Bluepadकाळच तर आहे… सरून जाईल...
Bluepad

काळच तर आहे… सरून जाईल...

P
Paritosh Lad
4th Sep, 2020

Share


आता बिग बींच्या घरात कोरोना शिरला होता. नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वास्थ्यासाठी रामरक्षा, मृत्युंजय मंत्र जप, देवाला पाण्यात ठेवणे या सगळ्यांसह ट्विटरवर टिवटिवाट सुरू झाला आहे. पण यामुळे ह्या कोरोना प्रकरणाची धास्ती घेतलेल्यांची काळजी आणखीनच वाढली असेल. कारण यापूर्वी अनेकांनी कोरोनाची भीती वाटत असून रात्र रात्र आम्ही झोपत नाही अशा तक्रारी केल्या होत्या. यात त्या लोकांची संख्या जास्त आहे जे आधीच चिंता आणि तणावग्रस्त होते. सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्स त्यांच्या चिंतेत अधिक भर घालत असतील. देशात आज कोरोना सोडला तर अनेक आजारही आहेत आणि अनेक घटनाही घडत आहेत. पण न्यूज चॅनल्सनी त्याकडे जणू पाठ फिरवली आहे. मधला एक काळ “स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं स्थलांतर” ह्या मथळ्याखाली न्यूज चंनेल्सनी मजुरांच्या यातना आणि त्यांचं एकंदर आयुष्य दाखवलं. मजूर म्हणजे ह्या अर्थव्यवस्थेचा पाया. तो डळमळीत झाल्यानंतर पुढे काय असा प्रश्न तणावग्रस्तच नाही तर सर्व सामान्यांनाही पडला. यात सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला वाटलं तरी आपण स्वत:हून काही करू शकत नाही. यावेळी भविष्याची चिंता, जीविताची काळजी वाढत जाणं साहजिकच आहे. पण यातून नवीन काही आजार आपल्याला होण्यापेक्षा आपण आलेल्या परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळलं पाहिजे. जगत जे काही घडत आहे आणि घडणार आहे ते आपण थोपवू शकत नाही. पण आपण आपल्याला काही गोष्टींची सवय लावून सगळ्याच शारीरिक आणि मानसिक विकारांवर नक्कीच नियंत्रण आणू शकतो.


१. टीव्ही आणि सोशल मीडिया पाहणं कमी करा : तुम्हाला सर्वात जास्त काळजीत टाकणारी गोष्ट म्हणजे माहिती अर्थात इन्फॉर्मेशन. असं म्हणतात की माणसाने नेहमी इन्फॉर्म्ड असावं. तुम्ही इन्फॉर्म्ड आहात म्हणजे जगात काय चाललाय याची तुम्हाला माहिती आहे. हे कधीही उत्तमच. पण सध्याच्या काळात तुम्हाला फक्त कोरोनाचे अपडेट्स किंवा त्यांच्या भोवतीने फिरणार्‍या बातम्या किंवा माहिती मिळत आहे. मग तीच माहिती विविध वाहिन्या आणि सोशल मीडियावर मिळवण्यात काय हशील? त्यापेक्षा तुमच्या आवडत्या चॅनेलवर अर्ध्या तासाचं एक बुलेटीन पहिलं तरी पुरेसं आहे. यामुळे तुम्ही इन्फॉर्म्ड रहाल आणि त्या सततच्या कोरोना कोरोनाच्या मार्‍यापासून वाचाल. सतत एखादी गोष्ट ऐकल्याने, पहिल्याने ती गोष्ट आपल्या मनात, मेंदूत घर करते आणि मग आपण तसेच विचार करू लागतो. सध्या कोरोना कसा निर्माण झाला आणि पुढे काय यावर अनेक विडिओज आणि मेसेजेस फिरत असतात. तुम्ही हे अफाट ज्ञान घेऊनसुद्धा प्रत्यक्षात काहीही करू शकणार नाही उलट तुमची चिंता वाढत जाईल. त्यामुळे अशा मेसेजेस पासून दूर राहणेच योग्य.

२. चिंता करण्यापेक्षा स्वत:ची आणि परिवाराची काळजी घ्या : आपल्याला शासनाने जे नियम घालून दिले आहेत ते आपल्या आरोग्यासाठी आहेत हे आपण जाणतोच. हात धुण्याचे आणि अंतर राखण्याचे सर्व नियम नीट पाळा. म्हणजे तुम्ही ह्या आजारापासून दूर रहाल आणि नको ते विचार मनात येणार नाहीत. शिवाय सर्वांनी नियम पाळले तर सर्व काही सुरळीत व्हायला जास्त दिवस लागणार नाहीत. चिंता विसरण्यासाठी दारूचा मार्ग अवलंबू नका. ती जीवनावश्यक गोष्ट नाही हे लक्षात ठेवा.

३. नोकरी व्यवसायाशी संबंधित नेमक्या काय समस्या आहेत त्या लिहा : मनात येणार्‍या गोष्टी लिहून ठेवल्याने फार फरक पडतो. हा फरक जितका मनावर पडतो तितकाच तो तुमच्या निर्णय क्षमतेवर पडतो. तुम्हाला ज्या समस्या वाटत असतील त्या सोडवण्यासाठी कोणते संभव प्रयत्न करता येऊ शकतात त्यांची यादी करा आणि त्या प्रत्येक गोष्टीवर सर्व बाजूंनी अगदी नफा नुकसान याचाही विचार करा आणि सर्वात चांगला पर्याय निवडा. तो पर्याय परफेक्ट असेलच असे नाही. पण तुम्ही तुमच्या कामासाठी कुठून तरी सुरुवात करू शकता एवढा जरी हा पर्याय असला तरी पुरेसे आहे.

४. संपर्कात रहा : हा विषाणू फक्त रोगप्रतिकरक शक्ती कमी असणार्‍यांनाच होतो असा एक समाज होता पण तरुण व्यक्तींना सुद्धा याची लागण झाल्यावर अंतर राखून व्यवहार करणे हा एकाच उपाय यावर आहे हे निश्चित झालं आहे. पण ह्या अंतराला एक काळी किनार आहे. समाजप्रिय असलेला माणूस फार काळ लोकांपासून लांब राहू शकत नाही. त्यासाठी तुम्ही फोन वर आपल्या मित्र मैत्रिणी, कुटुंबिय यांच्याशी बोला. आज झूमसारखे अॅप्स आले आहेत ज्यामुळे एका वेळी अनेक लोक एकत्र बोलू शकतात. आपल्यापैकी अनेक जण ऑफिसच्या कामासाठी त्याचा वापर करतही असतील. पण आठवड्यातून एकदा जरी तुम्ही तो मित्र आणि कुटुंबियांसाठी वापरलात तर तुम्हाला खूप ऊर्जा मिळेल. वाटणारी चिंता आणि तणाव बर्‍याच प्रमाणात कमी होईल. अशा बोलण्यात शक्यतो कोरोनाचे आणि आपल्या परिसरातील रुग्णसंख्या आणि मृत्यू ही एक आकडेवारी म्हणून सांगावी. त्यावर फार चर्चा करू नये.

५. मदत करा : आपण अनेकांच्यापेक्षा खूप चांगल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत आहोत, हे मनाला पटवून द्या. स्वत:हून लोकांची चौकशी करा. आणि शक्य झाल्यास गरजूंना मदत करा.

अशा काही गोष्टी तुम्हाला चिंतेपासून दूर ठेवतील. पण त्यासाठी तुम्ही स्वत:च्या प्राणायाम किंवा तत्सम ध्यान साधनेच्या माध्यमातून मनाला नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. मनाला पटवा की वेळ तशीच रहात नाही. ही वेळ सुद्धा राहणार नाही. खरं तर असा वेळ पुन्हा मिळणार नाही. मस्त रहा, मजा करा आणि काळजी घ्या...

17 

Share


P
Written by
Paritosh Lad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad