Bluepadबदलते शिक्षण - बदलते शिक्षक
Bluepad

बदलते शिक्षण - बदलते शिक्षक

Mridula Shinde
Mridula Shinde
5th Sep, 2020

Share

छडी लगे छमछम, विद्या येई घम घम, घम घम घम...

लहानपणीचं हे गाणं आठवलं का? त्यात म्हटलेले “मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल, दंताजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल” असले शिक्षक मला तरी कधी लाभले नाहीत. त्यात “तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण, पचापचा शिव्या देई खाता खाता पान” हे वाचून तर हा शिक्षक आहे की गल्लीच्या कॉर्नर उभं राहून टवाळक्या करणारा कोणी मवाली आहे असा प्रश्न लहानपणी पडायचा. पण जसजसे मोठे होत गेलो तसतसे वसंत बापट यांनी १९५३ साली लिहीलेल्या या गीताचा अर्थबोध होऊ लागला. त्यात पु.लं.नी ‘मास्तरांच्या नको तिथे बसणार्‍या छडी’चा उल्लेख अनेक ठिकाणी करून ठेवल्यामुळे त्यावेळच्या एकूण शिक्षण पद्धतीविषयी समजू लागलं आणि आम्ही स्वत:ला नशीबवान मानू लागलो कारण आम्हाला असले शिक्षक मिळाले नव्हते. आमचे शिक्षक एका वेळी ७० मुलांना सांभाळायचे आणि शिकवायचे सुद्धा. शिकवण्याची पद्धत खूप काही संवादात्मक नसली तरी बाई किंवा सर कधी नकोसे नाही वाटले.


शाळेत शिक्षणासोबत विविध उपक्रम आणि खेळ असल्यामुळे शाळा नकोशी नाही वाटली. शिक्षक मुलांची तक्रार त्यांच्या आईवडिलांकडे करायचे ते दैनंदिनीत लिहून. पण दैनंदिनी बघून आई वडील म्हणायचे ‘हे लिहून देण्याऐवजी दोन कानाखाली वाजवल्या असत्या तरी चाललं असतं.’ पण आमचा म्हणजे १९९० च्या दहावीच्या बॅचचा काळ म्हणजे खरंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संक्रमणाचा काळ होता तसाच तो शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा होता. आमच्या आधीच्या पिढीला शिक्षकांनी नको तिथे बदडवून काढलं, पुढे तीच मुलं शिक्षक झाल्यावर ‘मार नको पण तक्रार करावी’ म्हणून दैनंदिनीत लिहिलं जायचं. आज ते संक्रमण पूर्ण होऊन परिस्थिति पुर्णपणे बदलली आहे. आज शिक्षक, पालक तर बदललेच पण शिक्षणही बदललं. हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणजेच शिक्षक दिन आहे. खरं तर आपण नेहमी शिक्षक दिनाविषयी बोलताना शिक्षकांविषयी बोलतो पण आजची परिस्थिति बदलली आहे. आज शिक्षक आणि पालक हे दोन्ही वर्ग एकाच पातळीवर किंबहुना एकाच विटनेस बॉक्समध्ये आहेत.

आमच्या वेळच्या शिक्षण पद्धतीला कोणी कितीही नावं ठेवू दे पण आम्ही घडलो ते त्याच शिक्षण पद्धतीत. तेंव्हा शिक्षक आणि पालक ह्या दोघांचेही लक्ष्य हे मूल घडवून एक चांगला नागरिक बनवणं हे होतं. आता मुळातच आर्थिक आणि सामाजिक समिकरणं बदलल्यामुळे मुलाला चांगला नागरिक बनवण्यात दोघांनी हातभार लावण्यापेक्षा दोघांमध्ये एक प्रकारच्या वर्चस्वाची चढाओढ दिसते. शालेय शिक्षण एसएससी बोर्डासोबत सीबीएसई, आयसीएसई अशा बोर्डात विभागल्यामुळे शिक्षणात कमालीची स्पर्धा आली. यात शिक्षक तर विभागलेच पण मुलं आणि पालक सुद्धा विभागले. एका बोर्डाची मुलं, पालक आणि शिक्षक दुसर्‍या बोर्डाच्या लोकांना त्यांची पद्धत वाईट कशी आणि आमची चांगली कशी असा फरक करू लागले. यामुळे नर्सरीत मुलाला घालताना कोणत्या बोर्डात प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेताना पालकांची झालेली घालमेल मी स्वत: अनुभवली आहे. जात धर्मविहीन होता होता भारतीय समाज हा असा वर्गवारीच्या गर्तेत रुतत चालला आहे.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलू लागलो तर केवळ त्याच शिक्षकांविषयी ममत्वाने बोलता येईल जे खेडोपाड्यात अत्यंत कमी पगारावर किंवा तो नाही मिळाला तरी आपलं विद्यादानाचं कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र शहरातील वारेमाप फी घेऊन तकलादू, तद्दन व्यावसायिक शिक्षण देणार्‍या शिक्षकात आवडीने आणि कर्तव्यबुद्धीने शिकवणारे शिक्षक किती हे शोधावं लागेल. शहरातला इंडिया आणि खेड्यातला भारत प्रकर्षाने दिसतो तो ह्या व्यस्त प्रमाणाच्या शिक्षण पद्धतीत. आज देशातील लाखो शाळांमध्ये शिक्षक भरती झालेलीच नाही. मुलं आणि वर्ग शिक्षकांविना आणि शिक्षक नोकरी विना अशा विचित्र कोंडीत सध्या शिक्षण अडकलं आहे.

शिक्षण हे एकसूरी आणि एक जिन्नसी नसावं पण ते वर्गभेद करणारंही नसावं. आज ह्या प्रस्थापित बोर्डांच्या सोबतीने अनेक शाळा स्वत:चा अभ्यासक्रम आणि अधिक निसर्गाभिमुख शाळा सुद्धा चालवत आहेत. त्यांचा मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह मुलांना आणि एकूणच भारताच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आपल्याला सोनम वांगचूक यांची लडाख मधली शाळा तर आठवत असेलच. तसं शिक्षण सर्व थरातून जेंव्हा सुरू होईल तेंव्हा वांगचूक यांच्याप्रमाणे अखिल शिक्षक वर्ग पुन्हा एकदा आदरणीय ठरू लागेल. त्या आशेनेच आपल्याला पदोपदी वेगवेगळे शिक्षण देणार्‍या प्रत्येक व्यक्तीस शिक्षक दिनाच्या शुभेच्छा....

21 

Share


Mridula Shinde
Written by
Mridula Shinde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad