्या कृषिमंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार एम.एस. स्वामिनाथन यांनी अमेरिकेचे कृषितज्ज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना भारतात बोलावलं. अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशन आणि भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून मेक्सिकोमधील आंतरराष्ट्रीय मका व गहू विकास केंद्रातून गव्हाचं बियाणं आयात करण्यात आलं. पाण्याची मुबलक उपलब्धता व शेतकीची सफल पार्श्वभूमी यांमुळे नवी पिकांच्या प्रयोगांसाठी पंजाबची निवड करण्यात आली. जास्त उत्पन्न देणार्‍या जातींच्या बियाणांचा विकास, सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार, व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, संकरित बियाणांचे, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण इत्यादी बाबींवर यात भर देण्यात आला. यामुळे अन्नधान्याचे उत्पन्न खूप वाढले. पंजाबमधील प्रयोग यशस्वी झाला आणि हेच प्रयोग संपूर्ण देशात केले गेले. पंजाबात गव्हाचं उत्पन्न इतक्या मोठ्या प्रमाणावर आलं की त्याला “गव्हाचं कोठार” म्हणू लागले. पण ह्याच पंजाबातील भटिंडामधून आज एक ट्रेन निघते ती जाते थेट राजस्थानातील बीकानेरमध्ये. तिचं नाव आहे “कॅन्सर ट्रेन”. या ट्रेनमध्ये सर्वाधिक प्रवासी हे कर्करोगग्रस्त असतात म्हणून ही ट्रेन असं विचित्र नाव धारण करून धावत असते. भटिंडापासून २२० किमी अंतरावर असलेल्या बीकानेरच्या रुग्णालयात हे प्रवासी उपचारासाठी जात असतात. आज ‘हरित क्रांती’चं वैभव पाहिलेल्या पंजाबात आणि एकूण सर्वच देशात ही परिस्थिती निर्माण झाली आहे ती त्या वैभवासाठी वापरलेल्या रासायनिक खतं आणि कीटकनाशक यांच्या वापरामुळे.

रासायनिक खतं आणि कीटकनाशक हे शेतीसाठी वापरुन सुबत्ता तर आली पण ही सर्व रसायनं अन्नधान्यात आली, मातीत आणि पाण्यात मुरून ती अन्नसाखळीत आली. ओलेती, सुपीक जमीन कोरडी आणि नापीक होत गेली. आज १० माणसात एक असे सर्व देशात कर्करोगाचे रुग्ण आहेत असं सांगितलं जात आहे. हे रोखण्यासाठी अर्थातच रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर बंद व्हायला हवं. पण त्याचसोबत १३० कोटी आणि दिवसा गणिक त्यात भर पडणार्‍या लोकसंख्येला खायला अन्न तर उगवावंच लागणार. त्यामुळे त्या अन्नधान्याची पैदास मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी पुन्हा त्या विषांचा वापर शेतांवर करावाच लागतो ही शेतकर्‍यांची आणि कृषि तज्ज्ञांची कैफियत सुद्धा रास्त आहे.

पण या पलीकडे जाऊन पुरातन कृषिचा अभ्यास करणार्‍यांची मतं वेगळी आहेत. जंगलात कोणी पाणी घालायला जात नाही की रसायनं टाकायला जात नाही. तरी तिथे मोठ्या प्रमाणावर वनराई कशी उगवते? हा ह्या सर्व अभ्यासकांच्या संशोधनाचा पाया आहे. यात मग मूळ बियाणाचा वापर, जमिनीवर पालापाचोळ्यांचं आच्छादन, कीटकांना आकर्षित करणार्‍या बाबी टाळून त्यांच्या खाद्याची बाहेरच्या बाहेर व्यवस्था करणे असे अनेक साधेसरळ उपाय आहेत. याला आपण नैसर्गिक किंवा सैंद्रिय शेती सुद्धा म्हणतो. पूर्वी आपल्या शेतीतून उगवलेल्या अन्नधान्याचेच बियाणे शेतकरी पुढच्या पेरणीसाठी ठेवत असत. पण आता हायब्रिड म्हणजेच दोन वाणांचे परागीकरण करून तयार केलेलं बियाणं शेतकर्‍यांना दिलं जातं. ह्या हायब्रिड बियाणांच्या बिया तुम्ही पुढील शेतीत उगवू शकत नाहीत. कारण त्यांच्यात बी नसून नुसताच गर असतो. त्यामुळे जाणकार मूळ बियाणी वापरण्याचा आग्रह धरतात.
काहींनी सैंद्रिय शेतीलासुद्धा रासायनिक खतांचा वापर करून करणार्‍या आधुनिक शेती प्रमाणे नियमात बांधून टाकलं आहे. म्हणजे जेंव्हा सैंद्रिय शेतीसाठी शेणखत आवश्यक आहे असं सांगितलं जातं तिथे एका एकराला १ ट्रक भरून शेण लागेल असा धक्का देऊन तिथेच मनोबल खच्ची करून टाकलं जातं. रासायनिक खतं हे एक मोठं आंतरराष्ट्रीय मार्केट आहे हे लक्षात घ्यायला हवं. याबाबतीत आपल्या देशातील कृषि तज्ज्ञांमध्ये सुद्धा राजकीय नेत्यांप्रमाणे एकवाक्यता नाही. तिकडे शेतकर्‍याच्या माथी सोयाबीनचे फेक बियाणे मारले जातात. शेतकरी वेगवेगळ्या कारणाने मरतोय आणि जे शेती करीत आहेत ते लोकांना कर्करोग देत आहेत.

अजूनही वेळ गेलेली नाही. अन्नसाखळीत घुसलेलं युरेनियम आणि शिसं या सारख्या घातक मूलद्रव्यांपासून सुपीक जमीन आणि माणसं यांना वाचवायचं असेल तर आज हे विष जमिनीला आणि पिकांना देणं थांबलं पाहिजे तर कुठे १० वर्षानी त्याचा परिणाम दिसेल. तेंव्हा खर्‍या अर्थाने ‘हरित क्रांती’ होईल.

17 

Share


P
Written by
Poorva Shelar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad