Bluepadआत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल....
Bluepad

आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल....

Vinisha Dhamankar!
Vinisha Dhamankar!
29th Nov, 2021

Share


स्वावलंबन हा स्वातंत्र्याचा आत्मा आहे, असं कोणी म्हटलं ते मला माहीत नाही पण ते एक सार्वत्रिक सत्य आहे. स्वावलंबन ही भावना भारताला नवी नाही. ब्रिटीशांच्या राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं याचा गाभा स्वावलंबन हेच होतं. म. गांधींचा चरखा हा त्या स्वावलंबांनाचाच प्रतीक होता. आपला देश शेतीप्रधान तर होताच, बाकी आवश्यक वस्तू सुद्धा आपल्याकडे बनत होत्याच. त्यातूनच बारा बलुतेदार ही पद्धत सुरू झाली होती, हे आपण जाणतोच. ह्या बारा बलुतेदारीने घेतलेलं जातीयतेचं अमानवी रूप हेच त्या पद्धतीला गाडायला कारण ठरलं आणि ते स्वावलंबी पण जातीयतेचा आखाडा बनलेलं खेडं हळू हळू लोप पावू लागलं.गावाला स्वावलंबी बनवणारी कामे बंद होत गेली आणि त्याची जागा मोठमोठ्या उद्योगपतींनी घेतली. चांभार जावून बाटा आणि अॅक्शन आले. आज स्वातंत्र्याला ७२ वर्षे पूर्ण झाल्यावर देश एका वेगळ्याच कैचीत अडकला आहे. एकीकडे खुलं आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळे कॉर्पोरेट आणि सेमी कॉर्पोरेट कंपन्या भारतात आल्या, शासकीय प्रकल्पांमध्ये त्यांना प्रवेश मिळाला, वीज कंपन्या, अणुशक्ती, मेट्रो, मोबाइल कंपन्या अशा परदेशी कंपन्यांनी आपलं बस्तान बसवलं. तर दुसरीकडे लोकांच्या मूलभूत गरजा भागत नव्हत्या. परदेशी कंपन्यांनी अनावश्यक वस्तूंना जीवनावश्यक वस्तू करून टाकलं. त्यात संगणक आणि मोबाइल ह्या वस्तू म्हणजे शरीराचे अवयव असल्यासारखे झाले. त्यातून चीन सारख्या देशांनी घुसखोरी केली. त्या आर्थिक मुजोरी वर तो आमच्याच देशाच्या सैनिकांवर हल्ले करू लागला.

कोरोना मुळे नव्या अर्थ नीतीचा विचार होऊ लागला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्री मंडळाने ही संधी ताडली आणि १२ जून २०२० रोजी “आत्मनिर्भर भारत”ची हाक दिली. त्या हाकेने १३० कोटी लोकांचे बाहू स्फुरण पावल्या.

मात्र मोदी यांची ही खेळी चीनला रुचली नाही. आमच्याशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही अशी मुजोरी त्यांना आली होती. इकडे सोनम वांगचूक यांनी देशातील जनतेला आपल्या फोन मधून सर्व चीनी अॅप्स काढून टाकण्याचं आणि एक दिवस चीनी फोन सुद्धा त्यागण्याचं आव्हान केलं. १५ जून २०२० रोजी गलवान खोर्‍यात अशा मुजोरीला २० भारतीय जवान बळी पडले तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ जून २०२० रोजी ५९ चीनी अॅप्स वर बंदी आणली तेंव्हा चीनचे धाबे दणाणले.

पंतप्रधान त्यांच्या संबोधनात म्हणाले, “कोरोना संकट सुरु झाले तेव्हा भारतात पीपीई अर्थात वैयक्तिक संरक्षण उपकरणांची वानवा होती मात्र आजच्या घडीला भारतात दररोज २ लाख पीपीई किट आणि २ लाख एन-९५ मास्कची निर्मिती होत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भारताची संस्कृती असून भारताच्या कामगिरीचा प्रभाव सध्या संपूर्ण जगावर पडत आहे. क्षयरोग, कुपोषण, पोलिओ यावर विशेष अभियानाद्वारे भारताने केलेल्या प्रयत्नांचा प्रभाव आज जगावर पडला आहे.” आत्मनिर्भर भारतासाठी भारताची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, यंत्रणा, भौगोलिक स्थिती, मागणी -पुरवठा साखळी ही पंचसूत्री मजबूत करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. मागणी वाढविण्याबरोबरच पुरवठा साखळीतील सर्व भागधारकांना मजबूत करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारने लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉ या चार एलवर जोर दिला असून कुटीर, गृह, लघु-मध्यम उद्योगांना गती दिल्यामुळे करोडो लोकांचे हीत साध्य होणार आहे. त्यांनी मध्यमवर्गाला केंद्रित ठेवून या आर्थिक विकास पॅकेजमध्ये विशेष प्रावधान ठेवले आहे. कोरोना काळात ज्या हातगाडी वाल्यांचे रोजगार बुडाले आहेत त्यांना प्रत्येकी १०,००० रुपये देऊन त्यांचं काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंतप्रधान खाजगी क्षेत्राला आपला वैरी नाही तर आपला भागीदार मानतात आणि त्यांच्यासोबत राहून भारताला आधुनिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांनी माहिती तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञांना प्रोत्साहित करण्यासाठी अॅप इनोवेशन चॅलेंज हा अॅप आणला आहे. याशिवाय आजच्या काळासाठी आवश्यक अशा कोरोना वरील लस शोधण्यासाठी आणि फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण विश्वाला या महामारीतून बाहेर काढण्याचं आवाहन केलं आहे. आत्मनिर्भर भारत ह्या हे स्वदेशी वातूंची मागणी वाढवण्यासाठी तिचा प्रसार करण्यासाठी पंतप्रधानांनी “वोकल फॉर लोकल” अशी संकल्पना सुचवली आहे.
अशा वेगवेगळ्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे आपण हेवेदावे बाजूला ठेवून वाटचाल केली तरच आपण आर्थिक संकटातून बाहेर पडू शकू.

67 

Share


Vinisha Dhamankar!
Written by
Vinisha Dhamankar!

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad