Bluepad | Bluepad
Bluepad
उन्हाळ्यात जपा त्वचेला
R
Ramya Deshpande
15th May, 2020

Shareउन्हाळ्यात जपा त्वचेला
त्वचा म्हणजे आपल्या सर्व अवयवांना लाभलेलं एक कवच. ही त्वचाच आपल्याला ऊन, वारा, पाऊस यापासून आपलं रक्षण करीत असते. पण आपण ह्या त्वचेकडे रक्षक म्हणून न पाहता तिच्याकडे सौंदर्य प्रदर्शित करणारं माध्यम म्हणून पाहतो आणि पहिली चूक इथेच होते. ही चूक केल्यामुळेच आपण नको नको ते कॉस्मेटिक्स वापरुन त्या त्वचेला इतकं घायाळ करून टाकतो की ती एखाद्या सातत्याने रासायनिक खतं वापरुन ओसाड झालेल्या जमिनीसारखी दिसू लागते. आज आपण खाण्यापिण्यात अगदी श्वसनात सुद्धा जिथे रसायनांचाच पुरवठा शरीराला करीत असतो तिथे त्वचा तरी त्यापासून कशी वाचेल. पण थोडीशी काळजी घेतल्याने आपण आपलं हे कवच अबाधित ठेवू शकतो.

त्वचेची विशेष काळजी ही उन्हाळ्यात घ्यावी लागते कारण थेट उन्हात गेलो नाही तरी उन्हाच्या झळा ह्या जाणवतातच. स्वयंपाक घरात काम करणार्‍यांना तर आपल्या अंगा खांद्यावरून पायाच्या अंगठ्यापर्यंत जगातील सर्व नद्या एकसाथ धावत असल्यासारखं वाटत असतं. इतका घाम येत असल्यामुळे पाण्याची कमतरता शरीरात निर्माण होते. त्यामुळे सातत्याने पाणी पिणं हा उत्तम उपाय. दिवसातून एकदा ताक, लिंबुपाणी, पन्हे, सब्जा घातलेलं कोकम सरबत, आवळा सरबत अशा क्षुधानाशक द्रव्यांचे सेवन करने लाभदायक ठरते. त्यामुळे शरीरातील कमी झालेली शर्कराही भरून निघते. यासोबत भरपूर पाणी असणारी फळं सेवन करावीत. जसं टोमॅटो, काकडी, द्राक्षे, खरबूज, कलिंगड इत्यादी. ह्या काळात कोल्ड ड्रिंक्स शक्य तितके टाळावेत कारण यात शरीराला थंडावा देणारे गुणधर्म कमी आणि अपायकरक द्रव्ये जास्त असतात. त्यात कार्बनडायॉस्काईडचं प्रमाण जास्त असल्याने जठरातील पचनास आवश्यक असणारा प्राणवायू कमी होतो आणि एकंदरीतच यकृत, आतडे यांची कार्यक्षमता मंदावते. प्रत्येक शीतपेयात साखरेचं प्रमाण अवास्तव असल्याने त्याचा इतर अवयवांवरही परिणाम होतो. उकाडा होतो आहे म्हणून थंड पाणी आणि कोल्ड ड्रिंक्स जास्त प्यायल्याने डोकं जड होऊन सर्दी ही होऊ शकते.

दुधाचे पदार्थ, पालक, कोबी, टॉमेटो, कलिंगड, खरबुज यांचं सेवन केल्‍यास फायदेशीर ठरेल. रोज सकाळी उपाशीपोटी गाजरचा रस घ्या तसेच जेवण झाल्यानंतर थोडीशी बडीशोप खावी. त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो.

उन्हाळ्यात त्वचा ऊन आणि घामामुळे तेलकट होते. त्यामुळे त्वचा काळवंडणं, घामोळ्या येणं, खाज सुटणं, काळे चट्टे येणं असे अनेक त्रास उद्भवू शकतात. औद्योगिक क्रांतीनंतर ओझोनच्या थरावर झालेल्या परिणामामुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर मोठा परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे सूर्याची हानिकारक अशी अतिनील किरणं आता पृथ्वीपर्यंत येऊ लागले आहेत. या सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे त्वचेवर वार्धक्याच्या खुणा लवकर दिसू लागतात. त्वचेवरील नव्वद टक्के सुरकुत्या उन्हामुळे पडतात. एखाद्या व्यक्तीला सनबर्न होऊ शकतो. सनबर्नमुळे त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उमटतात किंवा त्वचा भाजल्यासारखी होते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य ठरतं.

उन्हाळ्यात जास्तीत जास्त सुती कपडे वापरण्यावर भर द्यावा. फिकट रंगाचे कपडे घालावे. पूर्ण बाह्याचे कपडे किंवा तरुणींनी सनकोट, सुती स्टोल वापरावे. हवी असल्यास जवळ छत्री बाळगावी. डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून गॉगल वापरावे. सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे मॉइश्चर कमी होते, त्वचा कोरडी वाटल्यास मॉइश्चराइझर लावून त्वचा मऊ ठेवावी.

खूप घाम येत असल्यामुळे त्वचेवर धूळ मातीचे थर बसून त्वचेवरील छिद्रे बंद होऊ शकतात. ती उघडण्यासाठी दर ३ - ४ दिवसांनी बेसन लावून आंघोळ करावी.
आठवड्यातुन एकदा तासभर वेळ काढुन वस्त्रगाळ चंदन पावडर २ चमचे, गुलाबपाणी ३ चमचे आणि चमचाभर मुलतानी माती यांचं मिश्रण करुन त्याने फेशिअल घरच्या घरी केलंत तरी त्वचेचा पोत सुधारुन चेहरा फ्रेश होतो. पंधरा दिवसांतुन एकदा तरी उत्तम मसाज क्रिम आणुन त्वचेला घरच्या घरी व्यवस्थितपणे मसाज करणं खुपच चांगलं. मसाजमुळे त्वचेखालचे रक्तसंचालन उत्तम रहाते. मसाज हलक्या हाताने गोलाकार करावा.

शक्य असेल तर दुपारी १२ ते ४ यावेळात घराबाहेर पडणं टाळावं. दुपारचा आहार माफक असावा. सध्या आंब्यांचा सिझन असल्याने ते शक्य नाही पण तरीही आहारावर किंचित मर्यादा असु द्या. उन्हाळ्यत नैसर्गिक रित्याच पचनयंत्रणा मंद होत असल्याने जडान्न, अतीगोड पदार्थ, मिठाया, मटनासारखे जड अन्न यांच अतिरेक टाळावा. यासोबतच पुरेशी झोप ही देखील त्वचा सुंदर ठेवायला मदत करते.

निसर्गाने प्रत्येकाला एक छान त्वचा दिलेली आहे. तिची काळजी घेणं, ऋतुंनुसार तिच्या आरोग्यास जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. गोरी त्वचा हीच उत्तम त्वचा हा गैरसमज आहे. त्वचेचा दर्जा, चकचकीतपणा, स्वच्छता, पोत हे घटकही उत्तम त्वचा ठरवतात आणि अशी उत्तम त्वचा आपल्यासाठी वातावरणातील कोणत्याही स्थितीत ढाल म्हणून काम करते.

27 

Share


R
Written by
Ramya Deshpande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad