Bluepadघननिळ्या आठवणी, कुंद कुंद साठवणी...
Bluepad

घननिळ्या आठवणी, कुंद कुंद साठवणी...

S
Siddharth Deshmukh
16th Aug, 2020

Share


पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दुःखाच्या मंद सूराने


ग्रेसच्या ओळी आणि निमूट मी... मृगाच्या धारा, चिंब झाडे, ओले रस्ते आणि निमूट मी... पखांची फडफड, फवारणारे पाणी, पांढर्‍या तुषारांची चादर आणि निमूट मी... खिडक्यांच्या गजातून सुद्धा बाहेर पडू पाहणारी वेल, तरारलेली तुळस आणि निमूट मी... बरसणार्‍या धारा, गरजणारे ढग, कुंद आसमंत आणि निमूट मी...

.....तसा मुंबईतील पाऊस जितका सुखावह तितकाच चीड आणणारा. पण ती चीड पावसाची नाही तर रस्त्यांवरच्या खड्ड्यांची आणि तुंबलेल्या पाण्याची असायची. पण आमचे मुंबईकर त्यात सुद्धा मजा आणायचे. तुंबलेल्या पाण्यात वॉटर फूटबॉल, हँडबॉल खेळायचे, मुलांच्या होड्या चालायच्या. आणि खड्ड्यांचं म्हणाल तर रोज एका नव्या खड्ड्यासोबतचा सेल्फी व्हाट्सअॅप स्टेटस वर तर ठेवायचाच पण ज्या ज्या सोशल मीडियावर आपलं अस्तित्व आहे तिथे तिथे आपलं ते मास्टर पीस पोस्ट करायचं. आणि मग बीएमसीच्या भोंगळ कारभारावर मित्र मैत्रिणींनी तोंडसुख घेतलं की आपल्या जन्माचं सार्थक व्हायचं. पण ह्या वर्षी कोरोनाने ते सर्वच खड्ड्यात घातलं आहे. ना उशिरा येणारी ट्रेन ना उसळत आणि वाढत जाणारी गर्दी. ना गर्दीत छत्री सांभाळत ट्रेनमध्ये घुसण्याची गडबड ना तिथली चिंब गर्दी. ना ट्रेनच्या पाईपातून पडणारं आणि पावसापेक्षा तेच अधिक भिजवणारं पाणी ना “खिडकी लगाव ना”चे आदेश. ना प्रवाशांची भांडणं ना “पैली बार आया है कया?” असे खोचक प्रश्न.

हो खरं आहे, इथे येणारा प्रत्येक नवा माणूस एक दोन दिवसातच सरावून जातो. त्यामुळे तो लगेच जुना होतो. पक्का मुंबईकर होतो. तो मुंबईला आपलं करतो की मुंबईच त्याला आपल्यात मातीने पाण्याला झिरपून घ्यावं तशी झिरपून घेते हे कळायचं नाही. त्यामुळे “मैं पहली बार नहीं आई हूँ” हे उत्तर कोणी न विचारताही कोणाच्याही तोंडावर मारण्यासाठी तयार असायचं. आणि असं उत्तर देणार्‍याना आमचं उत्तर असायचं, “तो फिर काय को ऐसा हटेले जैसा करताय?” ही जुगलबंदी पार स्टेशन येईपर्यंत चालायची. मुंबईच्या ट्रेन संस्कृतीचं हे भांडण म्हणजे अभेद्य अंग. पण यंदा हे काहीच यंदा नाही. त्यामुळे बंद पाडलेल्या इंडिकेटरला शिव्या घालणंही नाही आणि ते दर दोन मिनिटांनी “प्रवाशांना होणार्‍या गैरसोयी बद्दल आम्ही दिलगीर आहोत,”चा डोक्यात तिडिक आणणारा गोड आवाजही नाही. गैरसोय होत होती, पण तीच ट्रेनच तर जीवन वाहिनी होती, रक्त वाहिनी होती. आता ती शाळेत शिक्षा झालेल्या मुलासारखी मोजक्या लोकांना घेऊन जात येत असते. ती हे सर्व मिस करत असेल का?
इतर वेळी इतकी भांडणं करणारे आम्ही श्रावणात मात्र एकमेकांच्या डब्यातील वेगवेगळे पदार्थ खाताना सगळं काही विसरून जायचो. काही लोक तर एक डबा ट्रेनसाठी आणि एक ऑफिससाठी आणायचे. मग कधी मोदक, राजगिर्‍याचे लाडू, उपवासाची चकली, साबुदाण्याची खिचडी, वडे, इडली, कटलेट्स, श्रीखंड पुरी, पुराण पोळी असा एकत्र बेत असायचा. श्रावणातले उपवास सगळेच करत नसत पण उपवासाचे पदार्थ तेच सगळ्यात जास्त खात. मुस्लिम मित्र तर जास्तच ताव मारीत. आणि खाऊन झाल्यावर “दुवा में याद रखुंगा,” म्हणायचे.

श्रावणसरीनी मुंबईतील हिरवाईसुद्धा फुलून जात असते. बाजार भरून भाज्या, फळं असायची. स्वस्त आणि मस्त. बाजार फिरायलाच तास तास लागायचे. मग खमंग मका तोही शेगडीवर भाजलेला आणि लिंबू, मीठ आणि चाट मसाला मारलेला. घरात मेथीचे लाडू बनवून ठेवायचे. रोज एक खाणे हा नियम पाळायचा. पावसाळा असा आनंद आणि राग म्हणजेच अनुराग घेऊनच यायचा. आता हे लिहिताना मोहोञ्जोदडो हडप्पा विषयी लिहितोय की काय असं वाटतंय. पण त्या घननिळ्या आठवणी म्हणजे कुंद कुंद साठवणी आहेत.

आता जे पदार्थ बाहेर खायचो ते घरात बनवून खातोय. पण पावसात जरा आरोग्याच्या कल्पना बाजूला ठेऊन भैय्याकडची पाणी पुरी जाम आठवते. “भैय्या”... पुन्हा दिसेल का? येईल का तो परत? आता ह्या पाणीपुरीने डोळ्यात पाणी का आणलं बरं? ते दुसरं स्थलांतर आठवलं तरी काटा येतो. कुठे असतील आपले भाजीवले, पाणीपुरीवाले, रिक्षावाले, सरबतवाले भैय्ये? सुखरूपच असतील.

चहा केलेला बरा. आलं घालून. पुन्हा ऑफिसकडचा कटींग मिळेल ह्या आशेने आताचा घोट गिळायला हवा. पुन्हा ग्रेस आठवले...
संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती
लाटांचा आज पहारा ।।

32 

Share


S
Written by
Siddharth Deshmukh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad