Bluepad | Bluepad
Bluepad
छंद देईल रोजगार
Vinisha Dhamankar
Vinisha Dhamankar
9th Aug, 2020

Share


छंद देईल रोजगार

लॉकडाऊनची आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकांनाही आतापर्यंत आपली जबाबदारी उमजू लागली. त्यामुळे अनलॉक जाहीर झाल्यावर सुरूवातीला लोकांनी एकमेकांना संपर्क करून बाहेर काय परिस्थिति आहे याचा कानोसा घेत अलगद पायात चप्पल सरकवत फेरफटके मारून अंदाज घेतला. आता लोक हळू हळू कामाधंद्याला लागले आहेत. शारीरिक अंतर ठेवणे, नाका तोंडावर मास्क लावणे, सॅनिटायजर जवळ बाळगणे या सगळ्याची आता सवयच झाली आहे सर्वांना. रस्त्यांवर लगबग दिसू लागली आहे, यामुळे आपलं जीवन पुन्हा ट्रॅकवर येत आहे हे दिसू लागलं आहे. हे सर्व करताना सरकारने वर्ज्य ठरवलेल्या म्हणजेच सलून, जिम, तरण तलाव, मॉल, हॉटेल्स इथे जाण्याचं स्वत:हून टाळत आहेत. ज्यांना त्या कोरोनाच्या कचाट्यात सापडायचं नाहीये ते आपसूकच आपली सर्व काळजी घेत आहेत. ह्याला हर्ड ईम्युनिटी तर नाही म्हणता येणार पण हर्ड प्रीकॉशन किंवा हर्ड अलर्टनेस मात्र नक्की म्हणता येईल.
पण ह्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना पूर्ण पगार द्यावा असा सरकारचा आदेश असला तरी खाजगी कंपन्यांवर सरकारचा अंकुश नाही आणि कंपन्यांचेच व्यवहार ठप्प झाल्यावर त्या पगार कुठून देणार या सबबीवर सरकरकडेही काही ठोस उत्तर नाही. शारीरिक अंतर पाळण्यासाठी कार्यालयांना ३० टक्के उपस्थिती असण्याचे नियम लावले गेले पण याचा फायदा उठवत कंपन्यांनी उरलेल्यांना सरळ नारळच दिला आहे. अशा अनेक लोकांसमोर रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ही बाब शासनाने ओळखली आहे आणि असे रोजगार हरवून बसलेले लोक आणि ज्या कंपन्यांना अजूनही कर्मचार्‍यांची गरज आहे अशा दोघांमध्ये सेतुचं काम करण्यासाठी https://mahajobs.maharashtra.gov.in/ ही वेबसाइट सुरू केली आहे आणि इथे अनेक लोक आपले नाव नोंदवत आहेत. आपणही याचा लाभ घ्यावा.
या महामारीत सर्वात जास्त दुर्लक्षित राहिलेला माध्यम वर्ग आहे. हा वर्ग प्रामुख्याने वर्तमानपत्र, हॉटेल्स, शाळा, कॉलेजेस, मॉल्स, कॉर्पोरेट आणि सेमी कॉर्पोरेट ऑफिसेस, ट्यूशन क्लासेस इत्यादी ठिकाणी उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. ह्यांना ना गरीब म्हणून कोणत्या संस्थांकडून मदत मिळते ना श्रीमंतांप्रमाणे ते बँक बॅलेन्स वर जगू शकतात.
प्रत्येकाने हे दिवस कसे काढले असतील हे त्या त्या व्यक्तीलाच ठाऊक. पण काही का असेना या दिवसात प्रत्येकाने नवीन काही काही शिकलं असलं नसलं तरी आत्मचिंतन नक्कीच केलं असेल. मीही केलं, आणि यातून मला मोठे लोक जे नेहमी सांगतात त्याची प्रचिती आली. ते म्हणजे तुम्हाला एखादा छंद असायला हवा. पण याला आणखी जोडून मी म्हणेन की तो छंद प्रत्येकाला विवंचनांपासून थोडा वेळ विरंगुळा देणारा असावाच शिवाय आणीबाणीच्या काळात दोन पैसे सुद्धा खिशात टाकू शकेल असा असावा. म्हणजे समजा तुम्हाला जर चित्रकलेची आवड असेल आणि तुम्ही दुसर्‍या क्षेत्रात करत असलेली नोकरी अचानक गेली तर तुम्ही डिजायनिंग किंवा अशा प्रकारचं काम करू शकता. म्हणून तुमच्या नोकरी सोबत रोजगार देऊ शकेल अशा एखाद्या पर्यायी क्षेत्राचं व्यावसायिक प्रशिक्षण घ्या. जे तुम्हाला कधीही एक नोकरी गेली म्हणून निराश होऊ देणार नाही आणि तुमच्या समोर संधीचे दरवाजे उघडे ठेवील.
जसे की लेखकांनी भाषांतराचा पर्याय अवलंबावा, त्यासाठी एखादी देशी किंवा परदेशी भाषा शिकावी. अनेक साहित्य विविध भाषांमध्ये आहे जे अन्य भाषांमध्ये भाषांतरित करणार्‍या प्रकाशन संस्था आहेत. त्या संस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या जॉब पोर्टल वर रेज्युम अपलोड करू शकता. आपला आवाज ही मोठी देणगी. तुम्ही त्याचा कोर्स आणि आवाजावर थोडी मेहनत घेऊन वॉइस ओवर करू शकता. बेसिक कोडिंग शिकून सॉफ्टवेअर डेवलप करण्यासंदर्भाने पर्याय शोधू शकता. असे व्यवसाय देणारे छंद विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कॉमर्स आणि कोणतीही कला या सर्व क्षेत्रातील लोक जोपासू शकतात. अशा प्रकारची लहान - मोठी कामे करणार्‍या कर्मचार्‍यांची, कलाकारांची,तंत्रज्ञांची गरज अनेक लहान मोठ्या कंपन्यांना असते. पण आपण त्यासाठी त्या क्षेत्रात सक्षम पण असायला हवं, त्यासाठी मेहनत घ्यायला हवी.
आज युट्यूब वर अनेक विडिओ असतात. तुमच्या आवडत्या क्षेत्रातील विषयांचे विडियो तुम्ही पाहिलेत आणि स्वत: थोडा अभ्यास केला किंवा Coursera किंवा Udemy सारख्या वेबसाइटवर एक सर्टिफिकेट कोर्स केला तरी तुम्ही त्यात पारंगत होऊ शकता. तुम्ही म्हणाल की प्रत्येक विषयाचे नवीन आवृत्त्या येतच असतात त्यामुळे तुम्ही आता जे कराल ते काही दिवसात आऊट डेटेड होईल, पण ते तसं नाहीये. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा पाया समजला की वर चढत जाणारे मजले सुद्धा आपोआप समजू लागता. ते म्हणतात “समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग”. आईकडे हाताशी काही पैसे असतात माहीत आहे ना? अडीनडीला लागतील म्हणून तिने ते ठेवलेले असतात. तुमचा हा कोर्स ही तसाच असेल. यापुढे तुमच्यावर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळलीच तर तुमच्याकडे पर्यायी व्यवस्था असायला हवी. अहो, सचिन तेंडुलकरने सुद्धा आपल्या भवितव्याची व्यवस्था “तेंडुलकर्स” हे हॉटेल आणि त्याच्या शृंखला काढून करून ठेवली आहे तर आपण ते फॉलो करायला काय हरकत आहे? तेंव्हा यापुढे छंद हे केवळ मानसिक समाधान देणारेच नाहीत तर आर्थिक पाठबळ देणारे ही असावेत.

20 

Share


Vinisha Dhamankar
Written by
Vinisha Dhamankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad