Bluepad | Bluepad
Bluepad
आसाम, बिहार पाण्याखाली तर माध्यमं रंगली टीआरपीच्या नादात....
R
Ramya Deshpande
21st Aug, 2020

Share


भिंत खाचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले

आठवते ही ओळ?... होय, कुसुमाग्रजांच्या “कणा” कवितेतली. दुष्काळ, मग तो ओला असू दे की सुका, आम्हा भारतीयांच्या पाचवीलाच पूजलेला. कुठे वर्षोनवर्षे एक टिप्पुस पडत नाही, जमीन कोरडी पडून, तहनेली होऊन मारून जाते तर कुठे ढगफूटी होते, मुसळधारा पडतात, जमिनीचं स्खलन होतं. कोरड्या जमिनीवर राहणार्‍या लोकांकडे खायला काहीच नसल्यामुळे ते आपले आधीच घरदार सोडून जगण्याच्या वाटेवर निघालेले असतात. पण संकटाच्या भोवर्‍यात ते लोक सापडतात जिथे पावसाचं थैमान सुरू असतं. तिथे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागतात, धरणं धोक्याची पातळी ओलांडतात, प्रशासनाला धरणाचे दरवाजे उघडावे लागतात आणि मग ते पाणी गावागावात शिरतं. शेतातील पिकाने हवेच्या लहरीवर आनंदाने डोलावं म्हणून धरणं बांधली गेली होती, त्याच धरणातील पाणी पिकांची नासधूस करायला राक्षसासारखं तोंड आ वासून धावत असतं. अशाच एका माणसाच्या घरात गंगेचं पाणी शिरलं, आणि बया सर्व काही स्वत: सोबत घेऊन गेली. बायको आणि तो पाण्याशी झगडणारा कारभारी तेवढे जगले. अशी मन हेलावून सोडणारी कविता कुसुमाग्रजांनी खूप खूप आधी लिहिली. पण आजही तिची आठवण यावी इतकी ती सार्वकालिक आहे.

आसाम, बिहार पाण्याखाली तर माध्यमं रंगली टीआरपीच्या नादात....

कुसुमाग्रजांची कविता सार्वकालिक आहे कारण त्यावेळी जी परिस्थिति होती ती अजूनही बदललेली नाही. पूरपरिस्थिती निर्माण होण्याआधी उपाय योजना करणं किंवा पुर आल्यानंतर तो नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडे ज्या यंत्रणा आहेत त्या अपुर्‍या आहेत. शासकीय अनास्था हा तर आमच्या डोक्यावरची अश्वत्थम्याची भाळभळती जखमच. अनेकदा पुरपरिस्थिति मुळे सरकारी यंत्रणांना मदतकार्य पोहोचवायला उशीर होतो आणि याला जबाबदार असतात ती प्रसार माध्यमं. पसार माध्यमांना किंवा बातम्यांच्या वाहिन्यांना आपला टीआरपी वाढवायचा असतो. या नादात ते समाजाला उपयुक्त अशा बातम्या कमी आणि नुसत्याच ग्लॅमर वाढवणार्‍या बातम्या देत सुटतात.

कालपासून आसाममध्ये ब्रम्हपुत्रा आणि इतर नद्यांनी राज्याच्या २६ जिल्ह्यात शिरकाव केला आहे. तर बिहारमध्ये नेपाळातून वाहणार्‍या लहान मोठ्या नद्या आणि बिहार मधल्या नद्यांनी इथल्या ८ जिल्ह्यांना पाण्याखाली आणलं आहे. ह्या दोन्ही राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिथल्या संपर्क यंत्रणा काम करीत नाहीयेत. घरं, झाडं, उभी पिकं वाहून गेली आहेत पण प्रसार माध्यमं त्याची सुध घेतील तर शपथ! एखाद दुसरं न्यूज चॅनल सोडलं तर बाकी चॅनल वर अमिताभ बच्चन यांच्या कोरोना लागणी बाबतच्या बातम्या आणि त्यांच्या स्वास्थ्यसाठी देशभर सुरू असलेल्या महामृत्युंजय जपाच्या बातम्या सुरू आहेत. याला काय म्हणायचं?

हे कमी होतं म्हणून आता राम जन्मभूमी वरून शरद पवारांनी केलेल्या “काही लोकांना वाटतं की मंदिर बनवल्याने कोरोना महामारीचा अंत होईल,” या वक्तव्यावरून गदारोळ आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उमा भारती तर चक्क पवारांना “रामद्रोही” म्हणून मोकळ्या झाल्या. या सगळ्या गोष्टी “नॉन-इश्यूज” मध्ये मोडतात हे प्रसार माध्यमांना कधी कळणार?
असो, तर आसाममध्ये २६३३ गावातील ७० लाख लोक ह्या पूरपरिस्थितीचा सामना करीत आहेत. इथल्या ब्रम्हपुत्रा, गांडक आणि कोसी नद्यांच्या काठावर वसलेल्या गोपालगंज, मांझागढ, खगडिया अशा गावातील घरं अक्षरश: वाहून गेली आहे. १.१४ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आल्याने पिकं वाहून जाऊन अतोनात नुकसान झालं आहे. किमान ४७,००० लोक शाळा आणि उंच इमारतीं सारख्या २८७ रिलीफ कॅम्पमध्ये आश्रयाला गेले आहे. एकूण १६७ पूल तुटले आहेत. पाण्यात अडकलेल्या काही लोकांना आणि गुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न आज म्हणजे दोन दिवसांनी पोहोचलेली एनडीआरएफची टीम करीत आहे. आतापर्यन्त ८४ लोक पुरामुळे आणि २६ लोक भुस्खलनाने मृत्यूमुखी पडले आहेत तर अनेक जण बेपत्ता आहेत. कांजीरंगा पार्कमध्ये १०८ गुरं दगावली आहेत तर १३६ गुरांना वाचवण्यात यश आलं आहे. आता लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील केला जात आहे आणि त्यासाठी लोकांची त्रेधातिरपीट उडत आहे.

बिहारची अवस्था काही वेगळी नाही. बिहारातून वाहणारी कोसी, बागमती, कमला बलान सारख्या नद्या आणि नेपाळातून येणारी तिलयुगा नदीने बिहारला समुद्राचं रूप दिलं आहे. दरवर्षी बिहारची हीच स्थिति असताना प्रशासन पावसाळ्याच्या आधी काहीच उपाययोजना करीत नाही. बिहारमध्ये पावसाळ्यानंतर काहीच महिन्यात चार चार महीने पाण्याची वानवा असते. लोकांना लांबलांबून पाणी आणावं लागतं. काही दिवसांच्या अंतराने पाण्याचे टँकर गावात येतात. असं असतानाही प्रशासन पावसाचं पाणी साठवून ठेवण्याचे किंवा जमिनीत मुरवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करीत नाही. प्रसार माध्यमं ह्या सगळ्यावर मूग गिळून असतात. बिहारमधल्या लोकांना एकीकडे अस्मानी संकट आणि दुसरीकडे सरकारी अनास्थेला सामोरं जावं लागतं. मुंबईत पाणी भरल्यावर सर्वात श्रीमंत असलेल्या या महानगर पालिकेवर तोंडसुख घेताना देशात आणखीही नगरपालिका आणि ग्रामपंचायती आहेत याचा बहुतेक विसरच त्यांना पडतो. त्यांनी आता तरी आपली जबाबदारी ओळखून लोकांच्या जगण्या मरण्याशी संबंधित बातम्यांना प्राधान्य द्यावं हीच अपेक्षा.

16 

Share


R
Written by
Ramya Deshpande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad