“हसताय ना मंडळी, हसायलाच पाहिजे.”
डॉ. नीलेश साबळेंची ही हक्काची आरोळी गेली सहा वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात निनादात आहे. आणि त्यांनी खरंच सर्व महाराष्ट्राला खळखळून हसायला लावलं आहे. महाराष्ट्राला विनोदी कलाकृतींचा वारसा फार मोठा आहे. पूर्वी शरद तळवलकर, राजा गोसावी असे कलाकार मुख्य भूमिकेत असले तरी विनोदाचा भार सुद्धा तेच वाहत असत. त्यानंतर तर दादा कोंडके यांनी संपूर्ण देश आपल्या द्वयार्थी विनोदांनी दणाणून सोडला. दादा कोंडकेंचा भर ओसरत असतानाच लक्ष्मीकांत बेरडेंची एंट्री झाली. त्यांनी आपली “विदूषका”ची छाप सोडली आणि ते आपल्यातून निघून गेले. त्यानंतर मात्र मराठी चित्रपटांचा चेहरा मोहरा बदलला. “श्वास”ची एंट्री ऑस्करला झाली आणि मराठी चित्रपटात नव्याने प्राण फुंकले गेले. त्यावेळी छोट्या पडद्याचा प्रेक्षक हा विनोदासाठी हिन्दी मालिकांकडे वळला होता. लक्ष्मीकांतच्या गजरा, प्रशांत दामलेंच्या “कर्वे आणि बर्वे” अशा मालिकांनी वेगळे विनोदी अनुभव दिले पण ते फार काळ टिकले नाहीत. आज शेकड्याने असलेल्या हिन्दी मनोरंजन वाहिन्यांवर अनेक विनोदी कार्यक्रम सुरू असतात. पण नीलेशच्या “चला हवा येऊ द्या” त्या सर्व कार्यक्रमात उठून दिसतो.
खरं तर सात एक वर्षापासून हिंदी वाहिन्यांवरील गाण्यांचे आणि नृत्याचे रीयालिटि शोजचे मंच हे येणार्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वापरण्याचा एक ट्रेंड रूढ झाला होता. अजूनही आहे.
म्हणजे जास्तीत जास्त रीयालिटि शोज हे शनिवार रविवारी असतात. त्यामुळे पुढच्या आठवड्यात रिलीज होणार्या चित्रपटाची टीम आदल्या आठवड्यात ह्या रीयालिटि शोजमध्ये उपस्थिती लावत असते. मराठीत सुद्धा गाण्यांचे आणि नृत्यांचे कार्यक्रम होत होते पण चित्रपटांच्या प्रमोशनसाठी त्यांचा वापर केला जात नव्हता. हिन्दीमध्ये पहिल्यांदाच कपिल शर्मा शोमध्ये म्हणजे एका कॉमेडी शोमध्ये चित्रपटांचं प्रमोशन होऊ लागलं आणि लोकांना ते आवडू लागलं. त्यानंतर मराठी कॉमेडी शोज मधून एक फळी बाहेर पडलीच होती. डॉक्टर नीलेशही त्यातलाच. ह्या सर्वांनी मग ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची संकल्पना मांडली आणि लोकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला.
‘चला हवा येऊ द्या’ला मिळालेला उदंड प्रतिसाद हा केवळ कोणाची तरी टर खेचून झालेल्या विनोद निर्मितीमुळे नव्हता. तर ह्या कार्यक्रमात समाविष्ट केलेली अरविन्द जगताप यांची पत्रे, सागर कारंडेचं हळवं सादरीकरण, एखाद्या चित्रपटाचं रीक्रिएशन आणि मुख्य म्हणजे नाटकात कामं करून टायमिंग वर हुकूमत असलेली सर्व नट मंडळी. महाराष्ट्राच्या विनोदात चावटपणा आणि उद्दामपणा हा अंगीभूतच आहे. त्याप्रमाणे ह्या कार्यक्रमात सुद्धा तो दिसतोच.
‘चला हवा येऊ द्या’ची आणखी एक ताकद आहे ती त्याची पटकथा. डॉक्टर नीलेश ती लिहितोच पण सोबत योगेश शिरसाठ आणि अरविन्द जगताप हे सुद्धा लिहितात. मालिका पाहत असताना त्यांचा महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण ते मीडियात सध्या चलतीत असलेली बातमी यांची जाण लक्षात येते. लेखकाने बहुपेडी कसं असावं हे ह्या कार्यक्रमकडे बघून कळतं.
कार्यक्रमात भाऊ म्हणजेच भालचंद्र कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, अंकुर वधावे, विनीत भोंडे यांच्यासह श्रेया बुगडे आणि शीतल शिदम हे कलाकार जान आणतात. भाऊ हा तर हरहुन्नरी कलाकार आहे. त्याच्या हिरोच्या भूमिकांना नेहमीच एक नॉन–हिरोची किनार असल्यामुळे आणि ती तो लीलया वाहून नेत असल्यामुळे त्याची प्रत्येक मूव ही टाळ्यांच्या कडकडाटात होत असते. योगेश, सागर, कुशल आणि कधी कधी भाऊ यांना बायकांच्या भूमिका कराव्या लागतात पण त्यात सुद्धा ते फक्त बायकी भावच दाखवत नाहीत तर त्यात ते किती अनकंफर्टेबल असतात हे ही त्यांच्या हालचालीतून दाखवतात. विशेष उल्लेख श्रेयाचा करायला हवा. अभिनेत्रींची मिमिक्री तशी फारशी होत नसते त्यात श्रेया ही मराठी अभिनेत्रींची मिमिक्री इतक्या सहज करते की आपल्याला विश्वास बसणार नाही. उषा नाडकर्णींच्या मिमिक्रीतील “सरारा नि फरारा” हे शब्द कोण विसरेल. शीतल शिदम ही तर “होऊ द्या वायरल”ची विजेतीच आहे. तिने एबीपी माझाची अँकर ज्ञानदा चव्हाण-कदमच्या बोलण्याच्या स्टाइलला घराघरात पोहोचवलं.
ह्या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा कोण असेल तर तो आहे डॉक्टर नीलेश साबळे. ह्याने एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, नाना पाटेकरने सकारलेला भुत्या, अजितदादा पवार आणि अशा असंख्य व्यक्तिरेखा साकार केल्या आणि सोबत गेल्या सहा वर्षात ह्या सर्व कलाकारांना बांधून ठेवत आपल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या. चित्रपट, नाटक, मालिका यांचे प्रमोशन तर यात होतंच पण समाजात विविध क्षेत्रात काम करणार्या लोकांना सुद्धा आमंत्रित केलं जातं. आज ह्या कार्यक्रमात आल्याशिवाय आपला उपक्रम लोकांपर्यन्त पोहोचला आहे असं कोणत्याही कलाकाराला वाटत नाही. यात फक्त मराठीच नाही तर आजवर अमीर खान, सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अब्राहम अशा हिंदीतील अनेक तारे तारकांनी उपस्थिती लावली आहे.
लॉकडाउनमध्ये हा कार्यक्रम बंद होता पण आता नीलेश “लाव रे तो विडियो” हा नवा कार्यक्रम घेऊन आला आहे. “चला हवा येऊ द्या” सुद्धा स्टुडिओतील प्रेक्षकांच्या शिवाय सुरू आहे पण लोकांना प्रतीक्षा आहे ती “चला हवा येऊ द्या” फुल्ल फॉर्मात बघण्याची. आणि तो लवकरच दिसेल.