Bluepad | Bluepad
Bluepad
खंबीर रहा, संधीचं सोनं करा...
A
Ankita Desai
19th Aug, 2020

Share


खंबीर रहा, संधीचं सोनं करा...

यश म्हणजे नक्की काय असतं? त्याचं मोजमाप काय? यश म्हणजे इतिकर्तव्यता का?
खरं सांगायचं तर यशाची व्याख्या कोणालाही करता आलेली नाही. कारण प्रत्येकासाठी यश हेच मुळात वेगळं असतं. पण एक छोटी व्याख्या करता येईल. ते म्हणजे यश म्हणजे आनंद आणि समाधान. आपण आपल्या जीवनात रोज नव्या आव्हानांना तोंड देत असतो. ती एक एक आव्हानं पेलली की आपल्याला त्यांचं समाधान मिळतं आणि चेहर्‍यावर हसू उमलतं. शहरतल्या आणि ग्रामीण भागातील लोकांची दैनंदिन आव्हानं वेगळी असतील. पण सकाळी उठून आपला दिवस सुरू करून तो संपून रात्री पाठ टेकेपर्यन्त लहान, थोर, अगदी एक दिवसाच्या बाळापासून ते नव्वदीच्या आजीपर्यंत सर्वांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. ही आव्हानं पेलून ती निभावल्या नंतरचा आनंद एवरेस्ट सर केल्यासारखा असतो. हा आनंद कोणत्याही मापात मोजता येणारा नसतो.

ज्याला आपण “जगण्याची आव्हानं” म्हणतो ती प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक फरकाने असतातच. त्यामुळे त्याचं कोणाला “कवतीक” नसतं; पण तेच जर आपण मोठे लक्ष्य ठेवले आणि त्याप्रमाणे परिश्रम केले तर ते यश हे केवळ आपल्याच नाही तर आपल्या आपल्यावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या मनात आनंदाच्या लहरी उठवतं. शाळा, महाविद्यालयीन. उच्च शिक्षण, आणखी काही वेगळं शिक्षण ही तर आयुष्याला एका रांगेत आणणारी आव्हानं आहेत, संपूर्ण आयुष्य नाही. ती यशस्वीरित्या पूर्ण केलेल्यांना पुढील आयुष्य जगताना फार तोशीस पडत नाही इतकंच. जे त्यात यशस्वी होत नाहीत ते सुद्धा आयुष्यात यशस्वी होतातच. कारण आयुष्य जे पाण्यासारखं वाहातं असतं, ते कशानेही थांबत नाही.

आपल्या समाजाने चांगलं आणि वाईट याचे काही ठोकताळे तयार केले आहेत. त्या त्या ठोकताळ्यानुसार यश आणि अपयश अशी विभागणी केली जाते. त्यामुळे जगण्याचे नैसर्गिक संकेत आपण विसरून गेलो आहोत. ज्याला निसर्गाने जसं जन्माला घातलं आहे त्याला त्याच्या कुवतीप्रमाणे तासून तयार केलं की पुरेसं असतं. त्याचा मार्ग तो स्वत: शोधून काढतोच. यशाच्या ज्या कल्पना आपल्या समाजात रूढ आहेत त्या सर्व आकडेवारी अवलंबून आहेत. दहावीला, बारावीला किती मार्क, टक्के पडले, कोणती ग्रेड मिळाली, कितवा नंबर आला? कोणता विषय राहिला? हे सर्व विद्यार्थी दशेतील मोजमापं तर; किती कमावतो, किती नफा होतो, किती टॅक्स भरतो? किती देशात भ्रमंती झाली आहे? कोणत्या देशात वास्तव्यास आहे? लक्झरीवर किती पैसे खर्च करतो / उडवतो? गाड्या किती आहेत? कोणती महागडी व्यसनं करतो ही सर्व कमवत्या वयातील मोजमापं असतात. मुख्य म्हणजे ह्या पंचायती त्यांना असतात जे यशस्वी माणूस किती पाण्यात आहे ते पाहण्याचा प्रयत्न करत असतात. पण खर्‍या यशवंतला त्याची फिकीर नसते. कारण त्याने अनेक चढ उतार आणि अपयशांचे डोंगर पार करून यश गाठलेलं असतं. त्याला माहीत असतं की जसं अपयश क्षणभंगुर होतं तसंच यश सुद्धा चिरकालिक नाही. तो ह्या यशापयशाच्या गुंत्यात अडकत नाही. तो आपलं काम करत राहतो.

असे अनेक लोक आहेत ज्यांना करिअरच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. त्यात बिल गेट्स पासून जे के रोलिंग्स, ऑप्रा विन्फ्रे, अमिताभ बच्चनपासून क्वीक हिल कंपनीचे मालक कैलाश काटकरपर्यन्त अनेकांनी आपल्या अपयशाला मागे टाकून यशाचा मार्ग प्रशस्त केला आहे. या सर्वांविषयी आपल्याला माहीत असताना सुद्धा जराशा अपयशाने खचून आत्महत्येसारखी पाऊले काही लोक उचलतात. शाळा, महाविद्यालयातील अपयशाने तर मुलं लवकर खचतात.

मुलांनो, ही परीक्षा काही शेवटची परीक्षा नाही. आयुष्यात पेपर वर सोडवू न शकणारे अनेक प्रश्न सोडावयाचे असतात आणि त्यासाठी पुस्तकी अभ्यास नाही तर जीवनात येतील त्या परीक्षा द्यायच्या असतात. ती परीक्षा १०० गुणांची नसते तर त्यासाठी एकच गुण पुरेसा असतो आणि तो असतो खंबीरता.

एक गोष्ट लक्षात घ्या. आपण दरवर्षी दहावी बारावीच्या मेरीट लिस्टमध्ये आलेल्या मुलांची नावं पाहतो. एखाद्याला करिअर करायला १० वर्षं लागतात असं गृहीत धरलं तर १० वर्षानी त्या लिस्टमधल्या किती विद्यार्थ्याची नावं तुम्ही यशस्वी कारकीर्द घडवलेल्या व्यक्तींच्या लिस्टमध्ये पाहता? बिल गेट्स एक किस्सा सांगतात. “मी इंजिनियरिंगच्या परीक्षेत फेल झालो. पण माझा मित्र चांगल्या गुणांनी पास झाला. मी मायक्रोसोफ्ट ही कंपनी सुरू केली आणि माझा मित्र माझ्याकडे इंजीनीयर म्हणून नोकरी करतो आहे.” याचा अर्थ हा नाही की तुम्ही परीक्षा पास झालात तर कोणातरी फेल झालेल्या माणसाच्या हाताखाली नोकरीच करणार. याचा अर्थ हा आहे की प्रत्येकाकडे काही उपजत गुण असतात आणि त्या गुणांचा उपयोग करून प्रत्येकाला आपल्या आयुष्यात समाधानी आणि आनंदी व्हायचं असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणण्यापेक्षा अपयश हे यशाचं एक प्रमुख अंग आहे असं म्हणूया. काहींना अपयशांनंतर नेमकी दिशा ठरवता येत नाही. तेंव्हा काही दिवस काहीच करू नये. अगदी शांत राहावं. तुम्हाला तुमची दिशाच शोधून काढेल. अनेक मोठ्या व्यक्तींना एकदा मिळालेल्या संधीनेच त्यांच्या करिअरची दिशा दिली आहे, मोठं नाव मोठं यश दिलं आहे. त्यामुळे फक्त एक करा, जी संधी मिळेल तिच्यामध्ये शक्य तेवढे मनापासून प्रयत्न करा. तिचं सोनं करा. हे लहान यश मोठ्या यशाची ग्वाही ठरेल.

41 

Share


A
Written by
Ankita Desai

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad