Bluepadगणेशोत्सव : सामाजिक सलोख्याचं प्रतीक
Bluepad

गणेशोत्सव : सामाजिक सलोख्याचं प्रतीक

B
Bhargavi Joshi
30th Nov, 2021

Share


गणानां त्वा गणपतिं हवामहे
कविं कवीनामुपमश्रवस्तमम्।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः
षृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ।।भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला ह्या मंत्रांच्या उच्चाराने गणेशाच्या निष्प्राण मूर्तीत चैतन्य निर्माण होतं, गणांचा अधिनायक गणपति बाप्पा त्या मूर्तीत विराजमान होतो आणि पुढील काही दिवस यजमानांचा पाहुणचार घेतो. गणपति. लहान थोरांचं जितकं लाडकं दैवत तितकंच घरातील एक सदस्य. आपल्या भाच्याने मामाच्या घरी यावं आणि अख्ख्या घरात आनंदीआनंद व्हावा असं हे विलक्षण दृश्य. गणपतीच्या विविध मुद्रा पाहताना जीव हरखून जातो पण सर्वात जास्त मन मोहून घेते ती बाल गणेशाची मूर्ति. अल्लड आणि खट्याळ भासणारी ही मूर्ति पाहून महर्षि व्यास महाभारत लिहीत असताना ह्याच चिमूरड्याने लेखनिकाची भूमिका बजावली असेल हे खरं वाटत नाही. पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजे आपल्या आईला म्हणजे पार्वतीलाच प्रदक्षिणा घालणारा हाच प्रज्ञावंत आणि चलाख मुलगा आहे म्हटल्यावर हात त्या बालकापुढे नतमस्तक झाल्याशिवाय रहात नाहीत. बाल गणेशाप्रमाणे सर्व देवतांच्या आधी पूजला जाणारा महागणपती ही तितकाच साजरा. गणपतीची ही विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात ती ह्या गणेशोत्सवात.

पूर्वीपासून घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरू करण्यामागे एक कारण होतं. ब्रिटीश राजवटीत लोकांनी एकत्र जमून काही देशद्रोही कारवाया करू नयेत म्हणून लोकांनी कोणत्याही कारणासाठी एकत्र न जमण्याचा नियम त्यांनी केला होता. त्याला मुस्लिम समाजाकडून विरोध झाला कारण या नियमामुळे शुक्रवारच्या सामुदायिक नमाजावर गदा येणार होती. त्यामुळे या नियमातून मुसलमानांच्या शुक्रवारच्या नमाजाला सूट मिळाली. हिंदूंनी एकत्र येऊन अशी प्रार्थना करण्याचा कोणताच प्रघात नव्हता. त्यामुळे हिंदूंचा एकमेकांशी असलेला संपर्क कमी झाला होता आणि त्यामुळे ब्रिटीशांच्या विरुद्ध काही योजना सुद्धा आखता येत नव्हत्या. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या मनात आलं की आपले असे सण असावेत ज्यात संपूर्ण हिंदू समाज एकत्र येईल. त्यावेळी गणेशोत्सव घराघरात साजरा केला जात असे आणि पेशवे गणपतिचं पूजन करीत असत. लोकमान्यांनी हाच सण सार्वजनिक रित्या साजरा करण्यासाठी निवडला. ब्रिटीशांनी त्याला आधी मान्यता दिली नाही पण मुस्लिमांच्या नमाजासाठी तुमच्या नियमात शिथिलता आणता मग हिंदूंसाठी का नाही असा युक्तिवाद टिळकांनी केला. याला ब्रिटीशांकडे उत्तर होतं ते म्हणजे हिंदू एकसंघ नाहीत, ते जातीपातीत विभागलेले आहेत. टिळकांनी हे अमान्य केलं, सरते शेवटी ब्रिटीशांना या उत्सवाला मान्यता द्यावी लागली.

पुण्यात गणेशोत्सव पहिल्यांदा १८९३ मध्ये सार्वजनिक रित्या साजरा झाला. पहिल्यांदा पेशव्यांचा गणपति सार्वजनिक मंडपात आणला गेला. ह्या उत्सवात सर्व जातीतील लोकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन टिळकांनी केलं. त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक अस्पृश्य समाजाचे लोक आपल्या आराध्य दैवताच्या उत्सवात सामील झाले. टिळकांनी सर्व अस्पृश्यांना गणपतीच्या मूर्तीला पदस्पर्श करून दर्शन घेण्यास सांगितलं. अशा प्रकारे ह्या गणांच्या नायकाचा हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला.

टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवामागे सामाजिक सलोखा राखणं हा देखील उद्देश होता. त्याप्रमाणे लोक एकत्र आल्यावर गाणी, पोवाडे, लोकनृत्य आणि थोरा मोठ्यांचे विचार ऐकण्यासाठी व्याख्यानमाला हे सर्व आयोजित होऊ लागले. आत्ता-आत्ता पर्यन्त हे सर्व मुंबईसह अनेक प्रांतात सुरू होतं. कोकणातील गणपति ह्यासाठी खास मानला जातो. ६४ कलांचा अधिपति असलेल्या गणपतीच्या घरोघरी होणार्‍या ह्या सोहळ्यात कलेला नुसतं उधाण आलेलं असतं. मोदक, करंज्या आणि लाडू यांनी आधीच मनं आणि पोटं प्रफुल्लित झालेली असतात. मग रात्रीच्या जागरणात प्रामुख्याने रंगते ती नृत्य आणि गायन कला. स्त्री पुरुष आपापल्या कला विविध पोशाख परिधान करून सादर करतात. कोकणात बायकांच्या फुगड्या ह्या खास लोकप्रिय आहेत. ह्यात वेगवेगळ्या फुगड्या खेळणं हे तर स्त्रियांचं कसब दाखवून देतं. याशिवाय गणपती आणि गौरीची गाणी हे खास आकर्षण असतं.

गणपति आल्यानंतर तिसर्‍या किंवा चौथ्या दिवशी गौरी सुद्धा येते. हा काळ शेतात आलेल्या धान्याच्या कापणीचा असतो. म्हणजेच आपल्या घरी आता सुबत्ता आली याचं प्रतीक म्हणून शेतातील धान्याच्या गवताला गौरी म्हणून बसवलं जातं. गौरीचं हे अन्नपूर्णा रूप असतं. तिची ओटी भरण्याचा खूप सुंदर उपक्रम “ओवसा देणं” म्हणून केला जातो. यात प्रामुख्याने नव्या नवरीचा ओवसा साग्रसंगीत दिला जातो. गौरी ही शंकराची म्हणजेच भिल्लाची पत्नी असल्यामुळे काही प्रांतात मांसाहार करण्याची त्यातही कोकणात सागुती वडे करण्याचा प्रघात आहे. २ दिवसाची माहेरवाशिण गौरी मग आपल्या निजधामाला जाते. गणपति दीड, पाच, सात किंवा दहा दिवस म्हणजेच यजमानाची इच्छा असेल तेवढे दिवस राहतो. पाच दिवसाचे गणपति साधारणपणे गौरी बरोबर विसर्जन केले जातात. कोकणात शाडूच्या मातीचेच गणपति बनत असल्याने आणि गौरी तर गवताच्या असल्याने ते नदी किंवा समुद्रात विसर्जित करूनही पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही.
यावर्षी कोरोनामुळे सरकारने जे नियम घालून दिले आहेत त्यांचं पूर्ण पालन करून आपण हा विघ्नहर्त्याचा उत्सव साजरा कराल ही अपेक्षा. बोला “गणपति बाप्पा मोरया”...

16 

Share


B
Written by
Bhargavi Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad