Bluepad | Bluepad
Bluepad
गोकुळाष्टमी : सर्व जगी गोकुळ नांदो
S
Shruti More
11th Aug, 2020

Share


अहमात्मा गुडाकेश
सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च
भूतानामन्त एव च ॥

गोकुळाष्टमी : सर्व जगी गोकुळ नांदो

श्रीमद् भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “सर्व भूतांच्या आत्म्यात मी वसलो आहे आणि त्यांचा आदी, मध्य आणि अंत सुद्धा मीच आहे.” असा सर्वकाळ भरून उरलेला कृष्ण भारतीयांच्या आयुष्यात सुद्धा ठायीठायी पेरलेला आहे. श्रीकृष्णाएवढं इतर कोणत्याही ईश्वराला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आठवलं जात नाही. त्याच्या इतकं प्रेम इतर कोणत्याही ईश्वराच्या वाट्याला आलेलं नाही. इतर देवादिकांची आराधना मनोभावे केली जाते, अगदी त्यांच्या नावाने राजकारण ही केलं जातं, पण कृष्ण एकटाच एक असा खेळिया आहे ज्याने आपल्या खेळण्या बागडण्यातून, नात्यांच्या गुंत्यात न अडकता कर्माला महत्व देण्यातून आणि आपल्या कूटनीतीतून सर्व जगाला तो कसा सर्वव्यापी आहे ते त्याच्या चरित्रातून दाखवून दिलं आहे. त्याच्या चरित्रातील एकही टप्पा असा नाही ज्यात रोमहर्षकता नाही. अगदी जन्म झाल्यानंतर काहीच दिवसात पूतना मावशीला धडा शिकवण्याचा प्रसंग असू दे की कुरुक्षेत्रावर शेवटी नि:शस्त्र कर्णावर बाण सोडण्यासाठी अर्जुनाला उकसवणं असू दे. त्याच्या प्रत्येक कृत्याला चांगल्या वाईटाची झालर होती. म्हणून तो सामान्य माणसांला जवळचा वाटतो. तो काळा नव्हता की गोरा नव्हता, तो निळा होता. आकाशासारखा. निरभ्र. म्हणूनच भारतीयांच्या मनात त्याची राजकरणी आणि कूटनीतिज्ञापेक्षा नटखट, माखनचोर, कळी काढणारा, यशोदेला सतावणारा आणि राधेवर निरतिशय प्रेम करणारा ही अमिट प्रतिमा कोरलेली आहे. तो मथुरेत जन्मलेला आणि राजा ही तिथलाच होता. पण त्याचं बालपण ज्या गोकुळाने पहिलं तेच गोकुळ आपल्या घरात नांदू दे अशी अपेक्षा सर्वजण करीत असतात. वसुदेवाने कृष्णाचा जन्म झाल्यावर त्याला गोकुळात आणला तो भाद्रपदाच्या वद्य अष्टमीचा दिवस म्हणूनच आनंदाची लयलूट करणारा “गोकुळाष्टमीचा” असतो.

“गोकुळाष्टमीचा” सण कोणाला माहीत नाही? सर्वजण फार उत्सुकतेने तो साजराही करतात. पण आज आपल्याला प्रत्येक गोष्टीचा इवेंट करण्याची सवय लागली आहे. ही वाईट गोष्ट नाही. उलट आता इवेंट मॅनेजमेंट ही नवीन शाखाही निर्माण झाल्यामुळे अनेकांना रोजगारही मिळाले आहेत. पण ह्या सर्व धबडग्यात आपण एखाद्या गोष्टीचं संस्कृतिक महत्व संपवून टाकतो. ह्या गोष्टी “गोकुळाष्टमी”च्या निमित्ताने प्रकर्षाने दिसतात हे आपण सर्वजण जाणतोच. आणि त्याला कारण असतं अर्थात “दहीहंडी”.

मानलं की कृष्ण त्याच्या सवंगड्यांना घेऊन जेंव्हा लोणी चोरायला जात असेल तेंव्हा त्याला सवंगड्यांच्या अंगावरून चढून जावं लागत असेल. आणि दहीहंडी त्याचंच प्रतीक आहे. पण काय हो? किती उंचीवर ती लोण्याची मडकी शिंक्यांमधून लटकवलेली असतील? आता सारख्या २ मजली की सहा मजली इमारती एवढे की आणखी उंच? नक्कीच नाही. एखाद्या घरात जमिनीपासून १०-१२ फुटच्या वर ती बांधलेली नसतील. मग आपण एवढे उंच मानवी मनोरे करून दहीहंडी साजरी करण्याचं कारण काय? तर दहीहंडी हे एक निमित्त आहे एक खेळ खेळण्याचा किंवा आपल्या गटातील बलशाली आणि शिस्तबद्ध खेळाडू दाखवण्याचा. दहीहंडी ही प्रामुख्याने महाराष्ट्रातच खेळली जाते आणि त्यात कबड्डी खेळणार्‍या तरुण तगड्या आणि धिप्पाड लोकांनीच सहभाग घ्यावा असा संकेत आहे. कबड्डी हा मुलत: महाराष्ट्राचा क्रीडा प्रकार आहे. पण आता कबड्डी आणि दहीहंडी हे दोन्ही प्रकार ग्लोबल झाले आहेत. त्यात स्थानिक राजकारणाचा आणि व्यवसायिकतेचा प्रवेश झाल्यामुळे त्याला इवेंटचं रूप आलं आहे. जास्तीत जास्त उंच आणि रोमहर्षक दहीहंडी अशी जाहिरात करत कबड्डी खेळाडूंना हाताशी धरून सुरूवातीला ह्या हंड्या लावल्या गेल्या. स्पर्धा वाढली तसे थर वाढले आणि सरतेशेवटी तगड्या खेळाडूंची जागा फक्त दहीहंडीचा सराव करणार्‍यांनी घेतली. दहीहंडी उंच आकाशात जाऊ लागली तसे तरुण कुठे हात पाय गमावू लागले तर कुठे हकनाक बळी पडू लागले. ह्या संपूर्ण सणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यात आता मुलीही येऊ लागल्या. परदेशी येऊ लागले त्यामुळे आता दहीहंडीला खेळ म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अशावेळी शाळेत साजरी होणारी छोटेखानी दहीहंडी खूप भावते. वर्गातली मुलं बासरीधारी कृष्ण आणि मुली कलश घेतलेली, चनिया चोली नेसलेली राधा होत असते. एवढे कृष्ण आणि एवढ्या राधा बघून तर खुद्द गोकुळवासीयांनी सुद्धा तोंडात बोटे घातली असती. प्रातिनिधिक कृष्णाकडून हंडी फोडून झाली की सगळ्यांना लोणी आपसूकच दिलं जातं. ती लोण्याने बरबटलेली तोंडे बघून प्रत्यक्ष यशोदाच आपला पदर ओढून तोंडे पुसायला सरसावली असती. इतकं ते गोंडस चित्र असतं. ते निरागसपण लोकांनी जपावं. दुसर्‍या दिवशीचा काला हा दु:ख विरहित असावा. कोणाच्याही वाट्याला कशानेही आयुष्यभराची वेदना येऊ नये. सगळीकडे सुख असावं, आनंदी आनंद असावा. आपलं आयुष्य, सर्व विश्व “गोकुळ गोकुळ” व्हावं. ह्याच अपेक्षेने “गोकुळाष्टमी”च्या कृष्णाला प्रिय असणार्‍या लोण्याप्रमाणे गोड आणि स्निग्ध शुभेच्छा...

20 

Share


S
Written by
Shruti More

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad