Bluepad | Bluepad
Bluepad
कमला हॅरिस : अमेरिकेच्या राजकारणावरचा उगवता तारा
G
Gayatri Baghel
26th Aug, 2020

Share

भारताचा डंका नेहमीच जगाच्या कानाकोपर्‍यात निनादत राहिला आहे. मग तो गूगलच्या सीईओ पदी विराजमान झालेल्या सुंदर पिचाई यांच्या रूपाने असो की आयरलँडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या रूपाने. यांच्याप्रमाणे अनेक लोकांनी सर्व जगात प्रतिष्ठेच्या जागेवर आपली मुहूर्तमेढ रोवली आहे. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी सिनेटर कमला हॅरिस यांची निवड उपराष्ट्राध्यक्षपदासाठी आपली 'रनिंग मेट' म्हणून केली व ते जिंकूनही आले. यानंतर भारतामध्ये कौतुकाची एक लहर उमटली आहे. भारतीय वंशाची एखादी स्त्री जागतिक महासत्तेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार ही खासच अभिमानाची गोष्ट आहे. अर्थात आजवर कमला यांच्याविषयी सामान्य भारतीयांना काही माहिती होती असं खात्रीने म्हणता येत नाही पण आज त्यांच्या आजोळच्या घरापासून सगळ्याची माहिती सोशल मीडियावर पाहिली आणि ऐकली जात आहे.
कमला हॅरिस : अमेरिकेच्या राजकारणावरचा उगवता तारा

कमला यांची आई श्यामला गोपालन ह्या चेन्नईमध्ये म्हणजेच ब्रिटिश काळातील मद्रासमध्ये आपले वडील पी.गोपालन, आई राधा आणि ३ भावंडांसोबत राहत होत्या. पी.गोपालन हे ब्रिटिश सरकारमध्ये मोठ्या हुद्दयावर अधिकारी होते. श्यामला यांनी १९५७ साली दिल्ली विद्यापीठा मधून विज्ञान विषयात पदवी संपादन केली आणि त्यांनी पुढील संशोधनाच्या शिक्षणासाठी अमेरिकेच्या बारक्ले विद्यापीठात प्रवेश घेतला. इथे त्यांची ओळख जमैकामध्ये अर्थशास्त्रात पदवी संपादन करून पुढील शिक्षणासाठी आलेल्या डॉनल्ड हॅरिस या कृष्णवर्णीय तरुण विद्यार्थ्याशी झाली. आपल्या अभ्यासक्रमात कृष्णवर्णीय लेखकांना डावललं जात आहे ह्या मुद्द्यावर कृष्णवर्णीय विद्यार्थ्यानी केलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली. मग मैत्री, प्रेम आणि लग्न झालं. पहिल्या मुलीचा जन्म झाला आणि तिचं नाव ठेवलं कुमाला देवी हॅरिस म्हणजेच कमला हॅरिस. दुसर्‍या मुलीचं नाव ठेवलं माया. मुलं आणि घर सांभाळत असतानाच श्यामला यांनी पीएचडी पूर्ण केली आणि त्यांनी कॅन्सरविषयी संशोधन सुरू केलं. कमला ७ वर्षांची असताना श्यामला आणि डॉनल्ड कामाच्या निमित्ताने वेगळं राहावं लागण्याच्या मुद्द्यावर विभक्तच झाले.

श्यामला यांनी कॅनडातल्या मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिकेची नोकरी केली. माया आणि कमला या दोन्ही बहिणी माँट्रियालच्या शाळेत शिकत होत्या. आईने मुलींवर भारतीय संस्कार केले त्यासोबतच त्या ऑकलंडचा कृष्णवर्णीयांचा इतिहासही सांगायच्या. आई वडिलांचे सर्व गुण कमलामध्ये उतरले.

कमलाने हॉवर्ड विद्यापीठात शिक्षण आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून कायद्याची पदवी घेतली. अल्मेडा काऊंटीच्या डिस्ट्रीक्ट अॅटर्नी कार्यालयापासून करिअरला सुरुवात केली. २००३ साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी झाल्या. कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती होत्या. २०१७ साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर युएस सिनेटर म्हणून झाली. अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांनी महत्त्वाच्या चर्चांदरम्यान त्यांच्या संभाषण कौशल्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आणि आज त्या एका चुरशीच्या निवडणुकीसाठी लढत आहेत जिकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे.

अमेरिकेत ४ कोटी माणसं आज गरीब किंवा अती गरीब या वर्गात मोडतात. त्यात काळे आणि गोरेही आहेत. सर्वच सुविधांपासून ते वंचीत आहेत. मालक गरीब आणि मध्यम वर्गीयांना कमी वेतन देतात, कंपनीतल्या वरिष्ठ गटातले लोक सगळे पैसे हाणतात. करांतून सुटका श्रीमंतांना मिळते. साधनांचं पुनर्वाटप करायला, विषमता दूर करण्यासाठी पुढाकार घ्यायला सरकार तयार नाही. गरीब असतील तर त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं, सरकार त्यांना मदत करणार नाही असा पवित्रा सरकार घेतंय. कमला या अशा सामान्य आणि गोरगरीबांना न्याय देण्यासाठी पदर खोचून सज्ज झाल्या आहेत. कमला हॅरिस या वंशाने भारतीय - आफ्रिकी असल्याने आपण वंचितांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलंय.
जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर सध्या अमेरिकेमध्ये वर्ण आणि वंशभेदाच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत. ब्लॅक लाईव्हज मॅटरच्या चळवळीने जोर धरलाय. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या हिंसेच्या विरोधातील आंदोलनात कमला यांनी पुढाकार घेतलाय. अमेरिकेतल्या पोलिसी प्रथा बदलण्याची गरज त्यांनी टॉक शोमध्ये व्यक्त केली. यंत्रणांमध्ये असणारा वर्णभेद मोडून काढणं गरजेचं असल्याचं त्या नेहमी म्हणतात.

२०१४ मध्ये कमला यांनी डग्लस एमहॉफ ह्या ज्यू आणि आधीच्या लग्नापसून २ मुली असलेल्या व्यक्तीशी लग्न केलं. कमला यांच्या घरात हिंदू, ख्रिस्ती आणि ज्यू असे तीनही धर्म आहेत. भारतीय वंशाच्या स्त्रीच्या ह्या यशस्वी वाटचालीचं आपण कौतुक केलं पाहिजे मग तिथे त्यांचं ट्रंप आणि पर्यायाने मोदी विरोधक असणं, हयुस्टनमध्ये झालेल्या भव्यदिव्य अशा ‘हाऊ डी मोदी’ ह्या कार्यक्रमाला त्यांचं न जाणं, काश्मीरातील लोकांवर घातलेले फोन आणि इंटरनेटवरचे निर्बंध आणि तिथल्या लोकांना ताब्यात घेण्याला ‘मानवी हक्कांचं उल्लंघन’ म्हणणं हे आडवं यायला नको.

कमला हॅरिस अमेरिकेच्या आर्थिक, आरोग्य आणि शिक्षणासंबंधी प्रश्नांकडे लक्ष वेधत आहेत. त्यांच्या ह्या भूमिकांकडे लक्ष देऊन अमेरिकनांनी त्यांना ह्या उच्च पदावर बसवलं आहे तर पुढील कोरोना पश्चातचं विश्व नक्कीच मानवतेचा जागर करणारं असेल.

70 

Share


G
Written by
Gayatri Baghel

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad