Bluepadमृदगंध.......गंध निसर्गाच्या नवलाईचा.
Bluepad

मृदगंध.......गंध निसर्गाच्या नवलाईचा.

डॉ अमित.
डॉ अमित.
4th Sep, 2020

Share

मृदगंध.......गंध निसर्गाच्या नवलाईचा. मध्यंतरी लॉक डाऊन च्या निमित्ताने तसा बराच वेळ निवांत मिळत होता....त्यामुळे थोडे इडियट बॉक्स(..हल्ली बॉक्स नसून फ्रेम आहे म्हणा..😄😄..)त्या फ्रेम मध्ये थोडा जास्तच जीव गुंतला होता....हो हो मी सर्वांच्या लाडक्या टीव्ही बद्दलच बोलतो आहे. त्याचा थोडा फायदा ही झाला तो असा की बरेच राहून गेलेले काही आवर्जून बघायचे असे ठरवलेले चित्रपट पाहण्यात आहे...हाच काय तो इवलासा फायदा..मनोरंजनाच्या दृष्टीने झाला.... त्यात चित्रपटा पेक्षा जास्त लक्षात राहू लागली ती एक जाहिरात जी थोड्या थोड्या वेळाने आपल्या सुगंधात आपल्याला जणू जबरदस्तीने भिजवून काढत होती ....हो हो ती जाहिरात होती फॉग या परफ्यूमची आणि शेवट आपल्यालाच विचारत होती की फॉग असल्यास आणखी काय पाहिजे? असा कृत्रिम सुगंध मनात ठासवत असताना नकळत पहिल्या पावसात बाहेरून येणारा मातीचा गंध नाकाला स्पर्शून गेला आणि मी जागच्या जागी मोहरलो....जणू बहकून गेलो. रणरणत्या उन्हाने भाजून निघालेल्या धरतीला पहिल्या पावसाने जेंव्हा आलिंगन दिले तेंव्हा खूप दिवसांनी भेटलेले दोन जीव आज तृप्त झाले आहेत असेच वाटत राहिले. हाच तो हवा हवासा पहिला पावसाचे आगमन होण्यापूर्वी भिजलेल्या मातीने फैलवलेला गंध...मृदगंध जो आपले तन मन प्रफुल्लित करतो.मन मोहवून टाकतो. गंधाळली आज हवा ही मातीच्या अपरिमित सुगंधाने नाही तोड याला कशाची जी वेड लावी जीवा या आनंदाने हा एकमेव असा गंध जो आजपर्यंत कुठल्याही कंपनी ला बाटलीत बंद करता आला नाही किंवा त्याला बाटलीत उतरवता आला नव्हता. पण इतक्यातच वाचण्यात आले की हा मातीचा गंधही अत्तराच्या कुपीत आपल्याला अनुभवायला मिळेल तो ही आपल्या दिल्लीतल्या चांदणी चौकात स्थित एका भारतीय अत्तराच्या व्यापाऱ्याकडे. त्याचे नाव आहे गुलाबचंद जोहरीमल. हा गंध येतो तो पहिल्या पावसानंतरच बरका.त्यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे. मातीत असलेल्या अॅक्टीनोमायसिटीस या जिवाणू मुळे. हा जीवाणू मातीचे विघटन करून शेंद्रीय खत निर्माण करायला देखील शेतकऱ्यांना मदत करतो.म्हणून तर पहिल्या पावसाचा हा गोडसर मृदगंध सर्वांना हरखून टाकतो,शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करतो. मातीचा हा गंध मात्र हळू हळू कमी होत चालला आहे.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मातीची,म्हणजेच जमिनीची होणारी धूप. प्रसिध्द कृषितज्ज्ञ सर हॉवर्ड यांनी भाकीत केले होते की जर आपण या मातीला सांभाळू शकलो नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसतील.कारण जसे पाणी आपली तहान भागविते तसे माती आपली भूक भागविते आणि हवा आपल्याला जगविते. ओल्या मातीचा सुगंध हा ओला बरसती जेंव्हा या ओल्या धारा दरवळतो चोहीकडे मंद मृदगंध भारून टाकतो निसर्गाचा देव्हारा असा हा निसर्गाचा देव्हारा जर असाच आपल्याला मृदगंधाने भारून टाकायचा असेल तर आपण जंगलाचे संवर्धन,जतन केले पाहिजे.झाडे लावली पाहिजेत.कारण झाडे ही मातीला आपल्या मुळांशी घट्ट धरून ठेवतात.वाऱ्या मुळे वाहून जाणारी माती जमिनीला बिलगून राहते. आपण जर मातीला वाचवू शकलो तरच प्रगतीला आपण आलिंगन देवू शकतो आणि आपले जीवन अधिक गतिशिल करू शकतो. चला तर मग आपण हा मृदगंध भरभरून अनुभवूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी याचा स्रोत टिकवून ठेवूयात. आणि हो त्या फॉगवाल्या सारखे निसर्गाला सांगुयात की तू आम्हाला येवढं छान एकमेवाद्वितीय असे हे मृदगंध दिलंय आणखी काय हवंय? खरंय की नाही? डॉ अमित.

19 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad