Bluepadप्रणव मुखर्जी : अध्वर्यूचे देहावसान
Bluepad

प्रणव मुखर्जी : अध्वर्यूचे देहावसान

Surekha Bhosale
Surekha Bhosale
1st Sep, 2020

Share


महाराष्ट्राला जसं पुरोगामी आणि कणखर नेतृत्वाची भूमी म्हटलं जातं तसंच पश्चिम बंगालला बुद्धिवंतांची भूमी म्हटलं जातं. कॉंग्रेसची पकड सुद्धा बंगालात खूप मजबूत होती. यातच कामदा किंकर मुखर्जी होते जे १९२० पासून सक्रिय कोंग्रेसी होते आणि ते १९५२ ते ६४ पर्यन्त पश्चिम बंगालच्या विरभूम मधून जिल्हा कॉंग्रेस कामितीचे अध्यक्ष होते. ब्रिटीशांविरोधात बंड पुकारल्यामुळे त्यांना १० वर्षांचा तुरुंगवासही भोगायला लागला. त्यांचा विवाह राजलक्ष्मी यांच्याशी झाला आणि ११ डिसेंबर १९३५ रोजी त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं गेलं प्रणव. एका लढाऊ व्यक्तीचा हा मुलगा पुढे देशाचा राष्ट्रपति होणार आहे असं जर कोणाला सांगितलं असतं तर कोणी विश्वास ठेवला नसता. हो तेच आपले माजी राष्ट्रपति प्रणव मुखर्जी. आपल्या आयुष्यात अनेक वादळे झेलून अखेर हा पक्का कोंग्रेसी आज चिरनिद्रेत गेला. देशाला घडताना बघणार्‍यातील एक अध्वर्यू आज आपल्यातून निघून गेला आहे.


प्रणवदा यांचं जीवन म्हणजे शिक्षणातून आपलं आयुष्य घडवत, भारतीय राजकरणात एक एक पायरी चढत देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या व्यक्तिचं उदाहरण आहे. कॉंग्रेसचे सत्ता पर्व, घसरण, डागडुजी ह्या सगळ्याचे ते गेल्या ५० वर्षातील साक्षीदार होते. राजकरणात त्यांनी जशी सत्ता उपभोगली तशीच “या सत्तेत जीव रमत नाही” असं म्हणण्याची वेळ देखील त्यांच्यावर आली. कॉंग्रेस मधल्या घराणेशाहीला न जुमानता, आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर उठलेल्या वावड्यांना न जुमानता आपल्या विचारसरणीवर ठाम राहून अत्यंत मोक्याची पदे भूषविणारा त्यांच्यासारखा व्यक्ति भारतात सध्या तरी सापडणार नाही. प्रणवदांच्या या निर्भीड आणि सत्शीलतेचं गमक त्यांच्या उमेदवारीच्या काळातील दिवसांमध्ये आहे. कोलकाता विद्यापीठात इतिहास आणि राजकारण यात पदवी संपादन करण्याससोबत त्यांनी कायद्याची पदवी घेतली. वकिली, महाविद्यालयात प्राध्यापकी आणि ‘देशेर डाक’ या वर्तमानपत्रात पत्रकार अशा तीन गोष्टी त्यांनी एकाच वेळी केल्या. ते बंगीय साहित्य परिषदेचे ट्रस्टी आणि अखिल भारतीय बंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा होते. ह्याच कामांच्या अनुभवावर त्यांच्या पुढील डोलार्‍याचा पाया उभा राहिला होता. त्यांना मानद डी.लिट पदवी मिळाली आहे. याच सोबत २०१९ मध्ये भाजपा सरकारने त्यांच्या प्रदीर्घ सेवेसाठी त्यांना भारतरत्न सुद्धा बहाल केले.

प्रणवदांनी योजना आयोगाचे उपाध्यक्ष, दोन वेळा अर्थ मंत्री, संरक्षण मंत्री, परदेश व्यवहार मंत्री, राज्यसभेचे अध्यक्ष, राष्ट्रपति अशा अनेक उच्च आणि सर्वोच्च स्थानावर ते विराजमान झाले. पण  आज ही त्यांच्या पंतप्रधान न होऊ शकण्यासाठी हळहळ व्यक्त केली जात आहे. आणि त्यांना देखील याची फार मोठी खंत होती.

१९८४ साली इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर इंदिराजींच्या जवळचे म्हणून पंतप्रधान पदासाठी प्रणव मुखर्जी यांच्या नावाची चर्चा होती. पण राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि त्यांनी प्रणवदांना मंत्रिमंडळातून निलंबित केलं. त्यांच्या निलंबनाला कारण ठरली ती इलस्ट्रेटेड विकली या नियतकालिकात संपादक प्रीतीश नंदी यांनी घेतलेली प्रणवदांची मुलाखत. गैरसमाजातून गोष्टी कशा बिघडत गेल्या याची फार मोठी बोच प्रणवदांना लागून राहिली होती. हा काळ त्यांच्यासाठी फार वाईट होता. याचा उल्लेख त्यांनी "द टर्बुलेंट इयर्स १९८० – १९८६” या पुस्तकात केला आहे. या निलंबनाने ते गांधी-नेहरू घराण्यापासून लांब गेले.
प्रणवदा १९८८ साली काँग्रेस पक्षात परतले आणि १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा विजय झाला, नरसिंह राव पंतप्रधान झाले आणि प्रणवदा पुन्हा एकदा पक्षात स्थिरावले. पण एकदा २००४ मध्ये आणि नंतर २००९ मध्ये कॉंग्रेस सत्तेवर येऊनही सोनिया गांधीनी आपल्या पतीचीच री ओढली आणि या दोन्ही वेळी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले.

२०१० मध्ये कॉंग्रेस तथाकथित स्पेक्ट्रम, कोळसा भ्रष्टाचार आणि लोकपाल नियुक्तीच्या गर्तेत सापडली होती तेव्हा यातून बाहेर काढण्यासाठी २७ विविध मंत्रिगटांपैकी १२ मंत्रिगटांचे प्रमुखपद प्रणवदांना दिले होते. आज लोकांचा विरोध न जुमानता जो जीएसटी लादला जातो त्याचा प्रथम उद्गाता प्रणवदा होते. त्यांनी यावर सर्व पक्षीय सहमति मिळवण्याचा प्रयत्न केला पण ती मिळाली नाही. आणि आज ते विरोधकच त्या जीएसटीची अंमलबाजवणी करीत आहे. प्रणवदांना ते राबवण्याची संधी मिळाली असती तर कदाचित जीएसटीचा आजच्या एवढा घोळ झाला नसता.

प्रणवदांनी वेळोवेळी आणि संसदेत केलेल्या भाषणात त्यांचे धर्मनिरपेक्ष, मानवतावादी विचार लक्षणीय ठरत असत. कट्टर कॉंग्रेसी असून सुद्धा आपल्या सहकार्‍यांचेही कान उपटायला ते कमी करीत नसत. एनडीएच्या काळात त्यांनी राष्ट्रपति म्हणून आपली विचारधारा जपत त्या सरकारला सहाय्य केलं आणि प्रसंगी त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा समाचारही घेतला. असे हे निष्ठावान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रणवदांना भावपूर्ण आदरांजली.

15 

Share


Surekha Bhosale
Written by
Surekha Bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad