Bluepad | Bluepad
Bluepad
आशीर्वाद......एक ऊर्जा प्रेरणा देणारी.
डॉ अमित.
डॉ अमित.
1st Aug, 2020

Share

आशीर्वाद......एक ऊर्जा प्रेरणा देणारी.


मला जर कधी उदास वाटलं किंवा मन थोडे सैरभैर वाटले तर मी सरळ उठतो आणि आजीला भेटायला जातो.तिच्या जवळ गेलो की तेथे थोडा वेळ निवांत आजीशी गप्पा मारत बसतो.मी गेलो की ती म्हणते की किती दिवसांनी आलास.मला तुझी खूप आठवण येत होती.खरं तर मी ३ -४ दिवसांपूर्वीच तिला भेटलेलो असतो. तसे तिचं खरं वय नाही सांगता येणार पण अंदाजे ८५-८६ वर्षे असेल.वय मानानुसार ती बऱ्याच गोष्टी मधून मधून विसरते.खरं तर मी तिची चौकशी करायला गेलेलो असतो पण मग तीच माझी चौकशी सुरू करते.जेवतोस की नाही वेळेवर, नाष्टा करतोस की नाही. किती बारीक झाला वगैरे वगैरे.मग मधूनच मला म्हणते चल तुझ्या साठी चहा करते.मग माझ्या हॉस्पिटल ची चौकशी करते.पेशंट कसे आहेत हे विचारते.चांगले आहेत म्हटले की मग लगेच म्हणते भाग्यवान आहे अमित माझा. शर्विल,माझा मुलगा कितवी ला आहे?तो कसा हुशार आहे हे तीच मला सांगते.
मग थोड्या थोड्या वेळाने हेच प्रश्न पुन्हा पुन्हा कमीत कमी ४ ते ५ वेळेस तरी विचारते.मी ही तिला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुन्हा परत नव्याने देतो जसे की तिने मला पहिल्यांदाच प्रश्न विचारला आहे असे.
तिच्या शी बोलता बोलता मन कधी हलके फुलके झाले माझे मलाही कळत नाही.तिच्या हातचा चहा माझ्या साठी म्हणजे खरंच साक्षात अमृततुल्य.खूप छान आणि खूप पटकन करते ती चहा. तिच्याशी बोलता बोलता ती सहजच आशिर्वादाचे चार शब्द अधून मधून उच्चारत राहते.
तिच्या ह्या शब्दांनी मनाला स्फुरण चढते.मन आकाशात उंच भरारी घेते.खरंच किती पोझिटिव्ह ऊर्जा मिळते तिच्या सोबत बोलल्यावर,तिच्या सहवासात हे मी तुम्हाला शब्दात नाही वर्णन करू शकतं.


मी आणि माझी आजी हे नातं
एक वेगळंच समीकरण
तिचा आशिष माझ्या माथ्यावर
मला देत राहते जीवनात स्फुरणं


खूप थकली आहे वयानुसार ती पण अजूनही स्वतःची सर्व कामे स्वतः करते.खूप माया प्रेम करते ती माझ्यावर नि आमच्या सर्वांवर.
मी ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की तिला उदंड आयुष्य लाभो.ती नेहमी अशीच उर्जित,निरोगी,आनंदी नि चैतन्यमय राहो.


मला वाटतं खरंच थोरामोठ्यांचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात खूप गरजेचा असतो.आज कालच्या धकाधकीच्या जीवनात तसेच विभक्त कुटुंब पद्धतीत हे प्रमाण कमी होत चाललंय.पण आपण आपल्या घरातील या ज्येष्ठांना सन्मानाने नि प्रेमाने वागविले पाहिजे.त्यांची या उतारवयात योग्य ती काळजी घेतली पाहिजे.त्यांना आणि आपल्यालाही त्यांचे वृद्धत्व ओझं न वाटता आधारस्तंभ वाटलं पाहिजे.हेच गुण मग आपल्या मुलांत नि पुढच्या पिढीत संक्रमित झाले की मग या जगातील वृध्दाश्रम ही संकल्पनाच हळू हळू नष्ट होईल.आपले घरचं हे आनंदाश्रम होईल.जिथे प्रेम्, नाती आणि ईश्वर रूपाने आपली वयोवृद्ध ज्येष्ठ माणसं प्रेमाने,आनंदाने नांदतील.


ज्येष्ठ या शब्दाची मी सुंदर अशी फोड करू इच्छितो की,
"ज्यांच्या रूपाने ईश्वर आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी ही श्रेष्ठ" मंडळी.
या सर्वांना साष्टांग प्रणाम.


ईश्वर नि निसर्ग यांचा सुंदर
असा मिलाप असतात श्रेष्ठ
वय वाढलेली अनुभवाने सिद्ध
आपलचं भविष्य असतात ज्येष्ठ


डॉ अमित.
29 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad