Bluepadपंतप्रधान मोदीजींना माझे ओपन लेटर
Bluepad

पंतप्रधान मोदीजींना माझे ओपन लेटर

D
Deepti Angrish M.
3rd Sep, 2020

Share

पंतप्रधानजी, अशी उपाययोजना करा की जगभरात “भारत पॅटर्न” राबवला जाईल...

आदरणीय नरेंद्र मोदीजी,
पंतप्रधान, भारत सरकार.
नमस्कार सर,
पत्रास कारण की आज आपल्यावर अनेक बाजूंनी खूप दबाव येत आहे. आपण देशाचे पहिले पंतप्रधान आहात ज्यांनी देशात केवळ ६ वर्षात अनेक स्थित्यंतरे पहिली किंबहुना घडवून आणली. आपण विदेशात भारताला मिळवून दिलेला सन्मान हा नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान ही आहे. पण देशात तुमच्या विषयी फार संमिश्र भावना आहेत. तुम्ही एका रात्रीत घेतलेल्या निर्णयांनी फार मोठी वादळे निर्माण केलीत, त्यासाठी तुम्हाला फार मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं. आता कोरोना महामारीच्या काळात सुद्धा सरकारच्या चुकीच्या निर्णयांना जबाबदार धरलं जात आहे. विरोधी पक्ष याविषयी आवाज उठवतात पण याला तुम्ही स्वत: उत्तर देण्याऐवजी तुमचे अर्थ मंत्री आणि अर्थ राज्य मंत्री उत्तर देत आहेत. आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती.


आपण २३ मार्च २०२० रोजी संध्याकाळी ८ वाजता जाहीर केलं की रात्री १२ नंतर सर्व व्यवहार ठप्प होणार. काय विचार करून तुम्ही आणि तुमच्या मंत्री मंडळाने हा निर्णय घेतला होता? २१ दिवसात सर्व काही ठीक होईल हा? इतका आशावाद तुम्हाला कसा काय आला? पगारी नोकरदार असणारे २१ दिवस तर घरी राहतील पण पोटावर हात असणारे लोक २१ दिवस कसे जगतील, राज्यांनी त्यांची काय व्यवस्था करावी, राज्यांनी याबाबतीत कोणते स्वयंपूर्ण निर्णय घ्यावेत याविषयीच्या कोणत्या सूचना पीएम ऑफिसकडून दिल्या गेल्या होता?
याशिवाय लोकांची साधी मानसिकता सुद्धा लक्षात घेतली जात नाहीये. बाजाराची अत्यल्प वेळ निघून गेल्यावर पोलीस लोकांना बाजारात प्रवेश देणार नाहीत हे माहीत असताना लोक एकाच वेळी बाजारात येणारच. तेच जर वेळ वाढवली तर तेवढी गर्दी होणार नाही. ही साधी बाब कोणाच्याच कशी लक्षात येत नाही?

आपल्याला माहीत होतं की आपल्या देशात कोरोनाचं संक्रमण हे परदेशातून भारतात आलेल्या लोकांकडून झालं आहे, तर मग त्यावेळी परदेशातून आलेल्या लोकांची यादी करून केवळ त्यांना आणि त्यांच्या परिसरातील लोकांना क्वारंटाईन केलं असतं आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या बाकीच्यांच्या झटपट तपासण्या केल्या असत्या तर एवढं लॉकडाउन करण्याची गरज पडली नसती. लॉकडाऊनची घोषणा करताना देशात एवढ्या पॉझिटिव्ह केसेस नव्हत्या मात्र आज त्या का वाढल्या याचं उत्तर आहे, तपासाण्यंचा अभाव. आज चौथे लॉकडाऊन सुरू होऊनही तपासण्या होत नाही आहेत.

आता प्रश्न स्थलांतरितांचा. फाळणीनंतरचं सर्वात मोठं स्थलांतर असं ज्याचं वर्णन केलं जात आहे ते फाळणीपेक्षाही दु:खद आहे कारण याला सर्वस्वी आपण आणि आपलं सरकार जबाबदार आहे. ट्रेन बंद केल्या गेल्या तेंव्हा या मजुरांची उपासमार सुरू झालीच होती आणि त्यांनी शहरं सोडून गावी निघून जाणं पत्करलं होतं. आपल्याला पकडलं जाईल या भीतीने ते दुधाच्या टँकर, भाज्यांच्या गाड्या यातून जाऊ लागले पण अर्ध्या वाटेवर पोहोचूनसुद्धा त्यांना तिथून पिटाळून आपआपल्या घरी परत पाठवणार्‍या सरकारांनी त्यांची काय व्यवस्था की दुर्दशा केली हे आपण पहातोच आहोत. आता दोन महिन्यांनी ट्रेन सुरू केल्यात पण त्यात नंबर लागणं कठीण म्हणून लोक पायी चालले आहेत.

पंतप्रधानजी, “मन की बात” मधून तुम्ही लोकांना फार चांगल्या गोष्टी सांगता पण तुम्ही त्यांना हे आश्वासन का देऊ शकला नाहीत की तुम्हाला लवकरात लवकर गावी जाण्याचा मार्ग मोकळा होईल. तुम्ही सर्व राज्यांना त्यांच्या राज्यात अडकून पडलेल्यांसाठी त्यांच्या गावी जाण्याची तरतूद करण्याचे आदेश का दिले नाहीत? यासोबतच ज्या राज्यात ते लोक जातील तिथे त्यांना १४ दिवस आयसोलेशनमध्ये ठेऊन मग तपासणी करून त्यांच्या त्यांच्या गावी पाठवण्याचे आदेश संबंधित राज्यांना द्यायला हवे होते. पण राज्य आपापली जबाबदारी झिडकारत असताना तुम्ही गप्प का?

आज सर्व परिवहन बंद असलं आणि ट्रेन आणि बसेस आपुर्‍य पडत असतील तर टुर्स अँड ट्रावेल्स वाल्यांची मदत का घेऊ शकत नाहीत? यासाठी राज्यांच्या सीमा ओलांडण्याचीही गरज नाही. एका राज्यातील बसेस दुसर्‍या राज्याच्या सीमेवर आणून त्यातील लोकांना दुसर्‍या राज्यातील बसमध्ये यादी प्रमाणे बसवून त्यांना उचित स्थळी घेऊन जाता येऊ शकेल. यात बसचा नंबर, प्रवाशांची संख्या, नाव नंबर या तपाशीलांची देवाण घेवाण करून हे सहज साध्य होऊ शकेल. मेल, व्हाट्सअॅप अशी सर्व माध्यमं असताना यात इतकी दिरंगाई का होते आहे?
ह्या महामारीतून वाचण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते शारीरिक अंतर राखणं आणि मास्क वापरणं. ह्या दोन्हीचं पालन करून आपण प्रवास आणि लहानसहान कामे सुरू करू शकतो. लोकांना रांग लावून प्रवास करण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकांची मदत घेऊ शकतो.
पंतप्रधानजी, स्वाइन फ्लू (एचवन एनवन) सारखे आजार अजूनही पुर्णपणे संपले नाहीत. त्याचे रुग्ण अधूनमधून दिसत असतात. त्या आजाराला सरसकट सर्व व्यवहार बंद न करता नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलेले तज्ञ देशात आहेत. त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरेल. त्यांची जर एकदा भेट घेतलीत तर भारत कोरोनाच्या महामारीवर असा विजय मिळवेल की जगभरात “भारत पॅटर्न”चा अभ्यास केला जाईल. कृपा करून लक्ष द्या.

आपली एक, अगतिक नागरिक,
दीप्ती

74 

Share


D
Written by
Deepti Angrish M.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad