Bluepadआपण देऊ ओवाळणीचं दान...
Bluepad

आपण देऊ ओवाळणीचं दान...

A
Ankita Desai
9th Aug, 2020

Share


मग यंदा ओवाळणी किती मिळाली? प्रश्न आठवतो का? हो तेच. भावाला ओवाळल्यानंतर ताटात भाऊ ठेवतो ते पैसे. कोणत्याही खजिन्यापेक्षा किती तरी पटीने मोठा असतो हा खजिना; कारण त्यावर आपला आणि फक्त आपला हक्क असतो. मग तो जपून ठेवायचा, एखादा ड्रेस घ्यायचा की पार्टी करायची हे आपण ठरवायचं.


संरक्षक, माया, ममता आणि मैत्री हे गुण कोणामध्ये असतात असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या भावाचं किंवा बहिणीचं नाव घ्याल. आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनंतर आपली भावंडंच अधिक जवळची असतात. श्रावणाच्या पौर्णिमेला येणारा रक्षाबंधनाचा सण म्हणजे तर घरातील सर्वांनी एकत्र जमून धम्माल करण्याचा खास सोहळाच असतो. यंदा हा सण ३ ऑगस्ट रोजी येऊन गेला. गेल्या ४ महिन्यात सण जसे आले आणि गेले तसाच हा सुद्धा जाणार. नाही तर आता पावेतो बाजार राख्यांनी भरून गेले असते. पण यावर्षी कोरोनाच्या दहशतीने विक्रेत्यांनी राख्यांना ऊन दाखवलंच नाही. दिव्यांगांनी बनवलेल्या राख्यांना दरवर्षी विशेष मागणी असते. यातून त्यांनाही स्वावलंबनाचे धडे मिळतात आणि चार पैसे गाठीशी राहतात. पण यंदा सर्व उद्योगांप्रमाणे हा उद्योग सुद्धा ठप्प झाला आहे.

राखीच्या ह्या रंगबिरंगी गोष्टी तर संपणार्‍या नाहीत. पण आपल्याला खरंच ह्या सणाचं महत्व कळलं आहे का? आपल्याला रक्षाबंधनाविषयीच्या पौराणिक आणि ऐतिहासिक सर्व गोष्टी माहीत आहेत. आपली संस्कृती अफाट आहे. त्यामुळेच की काय आपण पुराणात आणि इतिहासात नुसतेच रमतो, त्यापासून काही धडे घेण्याचे कष्ट मात्र उचलत नाही. चित्तौढगडची राणी कर्णावती गुजरातच्या बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधली. हुमायू राणीच्या रक्षणासाठी धावला. ही कथा आपल्याला माहीत असून सुद्धा आपण आपल्या जातीबाहेरच्या आया बहिणींच्या लज्जारक्षणाची वेळ येताच घराचे दरवाजे बंद करून बसतो. एखादी बहीण आपल्याला वाचवण्यासाठी मदतीची भीक मागत असेल तर रस्त्यावरून जाणार्‍यांना तिच्यात आपली बहीण का दिसत नाही? ज्योती पांडे अर्थात निर्भयाच्या मदतीला किती भाऊ धावून गेले? खैरलांजीमध्ये सुप्रिया आणि प्रियांकाच्या शरीराचे भर गावात लचके तोडले जात असताना किती भावांनी त्या लांडग्यांवर काठी उगरली? भाऊ जेंव्हा आपल्या बहिणीला तिच्या संरक्षणाचं वचन देतो तेंव्हा तो समाजातील इतर मुलींच्या मदतीला जाणार नाही अशी शपथ घेतो की काय? बहीण भावाला राखी बांधते ती त्याने तिचे संरक्षण करावे म्हणून. पण आपल्या बहिणीला संरक्षणाचे वचन देणारा भाऊ दुसर्‍याच्या बहिणीला अर्थात आपल्या बायकोला मात्र त्रास देत असेल तर अशा व्यक्तिला दुटप्पी का म्हणू नये? दरवर्षी येणारी भाऊबीज म्हणजे दरवर्षी तुम्ही वचन देता. हे दरवर्षी दिलेलं वचन आपल्या सख्ख्या बहिणीच्या बाबतीत तरी किती लोक पाळतात?

रक्षाबंधन आले की भाऊ आणि बहिणीनंतर कोणाची आठवण येत असेल तर ती आहे सैनिकांची. सैनिकांना राखी बांधण्याची पद्धत काही वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. आज मात्र त्याचा सुद्धा इवेंट झाला आहे. आपल्याला सण साजरे करायला आवडतात, सैनिकांना ही समारंभापूर्वक राखी बांधण्याचा कार्यक्रम करायला काहीच हरकत नाही. पण कोणीही सैनिकांना आपल्या हातावर राखी बांधायला लावून त्यांच्या आणि सीमेच्या आत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या रक्षणाची जबाबदारी उचलत नाहीत. उलट शहीद जवानांच्या वीर पत्नींना घरगुती समारंभात सुद्धा बोलावण्याची नियत आपल्यात नसते. कारण तर आपल्या सर्वांना माहीत आहेच.

बहीण भावाला राखी बांधण्याचा काळ आता मागे पडला आहे. आता बहीण भाऊ एकमेकांना, भाऊ भाऊ आणि बहिणी बहिणी एकमेकांना राखी बांधतात. कारण आता एकमेकांच्या सोबत उभं राहून प्रत्येक आव्हानांना सामोरं जाण्याचा काळ आला आहे. एकमेकांच्या चांगल्या वाईट प्रसंगात आपण नेहमीच एकमेकांच्या सोबत राहू असं वचन देण्याचा काळ आला आहे. म्हणून ते ओवाळणीचं दान दोघांच्याही ताटात पडलं पाहिजे तरच ती खरी रक्षाबंधन ठरेल.
आज कोरोनाच्या महामारीत असे अनेक लोक काम करीत आहेत ज्यांना आपण ओळखतही नाही. त्यांचा आपण “कोरोना योद्धा” म्हणून गौरव तर केला पण त्यांच्या घरात आणि परिसरात त्यांच्याशी होणारा व्यवहार काळीज चिरून काढणारा आहे. कोणताच मानव कधी अस्पृश्य नसतो. कोणत्याही परिस्थितीत आपण मानवता गमवायला नको. यावेळी सैनिकांसोबत “कोरोना योद्ध्यांना” सुद्धा राखी बांधली जाईलच. त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं आहे, आता आपली पाळी आहे. चला आपला हात पुढे करूया. त्यांच्याकडून आपल्या हातावर राखी बांधून घेऊया आणि त्यांना सांगूय की आता तुमच्या रक्षणाची जबाबदारी आमची. त्या सर्व योद्ध्यांशी मानवतेने वागुया. तेंव्हाच तो पौर्णिमेचा चंद्र खुद्कन हसेल आणि म्हणेल, “ही पहा खरी ओवाळणी”.

17 

Share


A
Written by
Ankita Desai

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad