Bluepadवैज्ञानिक विचारांचे अधिष्ठान देणारे भगवान गौतम बुद्ध
Bluepad

वैज्ञानिक विचारांचे अधिष्ठान देणारे भगवान गौतम बुद्ध

Saurabh Zemse
Saurabh Zemse
7th May, 2020

Share

तुम्हाला तुमच्या क्रोधासाठी शिक्षा मिळत नाही तर ती क्रोधापासूनच मिळते. - भगवान गौतम बुद्ध
‘अत्त दीप भव’ अर्थात स्वत:च्या मार्गाचे स्वत:च दीपस्तंभ व्हा. भगवान गौतम बुद्धांचे हे वचन म्हणजे सार्वकालिक संदेशच. काळ बदलला पण ह्या उक्तीचा ना अर्थ बदलला ना महत्व. धडपडणार्‍या, चाचपडणार्‍या प्रत्येकासाठी हा मोलाचा संदेश नाही तर धीराचे शब्द आहेत. भगवान गौतम बुद्ध यांनी बौद्ध धम्माची स्थापनाच मुळात विश्वातून दु:ख नाहीसं करण्यासाठी केली. पण त्यासाठी तू पुढे चल, मी तुझ्या पाठीशी आहे असं कधीच सांगितलं नाही. उलट प्रज्ञा, शील आणि करुणा या त्रिसुत्रींच्या मार्गावरून चालत तू स्वत:च स्वत:चा मार्ग शोधून काढ, असं सांगितलं आणि त्यासाठी जगण्याचे उत्तमोत्तम मंत्र दिले ज्यामुळे बुद्ध पाठीशी नाहीत तर सोबत असल्यासारखे वाटतात. ते म्हणतात, आपले नित्यकर्म करीत असताना कोणावर रागावल्याने ज्या व्यक्तीवर रागावले त्याला फरक पडत नाही तर त्याचा परिणाम आपल्यावरच होतो. हेच तर वैज्ञानिक सत्य आहे. आपला रक्तदाब वाढला तर डॉक्टर आपल्याला रागावर नियंत्रण ठेवणं, ध्यान धारणा करणं असे उपाय सांगतात. बुद्ध तरी यापेक्षा वेगळं काय सांगतात? बुद्धांच्या ह्याच असाधारण, बौद्धिक आणि वैज्ञानिक अधिष्ठान असणार्‍या संदेशांमुळेच ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा’ असं म्हटलं जातं.

भगवान गौतम बुद्धांचा ज्या दिवशी जन्म झाला तो दिवस होता इ.स.पू. ५६३ च्या वैशाख पौर्णिमेचा. त्यांना ज्ञान प्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण हे देखील वैशाख पौर्णिमेलाच झालं. यासाठी या दिवसाला बुद्ध जयंती न म्हणता बुद्ध पौर्णिमा म्हणतात. त्यांचा जन्म शाक्य गणराज्य कपिलवस्तूचे सम्राट राजा शुद्धोधन तर आई महाराणी महामाया (मायादेवी) होते यांच्या पोटी लुंबिनी या वनात झाला. आज कपिलवस्तू आणि लुंबिनी हे दोन्ही नेपाळमध्ये आहेत आणि यूनेस्कोच्या देखरेखीखाली आहेत.

या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असं ठेवण्यात आलं. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला. असं म्हणतात की सिद्धार्थाने अचानक एक दिवस एक वृद्ध, एक आजारी व्यक्ती आणि एक शव पहिले त्यानंतर दु:खाचा शोध लावण्यासाठी आपल्या पत्नी आणि मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात त्यांनी राजगृह सोडले. पण हा चुकीचा इतिहास नंतर रंगवला गेला आहे. गौतम बुद्धानंतर २६०० वर्षांनंतर त्यांचा लोप पावलेला धम्म भारतात पुनरुज्जीवित करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमच्या परिव्राजक होण्याच्या घटनेची रीतसर मांडणी सखोल संशोधनाअंती केली, ती अशी.

तेंव्हाच्या शाक्य राज्यात एक संघ होता. वयाची वीस वर्षे पुर्ण केलेल्या प्रत्येक शाक्य तरूणाला त्या संघात दाखल होवून संघाची दीक्षा घ्यावी लागे. त्याप्रमाणे गौतमाने घेतली. संघाचा सभासद झाल्यापासून आठ वर्षे राजपुत्र गौतम या संघात नियमित जात होता. कामकाजात भाग घेत होता. आठव्या वर्षी जी घटना घडली त्याने एका वेगळ्या दु:खांतिकेला सुरुवात झाली.

रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य व बाजूच्या कोलिय राज्यात भांडण सुरू झालं. शाक्यांच्या सेनापतीने कोलियांवर चढाई करून त्यांना नेस्तनाबूत करावे असा ठराव मांडला. दोष शाक्यांचाही असल्याचे लक्षात आल्यावर गौतमाने या ठरावास विरोध केला. शाक्य संघात हा ठराव गौतमाच्या मताविरूद्ध बहुमतांनी पारित झाला. आता सर्वांना संघाच्या नियमानुसार सैन्यात सामील होऊन युद्ध करणे भाग होते. मात्र गौतमाच्या सद्सद् विवेक बुद्धीला बहुमताचा हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्याच्यापुढे तीन पर्याय होते. एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे, दूसरा देहांत शासन अथवा देशत्याग आणि तिसरा मार्ग होता आपल्या कुटूंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेणे किंवा त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देणे. पहिला आणि तिसरा पर्याय त्याला स्विकारणे शक्य नव्हते. राजपुत्र गौतम म्हणाला की, ‘‘मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय.’’ गौतमाने परिव्रज्या स्विकारल्यानंतर इकडे शाक्य व कोलिय यांच्यात मोठी खळबळ उडाली. त्यांच्यातील युद्धाचा जोर ओसरून शांततेसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले.  झगडा शांततेने मिटविला गेला. जेंव्हा सिद्धार्थाला हे विचारले गेले की, ‘‘आता तर झगडा मिटला आहे. आता तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुंटूंबाबरोबर का राहत नाही?’’ याला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर मोठे महत्त्वाचे आहे,

‘‘युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.’’

पुढे भगवान बुद्धांनी केलेली ज्ञानसाधना, बौद्ध दर्शनाची केलेली मांडणी, त्याची व्यापकता, देशातच नव्हे तर तेंव्हाच्या शेजारच्या इतर देशांतही त्याचा वाढत गेलेला प्रभाव हे सगळं सर्वांना माहित आहे. पुढे बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांनी, सम्राट अशोक आणि त्याच्या मुलांनी बौद्ध धम्म चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांत घेऊन गेले. म्हणूनच जगभरात चालत असलेल्या विध्वंसक विचारांचा पाडाव करून अहिंसा आणि शांतीचा बौद्ध मार्ग अवलंबला आणि मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले तर जग एक नंदनवन होईल. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा.

27 

Share


Saurabh Zemse
Written by
Saurabh Zemse

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad