Bluepadगाव तिथे रोजगार हवा
Bluepad

गाव तिथे रोजगार हवा

Vinisha Dhamankar
Vinisha Dhamankar
17th Sep, 2020

Share


गाव म्हटलं की तांबूस सकाळ, सोनेरी दुपार, चंदेरी रात्र, मोकळी हवा, मोकळी जागा आणि मोकळा वेळ. अर्थात गाव म्हणजे शहरात राहणार्‍यांसाठी जगण्याची जागा नाही तर २ घटका रमण्याचं विरंगुळ्याचं ठिकाण. यामुळेच की काय आपल्या गावात नेमकं काय चाललं आहे याची खबर शहरातल्या लोकांना नसते. आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी भारताच्या दूरदूरच्या गावाहून लोक रोजंदरीच्या शोधत आपला कुटुंब कबिला घेऊन येतात. पण इथल्या लोकांना वाटतं की हे लोक शहरात गर्दी करतात आणि शहरावर त्याचा अतिरिक्त भार पडतो. ही गोष्ट १०० टक्के खरी असली तरी त्या मागची कारणं कधी कोणी शोधण्याचा प्रयत्न करीत नाहीत. कारण आपल्याला सहज पचवता येतील अशाच गोष्टी ऐकण्या बघण्याची सवय झालेली असते. क्रूर सत्य आपल्या कानाला स्पर्श करीत नाही की डोळ्यांमध्ये टोचत नाही.
महात्मा गांधीजींनी “खेड्याकडे चला” अशी हाक स्वातंत्र्यपूर्व काळात दिली. त्याच्या अगदी उलट हाक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, “शहराकडे चला”. त्यांनी असं का म्हटलं याचं त्यांनीच दिलेलं उत्तर ऐकलं तरी ते ऐकणार्‍यांना सहन होणार नाही. डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, “गावं ही जातीयतेचे आखाडे आहेत. जर या जातीयतेपासून तुम्हाला दूर जायचे असेल तर शहराकडे चला.” हे साधारण १९२० च्या आसपास बोललेलं सत्य आजही गावागावात रुद्र रूप घेऊन उभं आहे.


पुरोगामी महाराष्ट्रात जातीयतेच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. एट्रोसिटी अॅक्ट सारखे कायदे असूनही यावर अजून आळा बसलेला नाही. अजून ही खालच्या जातीतील लोकांचा स्वाभिमान पायदळी तुडवला जातो. पोरीबाळींची छेडछाड करतानाचे, बायकांची धिंड काढतानाचे, एका असहाय पुरूषावर दहा बारा जण तुटून पडतानाचे विडिओ वायरल करण्यापर्यन्त काही समाजविघातक शक्तींची मजल गेली असताना आपण याला पुरोगामी समाज कसं काय म्हणू शकतो? आज टेक्नॉलॉजीच्या जमान्यात ही अवस्था, तर १९२० च्या दशकात काय अवस्था असेल?

हे झालं जातीयतेचं. जिथे धनदांडग्यानी गावाची अख्खी व्यवस्था आपल्या ताब्यात ठेवली असेल, सरकारी योजना कागदावर राबवतो असं दाखवून प्रत्यक्षात मात्र गरीबांना काहीच न देणारे, शेतीसाठी पाणी पाहिजे म्हणून विहीर दिली असं दाखवून प्रत्यक्षात पाण्यासह विहीरीची चोरी करणारे महाभाग जिथे असतील तिथे गरिबांनी राहायचं कसं आणि कशासाठी?

उत्तर भारतातील गरिबीची एकंदरीत अवस्था पाहता तिथे उद्योगधंदे उभारण्याची गरज निर्माण झाली आणि उभारले देखील पण असे अनेक प्लांट बनवून तयार आहे पण त्याचं ना उद्घाटन झालं ना तिथल्या माशिंनींना माणसांचे हात लागले. आज शेतकर्‍याची, कष्टकर्‍याची अवस्था काय झाली आहे हे आपण पाहत आहोत. सरकार मरू देत नाही आणि अस्मानी संकट जगू देत नाही अशी बिकट अवस्थेत शहरांची वाट धरणार्‍या गरीबांना मुंबईने तरी कधी उपाशी झोपू दिलं नाही. शेतात काही राम राहिला नाही म्हणून मुलाबाळांसह शहरात आलेल्यांना रोजंदरीच्या कामावर आसरा मिळाला होता.

थोडं जगणं सुरू झालं होतं की कोरोनाने आपले हात पाय पसरायला सुरुवात केली. सरकारच्या ध्यानीमनी देखील हे लोक नव्हते. ते तर तेंव्हा समोर आले जेंव्हा दुधाच्या टँकर आणि एम्ब्युलंस मधून आपल्या गावी परतणार्‍यांना पोलिसांनी पकडलं. त्यांची मजबूरी समजली तेंव्हा शहारवासीयांच्या ही डोळ्यांच्या कडा डबडबल्या. गरिबांचा कोणी वाली नाही ही उक्ती प्रकर्षाने जाणवली. एक सत्य समोर आलं की मरायचं तर आपल्या गावी जाऊन मरु अशा जिद्दीने जे लोक शक्य होईल तसे उत्तर भारतातील, कलकत्यातील आपल्या घरी पोहोचले तेंव्हा तिथल्या लोकांनी त्यांना अस्पृश्य करून टाकलं. गावकर्‍यांची ठाम समजूत झाली की हे लोक विषाणूला घेऊनच आले असतील आणि त्यांनी ह्या लोकांना गावात घेतलंच नाही. परतलेल्या लोकांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली.

गावातील लोक हे असे नेहमी बाबा आदमच्या जमान्यात राहतात कारण त्यांना पुस्तकी शिक्षण देऊन शिक्षण खात्याचे रजिस्टर तर भरले जातात पण सामाजिक सलोख्याचं, वैज्ञानिक दृष्टी देण्याचं काम फार कमी केलं जातं. म्हणून पिचलेले, पीडलेले लोक शहरात येतात. आता तरी जो जिथे आहे तिथेच त्याला रोजगार मिळवा यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

16 

Share


Vinisha Dhamankar
Written by
Vinisha Dhamankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad