Bluepadजरा विसावा या वळणावर...
Bluepad

जरा विसावा या वळणावर...

B
Bhakti Nikam
17th Aug, 2020

Shareमाही निवृत्त झाला, हेलिकॉप्टर शॉट, 7 नंबरची निळी जर्सी घातलेला कॅप्टन कूल आता दिसणार नाही... महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या वार्तेने अवघे क्रिकेट प्रेमी हळहळले. पण माहीच्याच शब्दात सांगायचं झालं तर १५ ऑगस्ट २०२० च्या संध्याकाळच्या ७ वाजून २९ मिंनिटांनंतर माहीची बॅट आंतरराष्ट्रीय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तळपणार नाही, त्याचे ग्लोव्ज विकेटच्यामागे बॉलरला उकसवणार नाहीत, त्याचे पॅड्स धावांना गती देणार नाहीत. ह्या सर्व वस्तूनिशी माही आता दिसेल तो आयपीएल मध्येच. धोनीच्या चाहत्यांना तेवढाच दिलासा.
आयुष्य थांबत नाही, ते प्रवाहीत होत राहतं. फक्त त्यात विश्रांतीच्या काही घटका येतात. ह्या घटका पेल्यात थोडं वादळ निर्माण करतात, आयुष्य पुन्हा प्रवाहीत झालं की ते वादळ पेल्याच्या तळाशी जाऊन गाढ निद्रेत शांत निवांत होतं. माहीच्या आधी सुद्धा क्रिकेटला केवळ आंतरराष्ट्रीय दर्जाच नाही तर “भारतीयांच्या धर्मा”चं स्थान बहाल करणारे दिग्गज निवृत्त झाले. काहींनी आयुष्यभर क्रिकेटची सेवा केली आणि काहींनी कमी सामने खेळून ही लोकांच्या मनावर राज्य गाजवलं. माहीह्या तार्‍या सोबत त्याचा चंद्र सुरेश रैना याने देखील निवृत्ती जाहीर केली. माहीने इंस्टाग्राम वर आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यावर केवळ अर्ध्या तासात म्हणजे रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी “मी ही तुझ्या सोबत ह्या नव्या प्रवासाची सुरुवात करतो आहे,” असं म्हणत सुरेश रैनाने ही घोषणा केली.

सुरेश रैनाला आपण ‘रैना’ म्हणूनच संबोधतो. हा मुलगा अवघा ३३ वर्षांचा आहे. पण माही, विराट, रोहित शर्मा यांच्या सारख्या हॅलोजन्स पुढे ह्या दिव्याचा प्रकाश प्रखर असूनही तो सर्व दूर पसरला नाही. इंग्रजीत ज्याला “अन्डररेटेड” म्हणतात तसा तो राहिला. पण आपल्याला म्हणावी तशी ओळख मिळाली नाही म्हणून तळपणं सोडून देणारे हे दिवे नसतात. केवळ माहीच्याच नाही तर युवराज सिंग, सचिन तेंडुलकर यांच्या सोबत रैनाने अनेक सामने झंझावाती करून टाकले. पण त्यात कौतुक केवळ ह्या पहिल्या फळीतील क्रिकेटर्सचं झालं. पण त्यांना सुद्धा रैनाच्या खेळावर विश्वास होता म्हणून ते पिचवर कमाल दाखवू शकले. राहुल द्रविडला जसं “मिस्टर डिपेंडेबल” किंवा “द वॉल” म्हटलं जायचं तसंच रैनाला “भरोसेमंद” म्हटलं जातं.

धोनी असा कप्तान आहे ज्याने तीनही फॉरमॅट म्हणजेच वन-डे, टी-20 आणि पाच दिवासीय टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली आहे तर सुरेश रैना असा एकमेव भारतीय क्रिकेटर आहे ज्याने ह्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहेत. धोनीच्या “हेलिकॉप्टर शॉट” प्रमाणे रैनाचा डावा गुडघा जमिनीला टेकवून बॉलचा संपूर्ण भार बॅटवर घेऊन फटकावण्याचा एक खास शॉट आहे. अर्थात तो जास्त प्रसिद्ध झाला नाही त्यामुळे त्याला नावही नाही.

२००४ मध्ये माहीचा आणि त्या नंतर एक वर्षाने म्हणजे २००५ साली रैनाचा प्रवेश राष्ट्रीय टीममध्ये झाला. दोघांनी आपले पहिले एक दिवासीय सामने राहुल द्रविडच्या नेतृत्वात खेळले. त्यानंतर माहीचा काफिला तर चल पडा, पण चांगली कामगिरी करून सुद्धा रैनाला आपली बॅट तळपवण्याची थोडी वाट पहावी लागली. यथावकाश ती संधी दोघांनाही मिळाली आणि त्या दोघांनीही मिळालेल्या प्रत्येक संधीच सोनं करण्याचा प्रयत्न केला. खेळात जिंकणं आणि हरणं सुरू असतं. कोणी एक हरतो म्हणून कोणी तरी जिंकतो; पण फॅन्सना हे मंजूर नसतं. क्रिकेट धर्म असलेल्या देशात त्या त्या क्रिकेटपटूला सर्वोत्तम न खेळल्या बद्दल शाब्दिक आणि घरादाराला हानी पोहोचवणार्‍या हल्ल्यांना सामोरं जावं लागतंच. धोनीने असे प्रसंग अनुभवले. म्हणूनच त्याने काल इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या विडिओत आपला आगीत भस्मसात होत असलेला फोटो ही टाकला आहे. ज्यांने कोणी तो प्रकार केला असेल त्या तथाकथित फॅनला ते बघून थोडी लाज वाटली तरी पुरे. क्रिकेट हा खेळ आहे आणि त्याला तितक्याच खिलाडूपणे घ्या असं वारंवार सांगूनही काही समाजकंटक असले प्रकार करतात. पण धोनी सारख्या शांतीप्रिय माणसाने हे हल्ले फॅन्सचं आपल्या वरील प्रेम म्हणून पचवले. सचिनने काय कमी शाब्दिक हल्ले पचवले होते? लोक तुम्हाला तोडून बोलतात हे तुमच्या मोठे असण्याचं लक्षण असेलही पण मन त्या मोठ्या माणसाला सुद्धा असतं, ते दुखतं, रडतं. पण ते पुन्हा उभारी घेतं आणि जगाला आपलं महत्व दाखवून देतं. आज माहीच्या अशा निवृत्तीने त्याच्या यशामागच्या ह्या कडू आठवणी सुद्धा जाग्या झाल्यात.

धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने २००७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. २०१० आणि २०१६ साली त्याने आशिया कप जिंकला. २०११ साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला तर २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली. धोनीच्या या कर्तृत्वामुळेच त्याला पद्मभूषण, पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. त्याला आर्मीत लेफ्टनंट कर्नल हे पद बहाल करण्यात आलं. २०११ च्या विश्वचषकात सुरेश रैनाने काही महत्वपूर्ण खेळी केल्या होत्या. तत्कालीन कोच गॅरी कर्टसन यांनी देखील रैनाच्या खेळींमुळे हा विजय शक्य झाल्याचं म्हटलं होतं. असे हे माही आणि रैना आज फर्स्ट क्लास क्रिकेट मधून निवृत्त झाले आहेत. त्यांचे खेळ एका विसाव्या नंतर आयपीएलमध्ये दिसतीलच. त्यासाठी आणि त्यांच्या नव्या इंनिंगसाठी त्यांना शुभेच्छा.

41 

Share


B
Written by
Bhakti Nikam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad