Bluepad | Bluepad
Bluepad
गणेशोत्सव - काल, आज व उद्या!


s
shrikant Newarekar
3rd Sep, 2020

Share


गणेशोत्सव - काल, आज व उद्या!
"श्रावणमासी हर्ष मानसी" या बालकवींच्या काव्यपंक्ती किंबहुना ही संपूर्ण कविताच श्रावण महिन्याचे चित्र डोळ्यापुढे उभे करते. श्रावण हा नवनिर्मितीचा महिना. सर्वत्र पसरलेली हिरवळ, फुलांचा सुगंध, श्रावण सोमवार, नागपंचमी व रक्षाबंधन इत्यादी नानाविध उत्सव व त्यामुळे एकंदरीतच हर्ष उल्हासाचे वातावरण व सर्वत्र चैतन्य. श्रावण संपताच भाद्रपद चालू होतो आणि चाहूल लागते ती सर्वात लोकप्रिय उत्सव अर्थात गणेशोत्सवाची.गणेश, गणपती, विनायक, गजानन, लंबोदर अशी नानाविध नावानी तुमचा, आमचा बाप्पा ओळखला जातो. अतिशय आनंदाने, प्रेमाने हा उत्सव साजरा केला जातो. दीड दिवसाचा, तीन, पाच व दहा दिवसांचा गणपती हा पूर्वापार परंपरेने उत्साहात साजरा केला जातो.भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात श्रीगणेशाचे आगमन होते. विधिवत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते व अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. घरात बाप्पाचे आगमन म्हणजे चैतन्य, सकारात्मकता यांचे आगमन होय.गणेशोत्सव हा घरा घरात म्हणजे वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपात ही साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चैतन्य निर्माण करण्यासाठी, लोकाना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती सार्वजनिक रुपात साजरी करण्याची प्रथा सुरू केली.गणेशोत्सवाचा विचार करता, भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ अर्थात काल, आज व उद्या या तीन पातळीवर विचार करणे क्रमप्राप्त ठरते.अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवाला ऐतिहासिक पार्श्वभूमी व उदात्त असे वैचारिक अधिष्ठान आहे हे सर्वश्रुत आहे. समाजातील सर्व थरातील लोकांना एकत्र आणत, स्वातंत्र्याचे महत्व, तो विचार बिंबवणं हा उदात्त हेतूने हा उत्सव सुरू झाला. त्यामुळे पूर्वी हा सार्वजनिक उत्सव वैचारिक व्यासपीठ होते. टिळकांच्या आवाहनानुसार गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला. जातीभेद विसरून या बुद्धीदाता, विघ्नहर्ता गणेशाच्या उत्सवासाठी लोक एकत्र येत होते. टिळकांना अपेक्षित जागृती यामुळे साध्य झाली. व्याख्याने, कीर्तने, प्रवचने या माध्यमातून लोकाना त्यांच्या कष्टप्रद जिवन व त्यासाठी जबाबदार घटक याची जाणीव होवू लागली. लोकांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळू लागला. हाय सार्वजनिक गणेशोत्सव स्वातंत्र्याचा विचार शिकवणारी शाळा होती. आजच्या व्यवस्थापन क्षेत्रातील टीमवर्क हे कौशल्य त्याकाळी या उत्सवानिमित्त आपसूकच जनमानसात रुजले. अनेक कलाकार, वक्ते, शाहीर, गायक, नट यातून घडले. त्यांनी समाज जागृतीचा वसा घेऊन जनमानसात संघटन घडवुन आणले.एकंदरित असे म्हणता येईल की, त्याकाळात गणेशोत्सव हे समाज जागृतीचे व्यासपीठ होते. या उत्सवातून अनेकांचा 'व्यक्तिमत्त्व विकास' घडला नव्हे उदात्त हेतूने घडवुन आणला गेला.तर तेव्हापासून ते आजतागायत हा गणेशोत्सव आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा होतच आहे.सध्यकालीन गणेश उत्सवाचे स्वरूप पाहता सुजाण मनाला काहीसा खेद वाटल्यावाचून राहत नाही. गणेशोत्सवाचे धार्मिक व सामाजिक अधिष्ठान आज काही घटकांनी बाधित झाले आहे. उत्सवाची आतुरता आजही कायम आहे, नोकरीनिमित्त इतरत्र असणारे चाकरमानी या उत्सवासाठी गावची वाट धरतात, अनेक अडचणीचा सामना करीत गणरायाच्या स्वागतासाठी स्वगृही जातात.पण सार्वजनिक गणेशोत्सवाचे कालचे आणि आजचे स्वरुप यात प्रचंड तफावत आपणास दिसून येते. आज एकाच गावात, शहरात अनेक सार्वजनिक गणेश मंडळे असतात. मुंबईसारख्या शहरात तर ही संख्या प्रचंड मोठी आहे.पूर्वीच्या कीर्तन, प्रवचन, व्याख्याने याची जागा आज आधुनिक, महागड्या देखावे, ऑर्केस्ट्रा व तत्सम दिखाऊ गोष्टींनी घेतली आहे. सजावट, देखावा, आधुनिकता, तामजाम याबाबतीत सर्वच गणेश मंडळांमध्ये स्पर्धा जाणवते. समाज जागृतीचा हेतू मागे पडून, बडेजाव मिरवणे हा हेतू आज सर्वसामान्य व सर्वमान्य झाला आहे. या गोष्टीना विरोध करणार्‍यांना 'पुरातनवादी' म्हणून दुर्लक्षित केले जाते.काही सार्वजनिक गणेश मंडळे गणपतीची वर्गणी ही खंडणी असल्यासारखे वसूल करतात. वर्गणी देण्यास असमर्थता दर्शविला तर त्या व्यक्तीचा उद्धार केला जातो व त्यांच्या नावाने यथेच्छ शिमगा केला जातो. या सर्व बाबी वृत्तपत्र, समाजमाध्यमातून केवळ चर्चिल्या जातात व सवयीने विसरल्या जातात.दोन गणेश मंडळामध्ये असणारी जीवघेणी स्पर्धा, त्यातून होणारे वाद, मारामाऱ्या, काही ठिकाणी होतात,पण चलता है म्हणून त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला जातो. मंडळांमध्ये समाजकारण बाहेर पडून त्याजागी राजकारण शिरले आहे. देशासाठी लढणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांना घडवण्यासाठी सुरू झालेला हा गणेशोत्सव आज कार्यकर्ते घडवत आहे ही खेदाची बाब आहे.काही प्रसिद्ध गणेश मंडळाचे सेवेकरी (?) त्याठिकाणी असलेली अरेरावी, उद्धटपणा, दांडगाई या गोष्टी कानावर आल्यावर क्षणिक संताप व्यक्त केला जातो पण तो क्षणीकच असतो हे दुर्दैव!या काळात लाऊडस्पीकर वर कर्णकर्कश आवाजात गीत (?) हाही प्रश्न महत्वाचा आहेच. या गाण्यातून कुठली समाजजागृती होते हा खूप मोठा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. गणेश आगमन, विसर्जनाच्या तासन्‌तास चालणार्‍या मिरवणुका, त्यामुळे निर्माण होणारे गर्दीचे, व्यवस्थापनाचे प्रश्न, त्यात होणारी भांडणे, मारामाऱ्या, प्रसंगी चेंगराचेंगरी आणि याकडे दुर्लक्ष करून 'रसात' तल्लीन होऊन नाचणारे युवक हे पाहून मन सुन्न होते.याला अपवाद निश्चित आहेत, पण ते अत्यंत कमी.मनाला कासावीस करणारे हे २०२० वर्ष, त्यात असणारा कोरोना चा प्रकोप यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मर्यादित झाला आहे. ही आपत्ती लक्षात घेऊन काही मंडळानी गणेशोत्सव काळात रक्तदान शिबिरे, समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत, हे निश्चितच आशादायी व प्रशंसनीय आहे.येणार्‍या काळात हा गणेशोत्सव कसा असेल? याचा विचार करतांना असे वाटते की त्याचे स्वरुप नक्कीच बदलेल.बदल हा निसर्गनियम आहे. माणूस हा चुकांमधून शिकणारा बुद्धिमान प्राणी आहे, असे म्हंटले जाते. हे विधान सत्य ठरेल व सध्या असणारे दोष दूर करून गणेशोत्सवात सुधारणा केली जाईल, असे वाटते.भविष्यकालीन गणेशोत्सवतआधुनिकतेला वैचारिक ठाम अधिष्ठान असेल. माणसांची केवळ गर्दी नसेल तर दर्दी ची गर्दी असेल. मूर्तीच्या उंचीची स्पर्धा होण्याऐवजी विचारांच्या उंचीची निकोप चढाओढ असेल. समाजिक प्रश्नांचा, समकालीन समस्यांचा देखावा साकारण्याऐवजी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जावा.दिखाऊ सजावटीवर खर्च करण्याऐवजी तो निधी पीडितांना अडचणी सोडवायला, त्यांचे जिवन सजवायला वापरायला हवा. कर्कश्श आवाजाने कानांचे पडदे फाटण्याऐवजी दुर्लक्षित समस्या सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचवल्या जातील. मूर्तीपेक्षा वैचारिक किर्तीला भविष्यात महत्त्वाचे स्थान असेल."घडेल मनांचा संवाददूर होईल सार्वजनिक विसंवादघडतील वैचारिक सुसंवादगळून पडतील आपसातील फुटकळ वादगर्जेल विघ्नहर्त्याच्या नामाचा नादसमाजातील प्रश्न सोडविण्या गणेश मंडळे देतील प्रतिसाद,व्हावा विचारांचा महोत्सव,असा असावा भविष्यकालीन गणेशोत्सव!!"©श्रीकांत दत्तात्रय नेवरेकर

23 

Share


s
Written by
shrikant Newarekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad