Bluepadयारों...दोस्ती बडी ही हसीन हैं....👬👭👫🌹
Bluepad

यारों...दोस्ती बडी ही हसीन हैं....👬👭👫🌹

डॉ अमित.
डॉ अमित.
2nd Aug, 2020

Share

यारों...दोस्ती बडी ही हसीन हैं....👬👭👫🌹जन्नत मिले किसी को या ना मिले, ऐ खुदा
दोस्ती मिल जाये तो बेशक़ जिंदगी संवर जाऐ..


रक्ताची नाती तुम्हाला देव देतो,तर मैत्रीचे नाते तुम्हाला देवत्व देतो...
आज मैत्री दिन..एक असा दिवस जो रोज तुम्ही जगत असता,अनुभवत असता.
खरे तर मैत्री माझ्या श्वासात आहे..आणि मित्र माझ्या
ह्रुदयात आहेत.आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मित्र आपल्याशी जुळत जातात.बालपणीचे सवंगडी ते कॉलेज विश्व...वेगवेगळी वळणे आणि या वळणावर तुम्हाला हक्काची विश्रांती,हक्काची साथ सोबत देणारी असते ही मैत्री.

खांद्यावरचा हात असते मैत्री
पाठीवरची शाबासकीची थाप असते मैत्री

तसे मित्र तर खूप असतात प्रत्येकाला...
त्यातल्या त्यात काही मित्र असे असतात जे तुमच्या साठी तुमचे सर्वस्व असतात..तुमचा तो एक वेगळाच चमू असतो.
असेच आम्ही पाच जण...जणू एकमेकांचे आणि एकमेकांसाठी असलेले पंचप्राण...पंचधातूने तयार झालेलं एखादं भांड जसं देवाच्या पूजेत स्थान मिळवत अगदी तसं आमच्या या पाच जणांच्या मैत्रीने एकमेकांच्या हृदयातल्या देव्हाऱ्यात स्थान मिळवले आहे.

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।...

या उक्ती प्रमाणे आमच्या मैत्री ला अठ्ठावीस वर्षे पूर्ण झालीत.प्रेमाच्या अभंग विटेवर ती आजही तितक्याच ताकदीने उभी आहे...
हम पांच मध्ये, एक नावाप्रमाणेच "विशाल" अंतःकरण चा असा विशाल आहे..दुसरा सदा प्रफुल्लित...प्रफुल्ल आहे.तिसरा सदा हसतमुख सुहास आहे... चौथा मनाने अतिशय श्रीमंत असा हनुमंत आहे आणि लास्ट बट नॉट लीस्ट असा त्या सर्वांचा लाडका मित आडनावा ने ही लाड असलेला मी अमित आहे.
आम्ही सारे मूळचे बार्शी चेच...पण त्यातल्या चौघांना पंख आणि जबाबदाऱ्या पुण्यात घेवून गेले...
मी मात्र बार्शी ची नाळ घट्ट धरून ठेवली आहे...
खरे तर शब्दात वर्णन करावी इतकी संकुचित आमची मैत्री नाही...


शब्दांच्या पलीकडली आहे आमची मैत्री..
नात्याची नवी ओळख आहे आमची मैत्री..

एकमेकांचा अखंड श्वास आहे आमची मैत्री
परस्परांवरला अतूट विश्वास आहे आमची मैत्री
संकटातली खंबीर साथ आहे आमची मैत्री
सुखांच्या क्षणाची सौगात आहे आमची मैत्री...

महबूब यांनी लिहिलेले के के च्या आवाजातील हे गाणे आजही हृदयाचा ठाव घेते...


यारों दोस्ती बडी ही हसीन हैं...
ये ना हो तो क्या फिर,बोलो ये जिंदगी है ...


तेंव्हा मित्रांनो तुम्हीही तुमच्या मैत्रीचा हा अनमोल दागिना जपून ठेवा...त्याला आयुष्यभर जतन करा.
मरेपर्यंत इतरावी अशी ही मैत्री असते.

आजकालच्या या सोशल मीडिया आणि फेसबुक फ्रेेंडस च्या भाऊगर्दीत खऱ्या मैत्री ला नवसंजीवनी द्या... ती तुम्हाला जीवनात कधीच एकटं पडू देणार नाही.मन उदास झाले तर सरळ उठा आणि एक फोन करून आपल्या जवळच्या मित्रापुढे आपले मन मोकळे करा.मनाची घुसमट बिल्कुल होवू देवू नका..
मित्र अडचणीत असेल...वेळीच ओ द्या..सुशांत जसा शांत झाला....तसे तुमच्या कुठल्याच मित्राच्या बाबतीत होवू देवू नका.सोडून गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा सोबत असताना "विथ यू"
म्हणा. हे एक जरी वचन आजच्या या मैत्रीच्या दिनी आपण आपल्या स्वतः ला आणि आपल्या मैत्रीच्या नात्याला दिले तरी मी समजेन माझे आजचे लिहिणे सफल झाले

या मैत्री दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देवून माझीच एक मैत्रीची कविता तुमच्या सर्वांसाठी.....


🏝️ मैत्रीचे झाड. 🏝️


हे झाड चांदण्याचे
नाव ज्याचे आहे निखळ मैत्री
आभाळा एवढी माया ज्यात
जीवाला जीव देईल हि खात्री


हे झाड चंदनाचे
झिजले तरी देत राहते सुवास
रक्ताच्या नात्या पलीकडेही
जपला जातो मैत्रीचा हा प्रवास


हे झाड तारुण्याचे
नाही याला वयाची अट
बहरत जाते वर्षांनुवर्षे
वय सात असो वा साठ


हे झाड आनंदाचे
देते या जगण्याला बळ
ज्याच्या अंगणात हे बहरले
त्याचे जीवन झाले निर्मळ


हे झाड परीसाचे
करते आयुष्याचे ही सोने
मित्र नाही ज्याला कोणी
त्याचे आयुष्यच असते सूने


हे झाड जीवनाचे
नाही याला मोल पैशाचे
कृष्णालाही लाभले सख्य
सुदाम्याच्या निर्लेप मैत्रीचे


हे झाड वात्सल्याचे
सुखाचे नी समाधानाचे
मैत्रीसाठी ओवळतो जीव
औचित्य साधून मैत्री दिनाचे.डॉ अमित.
रविवार
२ ऑगस्ट २०२०.
25 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad