Bluepad | Bluepad
Bluepad
लेबनॉन - भ्रष्टाचाराच्या बॉम्बने बसला राजकीय हादरा
Tanaya Godbole
Tanaya Godbole
13th Aug, 2020

Share


कोरोनाने एका झटक्यात सर्व जगाला वेठीस धरलं. आणि त्याच्या हाताळणीच्या प्रश्नावरून अनेक देशात राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरं होत आहेत. अशा अवस्थेत १९४५ साली जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने केलेल्या लिटिल बॉय आणि फॅट मॅन या दोन अणुबॉम्ब हल्ल्याची आठवण यावी असा भीषण विस्फोट ४ ऑगस्ट २०२० रोजी लेबनॉन या देशाची राजधानी बैरुत इथे झाला आणि सर्व जगाच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. अपरिमित जीवित आणि वित्तहानी झालेल्या ह्या दुर्घटनेने तिथल्या संसदेला ही राजकीय हादरे बसले आहेत. प्रथमदर्शनी हा दहशतवादी किंवा एखाद्या शत्रू राष्ट्राने केलेला हल्ला म्हणून वेगवेगळे अंदाज लावले गेले; पण आज एक आठवड्यानंतर हा लेख लिहीत असताना ह्या विस्फोटाविषयी सत्य सांगणार्‍या अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. आणि त्या इतक्या गंभीर आहेत की त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथल्या पंतप्रधान हसन दियाब यांच्या नेतृत्वात २१ जानेवारी २०२० पासून म्हणजे अवघे ६ महीने चाललेल्या सरकारमधल्या ७ मंत्र्यांनी आधी आपला राजीनामा दिला. अवघ्या २० जणांच्या या संसदेत या मंत्र्यांच्या राजीनाम्याने खिंडारच पडलं. तेंव्हा पंतप्रधान हसन दियाब यांनी आपलं सरकारच बरखास्त केलं. राष्ट्रपति मायकल ऑन यांनी दियाब यांच्या सरकारचे राजीनामे स्वीकारले असले तरी नवीन कॅबिनेट बनेपर्यन्त त्यांना “काळजीवाहू सरकार” म्हणून काम करण्याचे आदेश दिले आहेत.

लेबनॉन - भ्रष्टाचाराच्या बॉम्बने बसला राजकीय हादरा

लेबनॉनची जनता ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यावेळचे पंतप्रधान साद हरीरी यांच्या सरकारने तंबाखूपासून सोशल मीडियावर लावलेल्या अवाजवी करांवर, गरीबी, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रातील अनागोंदी कारभारावर नाराज होती. गांजलेल्या जनतेने त्या सरकारला ह्या अत्याचारासाठी आंदोलने करून सत्तेतून पायउतार व्हायला लावलं होतं. हिजबुल्लाहच्या समर्थनाने नवीन सरकार आलं पण अनेक दिवस पंतप्रधान कोण होणार म्हणून वाद रंगल्यानंतर अखेर हसन दियाब यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. नवीन सरकार काहीतरी चांगलं काम करील आणि देशात माजलेली आर्थिक बजबजपुरी बंद होईल अशी तिची अपेक्षा होती पण नेमकं याच वेळी कोरोनाने हल्ला केला आणि आधीच लयाला गेलेल्या अर्थव्यवस्थेची आणखीनच पडझड झाली.

४ ऑगस्ट २०२० चा सूर्य अस्ताला जाऊ लागला, समुद्र किनारी वसलेल्या बैरुत या बंदरावर संध्याछाया पडू लागल्या आणि अचानक तिथल्या एका गोदामातून धूर येऊ लागला आणि तो सगळीकडे पसरत असतानाच बघता बघता एक मोठा अणुबॉम्ब हल्ल्यात निघतो तसा मशरूमच्या आकाराचा लालभडक आगीचा लोळ उठला आणि त्याचा प्रचंड स्फोट झाला. त्यानंतर त्या आगीच्या लोळाचा पांढरा ढग बनला आणि अंधाराचं साम्राज्य पसरलं. आसपासच्या सिरिया, जॉर्डन, रशिया ह्या देशांमध्ये जवळपास ३.३ रिष्टर स्केलचा भूकंप झाल्याप्रमाणे धक्के बसले. ह्या स्फोटात दोनशे बळी, ६ हजार जखमी आणि जवळपास ३ लाख लोक बेघर झाले, कोटय़वधींचे नुकसान झाले. शहर हांहां म्हणता बेचिराख झालं. अणुबॉम्ब प्रमाणे असणार्‍या या हल्ल्याची पहिली संशयाची सुई इस्रायलकडे वळली होती. पण स्फोटाची माहिती काढल्यानंतर कळलं की हा स्फोट बैरुतच्या त्याच गोदामात ठेवलेल्या २७५० टन अमोनियम नायट्रेट मुळे झाला. इमारतीत कुठल्याशा कारणामुळे आग लागली आणि ती या स्फोटकांपर्यंत पोहोचली आणि हा स्फोट झाला. नागरी युद्ध, इस्रायलसोबतचे संघर्ष आणि दहशतवादी हल्ले सोसणाऱ्या या शहरातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्फोट होता.

अमोनियम नायट्रेट हे खाणकाम आणि खतांसाठी लागणारं एक संयुग आहे. ते स्फोटक असल्यामुळे अत्यंत जपून व सुरक्षित ठिकाणी बंदोबस्तात ठेवावं लागतं. सप्टेंबर २०१३ मध्ये रोसस नामक जहाज जॉर्जिया येथून मोझांबिककडे निघालं होतं. मात्र, बैरुतला आणखी माल भरायचा असल्याचे ऐन वेळी कॅप्टनला कळवण्यात आल्यामुळे जहाज बैरुत बंदरावर नेण्यात आलं. त्यात काही त्रुटी आढळल्याने ते जहाज तिथेच थांबवून अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त केला. तेव्हापासून म्हणजे गेली ७ वर्षे हा साठा त्या बंदरातील एका गोदामात ठेवण्यात आला होता. बैरुतमधील बंदरे आणि सीमा शुल्क विभागाने हा साठा इतरत्र हलवण्याविषयी स्थानिक प्रशासन आणि न्याय विभागाला वारंवार लिहूनही काही झाले नाही. ह्या अनास्थेमुळेच आज बैरुत वर ही वेळ आली आहे. या स्फोटांप्रकरणी बैरुत बंदर प्रशासनाच्या २० अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

स्फोटांनंतर लोकांचा भडका उडणं साहजिक आहे. तसा तो उडाला आणि आंदोलकांनी बैरुतमध्ये असलेल्या संसदेवर दगड धोंड्यांनी हल्ला करून आपला राग काढला. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. लोकांचा रोष लक्षात घेत पंत प्रधान दियाब यांनी सरकार बरखास्त केलं आणि त्यांनी आधीच्या सरकारला जबाबदार धरत त्यांच्यावर ताशेरे ओढत म्हटलं की, “गेली सात वर्ष लोकांपासून लपवून ठेवलेल्या अमोनियम नायट्रेट या साठ्याला मागील भ्रष्टाचारी सरकार जबाबदार आहे. आणि त्यांना त्यांच्या ह्या अमानवी कृत्याची लाज वाटली पाहिजे.” लेबनॉनला सर्व जगातून मदतीचा हात मिळत असला तरी त्यांच्या स्वत:च्या राज्यकर्त्यांचं पाठबळ त्यांना पुरेशा प्रमाणात मिळत नाहीये, हे नक्की. धर्म, पंथ आणि भ्रष्टाचाराच्या कचाट्यात सापडलेलं राजकारण आणि तिथल्या जनतेचे आणखी किती वाभाडे निघतात हे पुढेच पाहावं लागेल.

12 

Share


Tanaya Godbole
Written by
Tanaya Godbole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad