Bluepad | Bluepad
Bluepad
जेईई, नीटच्या परीक्षा : नियोजनाची परीक्षा
Anjela Pawar
Anjela Pawar
28th Aug, 2020

Share


कोरोनाने सर्वच व्यवस्था कोलमडून ठेवली आहे तसंच भविष्य ही धूसर करून ठेवलं आहे. यावर्षी भारतातील अभियांत्रिकी आणि चिकित्सा विभागाच्या अनुक्रमे जेईईच्या (JEE - जॉइंट इंजिनिअरिंग एक्झॅम) १५ लाख ९७ हजार विद्यार्थी आणि नीटच्या (NEET – नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) ९ लाख ५३ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. ह्या प्रवेश परीक्षा कोरोना काळात दोनदा म्हणजे एकदा एप्रिल आणि दुसर्‍यांदा मे महिन्यात स्थगित करण्यात आल्या. कोरोना महामारीमुळे परीक्षांची तलवार लटकवत ठेवणं योग्य नाही म्हणून २ जुलै रोजी मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ राष्ट्रीय परीक्षण एजेंसीला (NTA) ३ जुलै पर्यन्त निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे एनटीएने जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर आणि नीट परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार असल्याचे घोधित केले. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेऊ नयेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला आणि परीक्षा स्थळी असणार्‍या स्टाफला लागण होऊ शकते म्हणून अनेक स्तरातून विरोध झाला. ११ राज्यांच्या ११ विद्यार्थ्यानी माननीय सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण १७ ऑगस्ट २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वात न्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायाधीश कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळत दोन्ही परीक्षा ठरलेल्या दिवशीच होतील असा निर्णय दिला आहे.


जेईई, नीटच्या परीक्षा : नियोजनाची परीक्षा


या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील अलख आलोक श्रीवास्तव म्हणाले की, ‘कोरोनाची लस येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आम्ही परीक्षा टाळण्याची नाही तर पुढे ढकलण्याची विनंती करीत आहोत.” पण खंडपीठाला यात काही तथ्य वाटलं नाही म्हणून “आयुष्य पुढे चालत राहिलं पाहिजे” अशी पुष्टी जोडत ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
या निर्णयामुळे देशभरात सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संपूर्ण देशात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि राजकीय नेते दोन गटात विभागले आहेत. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्य सरकारांचा या परीक्षा आत्ता घेण्यास विरोध आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, चिराग पासवान आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ह्या परीक्षा स्थगित करण्याची आणि दिवाळीपर्यंत न घेण्याची आणि तसे निर्देश शिक्षण मंत्रालयाला देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. समाजवादी पक्षाकडून परीक्षा स्थगित करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने सुद्धा भारतातील या परीक्षा म्हणजे मुलांच्या जीवाशी खेळ असं म्हटलं आहे.

तर दुसरीकडे गुजरात पेरेंट्स असोसिएशनने ह्या परीक्षा स्थगित न करण्यासाठी याचिका केली आहे.  देश आणि परदेशातून १५० हून अधिक शिक्षणतज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटलं आहे की, ह्या परीक्षा घेण्यात आणखी विलंब म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणे होय. ह्या पत्रात परीक्षांना विरोध करणार्‍यांवर निशाणा साधत त्यांना आपला राजकीय अजेंडा चालवणारे असंही म्हटलं आहे.

या सर्व मतमतांतरत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मांडलेले मुद्दे अधिक समर्पक वाटतात. त्यांनी कोविड १९ सह देशभरात तुफानी पाऊस आणि त्यामुळे दुथडी भरून वाहणार्‍या नद्या, दळणवळणाच्या साधनांची वानवा आणि एनटीएने न केलेली पुरेशी सुविधा ह्या कारणांमुळे परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. ओडिशामध्ये जेईई मेनमध्ये ५० हजार आणि नीटमध्ये ४० हजार विद्यार्थी बसणार आहेत. राज्यात एकूण ३० जिल्हे असतानाही एनटीएने केवळ ७ परीक्षा केंद्रे दिली आहेत. त्या केंद्रांवर मुलांची कोरोना संबंधित सुरक्षा व्यवस्था कशी काय होऊ शकेल ही शंका तर आहेच शिवाय आदिवासी पाडे हे शहरांपासून लांब आहेत. सध्या काही भागात लॉकडाउन असल्यामुळे मुलांना केंद्रावर येण्यासाठी कोणतीही सोय नाही. ही सर्व कारणे सांगतानाच पटनाईक यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्रे उभी करण्याची मागणी केली आहे जेणे करून प्रवासात विद्यार्थ्यांचा अधिक वेळ जाणार नाही. यासाठी पाऊस आणि कोरोना ह्या दोन्ही संकटांना थोडा विराम मिळाल्यावर ह्या परीक्षा घ्याव्यात असं त्यांनी पंतप्रधानांशी फोन वर बोलताना सांगितलं. पावसामुळे ओडिशा प्रमाणेच बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांची अवस्था झाली आहे; त्यामुळे परीक्षा स्थगित करण्याची मागणी सध्या योग्य वाटत आहे.

तरी एनटीएने सप्टेंबर महिन्यात ठरलेल्या दिवशी परीक्षा घेण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पूर्वीच्या सेंटर्स मध्ये वाढ केली आहे. एनटीएचे संचालक विनीत जोशी यांनी सांगितले की परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया स्पर्शविहीन असेल. ह्या आश्वासनानंतरही अस्मानी संकटात आणि लॉकडाउनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न काही सुटत नाही. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळावी आणि महामारीच्या जाळ्यात कोणी फसू नये म्हणून ही परीक्षा स्थगित करावी असं मला वाटतंय.

19 

Share


Anjela Pawar
Written by
Anjela Pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad