Bluepad | Bluepad
Bluepad
प्रिझम..
Dr.Anil Kulkarni
Dr.Anil Kulkarni
9th Aug, 2020

Share

'मानवी मनातील वैचारिक स्पंदनाचा इंद्रधनु साकारणारा ‘प्रिझम’
- डॉ. अनिल कुलकर्णी
प्रकाश किरणातील सप्तरंग ‘प्रिझम’मुळे उलगडतात. प्रत्येकाच्या मनातले विविध पैलू, वैचारिक, भावनिक, कवडसे बनून येतात ते प्रिझममुळे.
डॉ. ज्योती धर्माधिकारी यांच्या पुस्तकातून भावनिक आंदोलनाच्या विविध छटा रंगाच्या स्पेक्टमप्रमाणे उलगडत जातात. ‘प्रिझम’ हे साहित्य संशोधन, इंग्रजी-मराठी वाङमय चर्चा, स्त्रीविषयक जाणिवा आणि भावस्पर्शांच्या लेखाचे संकलन आहे. काही प्रासंगिक, सामाजिक लिखाणांचाही समावेश त्यात आहे. ‘भावबंधाचे थेंब’, ‘भिंत काचेची’, ‘अस्तीत्वाचा क्षण’ हे लेख पारदर्शी मेळामध्ये गुंतुन पडणारे मन, भावबंधाचे थेंब वेचताना लेखिकेला गवसले. ‘सबअल्टर्न स्टडीज्’ हा जनसामान्यांचा भारतीय इतिहासातील दुय्यमीकरण समजून घेण्याचा अभ्यास आहे. लेखिकेने स्त्रीयांच्या संदर्भात दुय्यमीकरणाची प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि
त्याचे विवेचन लेख रुपाने मराठीत भाषांतरीत केले.
स्त्रियांच्या दुय्यमीकरणाच्या संदर्भात भारतीय इंग्रजी लेखिकांच्या वाङमयाचे संशोधन यात आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
एखादा प्रकाशकिरण लोलकामधून बाहेर पडताना जसे सप्तरंगी किरणे बाहेर पडतात, त्याचप्रमाणे एखादा लेखक, पुस्तक, प्रसंग आणि भावनिक आंदोलन याविषयी वाचतांना विविध छटा, रंगांचे स्पेक्ट्रम उलगडत जातात. गेल्या काही वर्षात इंगजी साहित्याचा मराठी वाचक वर्ग वाढत आहे. चांगल्या इंग्रजी वाङमयाची, लेखकांची ओळख मराठी वाचकांना व्हावी या हेतुने काही लेख यात आहेत. स्वातंत्र्य काळातील इंगजी वाङमय तर इतिहासाचा अमुल्य ठेवा आहे, अशी काही पुस्तके वाचली जावीत याकरिता काही लेख यात आहेत.
गेल्या काही वर्षात इंगजी वाङमयाने साहित्यात कायापालट केला आहे. भाषाशैलीपासून ते वाङमय प्रारुप, प्रतिके, प्रतिमा अशा अनेक संदर्भामध्ये अमुलाग बदल झाला. आधुनिक लिखावटीचा स्पर्श असलेले निस्सीम एझकेल, सुदिप नगरकर, चेतन भगत यांचे साहित्य स्वत:चा वेगळा ठसा निर्माण करते. यांच्या साहित्याचा परामर्श लेखिकेने घेतला आहे. इंग्रजी लेखकांची वाङमयीन समीक्षा या सदरात स्त्री दुय्यमीकरणाची प्रक्रिया संदर्भात मंजू कपूर या इंग्रजी लेखिकेचे नाव उल्लेखनीय ठरते. मध्यमवर्गीय स्त्रीयांचे प्रश्न, त्यांची मानसिकता, त्यांच्यावर लादलेले दुहेरी दुय्यमीकरण याचं समर्थचित्रण मंजू कपूर त्यांच्या कादंबरीतून करताना दिसतात.
‘इंडियन अ‍ॅट सोल’ या कमला मार्कंडेय यांच्या लेखात भारतीय इंग‘जी साहित्य जगभरात प्रसिध्द होण्यामध्ये अनेक लेखिकांनी स्त्रीसंवेदना उजागर करुन भारतीय सर्वसाधारण स्त्रीचं भावविश्‍व आपल्या साहित्यातून मांडले आहे. रुटलेस इंटलेक्च्चूअल या ‘रुथ प्रवार झाबवाला’ लेखामध्ये लेखकाचे लिखाण
हे त्यांची भूमी, परंपरा आणि त्याठिकाणचा समाज यांचे ‘बॉयप्राडक्ट’ असते, असे नमुद केले आहे. तत्वज्ञानाचा अभ्यास लेखक, ‘राजा राव’ या लेखामध्ये भारतीय इंग्रजी साहित्याला खर्‍या अर्थाने मुल्कराज आनंद, आर.के. नारायण आणि राजा राव या त्रयींच्या वाङमयामुळे जागतिक मान्यता मिळाली असा उल्लेख आहे. सामाजिक संवेदनाचे लेखन मुल्कराज आनंद या लेखात इन्डो - अँग्लीयन लेखनाच्या पर्वाची सुरुवात, ज्या त्रयींमुळे झाली, त्यापैकी मुल्कराज आनंद हे पहिले भारतीय लेखक ठरले असा उल्लेख आहे. तरुणांचा आयडॉल - चेतन भगत या लेखात चेतन भगतनी इंग्रजीत ६ पुस्तकांची (कादंबरी प्रकार)
भर घालून वैशिष्टपूर्ण ठसा उमटवला.
गेल्या काही वर्षात एक नवीन कॉर्पोरेट क्षेत्र, त्यांची वेगळी संस्कृती उदयाला येत आहे. या कॉर्पोरेट कल्चरच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. या जनरेशनला पुन्हा फिक्शनकडे वळण्याचे कसब चेतन भगतसारख्या या लेखकांनी कसे केले याचा उहापोह यात आहे.
फाळणीच्या वेदनांचा आलेख होसेन यांनी आपल्या लिखाणातून मांडला आहे. संस्थानिक असलेल्या परंपरागत मुस्लीम युवतीला दिवाणखान्यात तिच्या मताला महत्व येणे हीच मुळी स्त्रीच्या सन्मानांची गोष्ट ठरावी ही प्रक्रिया आलिया होसेनच्या कादंबरीपासून सुरु होते, ही वाटचाल निश्‍चीत आश्‍वासक आहे. निस्सीम एझकेल हे भारतीय इंग‘जी वाङमयातील महत्वाचे नाव त्यांच्या कवितेचे प्रारुप, आकृती बंधात्मक रचना, आधुनिकतेची कविता यामुळे वैशिष्टपूर्ण ठरते. “आधुनिक कवितेची नांदी” या लेखात त्याचे विवेचन आहे. वाङमय चर्चा या सदरात ‘मी लिहू बघतेय’ मध्ये बाईच व्यक्त होणं हे तिच्या मर्यादांच्या लक्ष्मण रेषेच्या आत होते. मानसिक गुलामगिरीची भाषा ती मांडत रहाते.
लिहिणाऱ्या स्त्रीया प्रामुख्याने मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय गटात मोडणाऱ्या आहेत. त्यांच्या भौगोलिक, मानसिक, सांस्कृतिक जडण-घडणीचा प्रभाव त्यांच्या लेखनावर अनुषंगाने पडत असतो. आज स्त्रिया आधुनिक परिमाणात लिहत्या झाल्या आहेत. त्यांची व्यक्त होण्याची गरज लेखनाच्या माध्यमातून भागवली जाते. 'बाईपणाच्या कक्षा रुंदावतांना' या सदरात डॉ. अरुणा ढेरेंचा ‘निरंजन ’ कविता
संग‘ह अशाच काही उपेक्षित, ग्रामीण व मूक स्त्रीयांचे चित्रण करतो. 'घरघरीतून माले, मले ऐकू येतो सूर', या बहिणाबाईच्या ओळी ऐकल्यावर स्त्री साहित्याची निर्मिती तिच्या स्वत:शीच गुणगुणण्यामुळे झाली असावी असे वाटते. तालबध्द, लयबध्द गुणगुणत-कष्टप्रद कामे हलके करण्याची किमया तिला निसर्गत:च साध्य झाली आहे. आज स्त्रियांच्या मानसिक व्यापारात अमुलाग‘ बदल झाले. आज आधुनिक स्त्रिचा लढा वेगळ्या पातळीवर तेवढाच कष्टप्रद आणि अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. व्यक्त होण्याची परंपरा मुक्ताई, जनाबाई, बहिणाबाई यांच्यापासून ते आजपर्यंत स्त्रीने जपली आहे. अधिक प्रगल्भतेने स्त्री ही व्यक्त होत आहे. हातात लेखणी आल्याने स्त्री संवेदना माणुसपणाचे आभाळ कवेत घेण्याचे सामर्थ्य मिळाले आहे.
व्यक्तीविशेष मध्ये डॉ. आशुतोष कोतवाल यांनी विश्‍वनिर्मितीच्या रहस्यांचा उलगडा करतांना सूक्ष्ममूलकण ‘हिग्ज बोझॉन’ चा शोध आणि त्याच्या गुणधर्माचा अचुक अंदाज लावला. तसेच डॉ. अब्दुल कलाम यांच्यावर लेख आहे आणि 'अरुणा शानबाग नावाची चळवळ' या लेखात अरुणा शानबाग समाज व्यवस्थेच्या कशा बळी ठरल्या, त्यांच्या मृत्युने संयमी, सहानुभूतीपूर्वक आणि माणुसकीला जागणार्‍या सहकार्‍याची गरज अधोरेखीत केली, त्या दृष्टीने त्यांचा मृत्यू हा बलिदानच आहे.
ललीत लेख सदरात, 'भावबंधाचे थेंब', 'श्रावणात घननिळा बरसणार?', 'भिंत काचेची', 'अस्तीत्वाचा क्षण', मैत्र जीवांचे लेख आहेत.' तिला खुणावणारी क्षितीजे', लिहीती सखी, 'स्त्रीशिक्षण' तसेच प्रसांगिक लेखात 'आनंदाचं झाड', 'फेस्टिव्हीटीच्या नावाखाली दडलय काय?', हे लेख आहेत. 'सत्ताबाधीत राजकारण आणि स्त्री', 'मी सक्षमा', 'जग दोघांचे समानतेचे', हे सामाजिक लेख आहेत.
प्रकाशकिरणातून प्रकाश झिरपतो, पण
‘प्रिझम’मुळे त्यातील रंगाची उकल होते. वास्तवात व कल्पनेत काय दडलय हे ज्याच्या त्याच्या आकलनाच्या ‘प्रिझम’मध्ये दडलय.
स्त्रियांच्या लेखन प्रपंचाची पहिली पायरी आहे तिचे शिक्षण. आज अनेक व्यासंगी स्त्रिया उत्कृष्ट दर्जाची साहित्य निर्मिती करत आहेत. स्त्रियांचा साक्षर होण्याचा इतिहास, त्यांचे लेखन विषय लेखिका म्हणून नावारुपाला येण्यापर्यंतचा प्रवास सांगणारे काही लेख यात आहेत. बहिणाबाईपासून अनेक कवियित्रिंनी त्यांच्या जगण्याची नोंद कवितेमधून घेतली आहे. स्त्री लेखिका केव्हा झाली यापेक्षा ती कवियत्री म्हणून कितीतरी आधी ओवीतून व्यक्त झाली. कर्तव्यबध्द जीवन गाऊन समृध्द करण्याच्या प्रयत्नात तिने नकळतपणे वाङमय निर्मिती केली. स्त्रियांचा लेखिका होण्याचा प्रवास हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. लिहीण्याची उर्मी बरोबरच परिस्थिती देखील परिणामकारक घटक आहे. अनेक स्त्रियांचा लेखन प्रपंच कष्टप्रद असतो. "लिहीती सखी', 'मी लिहू पाहते', 'तिला खुणावणारी क्षितीजे' अशा लेखांमध्ये स्त्रीच्या लिहीण्याचा प्रवास खरोखरच उलगडण्याचा प्रयत्न आहे.
एका प्रिझमिक दृष्टीने प्रस्तुत विषयाकडे पाहिल्यास अनेक विषयांचे पैलू व पदर उलगडत जातात. सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. थोडक्यात विविध लेख असलेला संग्रह वाचनीय आहे. प्रिझम (ललित लेख संगह)
प्रकाशक - प्रियंका प्रशांत पटवर्धन
लेखिका- प्रा. डॉ. ज्योती धर्माधिकारी
किंमत - रु. ६४/
पृष्ठसंख्या १२८
डॉ. अनिल कुलकर्णी
E-mail : anilkulkarni666@gmail.com
प्रिझम..

20 

Share


Dr.Anil Kulkarni
Written by
Dr.Anil Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad