Bluepad | Bluepad
Bluepad
स्वातंत्र्य चिरायू हो
Anjela Pawar
Anjela Pawar
15th Aug, 2020

Shareस्वातंत्र्य चिरायू हो

भारताच्या स्वातंत्र्याला ७३ वर्षे झाली. ब्रिटीशांच्याही आधी शतकानूशतके अनेक आक्रमकांची राज्ये पाहिलेली भारतभूमी १५ ऑगस्ट १९४७ ह्या दिवशी स्वतंत्र झाली. १४ ऑगस्ट १९४७ ची रात्र सरत असताना १५ च्या पहाटे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी पहिलं ध्वजारोहण केलं आणि आपण आजपासून स्वतंत्र आहोत अशी आनंदवार्ता सर्व देशाला दिली आणि देशात स्वातंत्र्याचे नगारे घुमू लागले. यापुढे जे काही होईल त्याला पुर्णपणे आपण जबाबदार असू त्यामुळे आपण चांगलं तेच करणार हे सर्वांनी अगदी मनोमन ठरवलं आणि त्या दिशेने कामाला सुद्धा लागले.

त्याची परिणीती म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात असलेला भारत आज अजिबात तसा राहिला नाही. ७३ वर्षांचा एक मोठा पल्ला देशाने अनेक कडू गोड घटनांचे साक्षी होत, सामाजिक राजकीय स्थित्यंतरं पहात, अनुभवत पार केला आहे. पण हा टप्पा नुसताच पार केला. आपल्या देशात खरंच सर्व स्तरात स्वातंत्र्य मुरलं का? स्वातंत्र्याचे फायदे सर्वांना मिळाले का? याचं उत्तर अर्थात नाही असंच येईल. आजचा हा ७३ वा स्वातंत्र्य दिन जितका जल्लोषाचा तितकाच तो सिंहावलोकन किंवा थोडं चिंतन करण्याचा आहे. आपण आयुष्यभर काय कमावलं आणि काय गमावलं याचा लेखाजोखा मांडण्याचा आहे. नेहमीच आपण आपल्या वैभवशाली इतिहास, संस्कृती आणि सुजलाम सुफलाम असल्याच्या अभिमानात रत असतो. पण आपण नवीन कोणती संस्कृती निर्माण केली का किंवा जे काही निर्माण केलं ते पुढच्या पिढीला अभिमान वाटावं असं आहे का याचा विचारही करण्याचा आजचा दिवस आहे. असं म्हणतात की सत्तरी पार केलेल्या माणसाला शहाणपण आलेलं असतं पण त्याच सोबत त्याला स्मृतिभ्रंश आणि निद्रानाश अशा वयपरत्वे येणार्‍या व्याधी जडलेल्या असतात. आपल्या देशाचं सध्या तसंच काहीतरी बिनसल्यासारखं झालं आहे.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची पायाभरणी ही एका अतुलनीय अशा संविधानाने झाली होती. २९ नोव्हेंबर १९४९ रोजी हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन राष्ट्रपति डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकड़े सुपुर्द केलं आणि त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाली. ह्या संविधानात आपल्याला नेमके कोणते हक्क आहेत हे सर्व लिहिलेलं आहे. पण आपण इतके करंटे आहोत की आपल्या घरात रामायण, महाभारत, कुराण, बायबल आणि आपापल्या धर्माचे सर्व साहित्य असतं पण संविधान जे तुम्हाला जखडून न ठेवता विविध स्वातंत्र्य, बंधुभाव, शिक्षण, आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्याविषयीची नियमावली सांगतं तेच आपल्या घरात नसतं. आपला देश लोकशाही आहे, स्वतंत्र आहे म्हणजे सगळे स्वातंत्र्याचे अधिकार आपल्यालाच आहेत आणि आपल्यापेक्षा कनिष्ठ हा पायदळी तुडवण्याच्याच लायकीचा असतो असा पूर्वापार समज बंधुभाव सांगणार्‍या संविधानाने दूर केला पण धर्मावर आधारित राजकारण आणि समाजकारण करणार्‍यांनी ते घराघरात पोहोचूच दिलं नाही. आणि लोकांना ही ते आपण होऊन वाचण्याची इच्छा झाली नाही.

गायीला मारलं म्हणून माणसांना ठेचून मारणारे, फोन वरून बायकोला तलाक देणारे, ईश्वराच्या नावावर गरीब जनतेला नाडणारे लोक या देशात निर्माण झाले यामागे अज्ञान हे एकच कारण आहे. स्त्री म्हटली की ती केवळ उपभोग्य वस्तू, गरीब माणूस म्हणजे मेहनत मजदूरी केल्यानंतरही उपाशी किंवा गेला बाजार अर्धपोटी झोपणारा, झोपडीत राहणारा म्हणजे चांगलं आयुष्य जगण्याची लायकी नसणारा, कनिष्ठ जातीतला म्हणजे पायात बूट घालण्यास, घोड्यावरून लग्नाची वरात नेण्यास आणि महागड्या किंवा परदेशातील शाळा, कॉलेजात चांगलं शिक्षण घेण्यास, सार्वजनिक ठिकाणी रसपान करण्यास मनाई असलेला एक कम अस्सल माणूस अशी धारणा आज २०२०च्या काळात सुद्धा तशीच टिकून आहे.
वर उल्लेखिलेले मुद्दे तर शतकांपासून चालत आले आहेत. त्याच्या जोडीला देश विदेशातील लोकांचं दुसर्‍याची संपत्ति हडप करण्याचं तंत्र आता आपल्या देशातील लोकांनीही अवगत केलं आहे. संगणक आणि मोबाइलच्या माध्यमातून घुसखोरी करून एखाद्याची मोठ्या कष्टाने कमावलेली संपत्ति चोरणं, लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकावणं हे प्रकार वाढलेत. एखाद्या मुली सोबत काही वाईट घडलं की समाजातील लोक संस्कारांच्या नावावर तिला जीव नकोसा करून टाकतात. पोलीस यंत्रणा सुद्धा अशा समाज, रूढी परंपरा यांच्या बाबतीत अनेकदा कुचकामी ठरते.

लॉकडाउनच्या काळात जे लोक पायी घरी परतले मुळात ते सर्व गरीब लोक शहरांकडे का आले होते? कारण त्यांच्या गावात, राज्यात त्यांना उपजीविकेचं, शिक्षणाचं, आरोग्याचं, जगण्याचं साधनच नाहीये. ७३ वर्षांची ही आपली मिळकत आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या पहाटे केलेले संकल्प हा देश स्मृतिभ्रंशामुळे विसरला आहे. आणि भ्रष्टाचार, लुबाडणूक, राजकीय अनागोंदी यामुळे त्याला निद्रनाश जडला आहे.

पं. नेहरूंनी १५ ऑगस्ट १९४७ ह्या दिवसाला “ट्रीस्ट विद डेस्टीनी’ असं संबोधन केलं होतं. जेंव्हा देशाच्या प्रवासाची सुरुवातच नियतीने ठरवून दिलेल्या दिवसाने झाली तिथे संविधान, संत-महात्मे, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याला किंमत काय असेल हे तुम्हीच ठरवा. स्वातंत्र्य चिरायू हो. आपणा सर्वांना आणि सर्व देशवासीयांना वैचारिक स्वातंत्र्य देणार्‍या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेछा.

20 

Share


Anjela Pawar
Written by
Anjela Pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad