Bluepadएक था टायगर....नव्हे. 🐅 टाइगर ..जिंदा है.
Bluepad

एक था टायगर....नव्हे. 🐅 टाइगर ..जिंदा है.

डॉ अमित.
डॉ अमित.
29th Jul, 2020

Share

एक था टायगर....नव्हे. 🐅 टाइगर ..जिंदा है.


छोट्या दोस्तांनो,तुम्हाला माहीत आहे का की आज २९ जुलै ...."जागतिक वाघ दिवस" म्हणजेच World Tiger Day आहे.
तसे पाहिले तर आपली आणि वाघाची ओळख लहान असतानाच करून दिलेली असते... चित्रं रुपी पुस्तकांतून, खेळण्यांतून,प्राणी संग्रहालयातून, सर्कशीतून आणि हो वाघांच्या छान छान अश्या गोष्टींतून.असा लहानपणा पासून आपल्याशी ओळख झालेला वाघ....आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
असे म्हणतात की विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लाख भर असलेले वाघ ब्रिटिश काळात अवघे चाळीस हजार झाले आणि एकविसाव्या शतकात तर ते जवळपास फक्त दीड हजार पर्यंत कमी झाले होते.
पण सरकारने यात जातीने लक्ष घालून,खूप सारी व्याघ्र प्रकल्पे उभा करून,शिकारीवर नियंत्रण आणून,जंगलांचे संवर्धन करून आणि सगळ्यात महत्वाचे वन्य जीव संरक्षण कायदा करून वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली..शेवटच्या व्याघ्रगणने नुसार जवळपास चार हजार वाघ संपूर्ण जगात अस्तित्वात असल्याचे कळते.त्यातील सत्तर टक्के वाघ म्हणजे जवळ जवळ तीन हजार वाघ फक्त भारतातच आहेत.

‌ तुम्हाला आज मी वाघांबद्दल काही रोचक आणि मजेशीर माहिती देणार आहे...
वाघ हा मार्जार कुळातील सर्वात मोठा आणि शक्तिशाली असा हिंस्त्रक पशू आहे.त्याच्या अंगावर जे पट्टे असतात ते प्रत्येक वाघांवर वेगवेगळ्या धाटणीचे असतात.जसे माणसांचे हाताचे ठसे वेगवेगळे अगदी तसे.साधारणतः शंभर च्या आसपास पट्टे त्याच्या अंगावर असतात.त्यावरून अभ्यासू लोक वाघ ओळखू शकतात.वाघ घनदाट अश्या जंगलात राहणे पसंद करतात. वाघिणीची गर्भधारणा ४महिने असते व एका वेळी ३ ते ४ छोट्या पिल्लांना ती जन्म देते.जन्मल्यानंतर वाघांची पिल्ले खूप छोटी आणि आंधळी असतात..हळू हळू त्यांना दृष्टी येत जाते.सहा महिने ते दीड वर्षां पर्यंत ते हळू हळू स्वतः शिकार करण्या इतपत सक्षम होतात आणि मग आपल्या आई पासून वेगळे वास्तव्य करून राहतात.सहसा ते महिन्यातून तीन ते चार वेळेस शिकार करतात.आणि हो आपली शिकार कोणी चोरून नेवू नये म्हणून ती ते दाट झाडीत अथवा गुहेत लपवून ठेवतात आणि आठवडा भर ती खात राहतात.शिकार खाताना ते मेलेल्या जनावरांची आतडी काढून टाकून देतात व फक्त मांसल भाग खाणे त्यांना जास्त आवडते...
ते माकडांची शिकार तर खूप मजेशीर पद्धतीने करतात.ज्या झाडावर माकडे आहेत त्या झाडाजवळ जावून जोरात डरकाळी फोडतात.त्या आवाजाच्या भीतीने एकतर माकडांचे हृदय बंद पडून किंवा घाबरून ते खाली पडतात.तुम्हाला माहीत आहे का की वाघाची डरकाळी तीन किमी लांब पर्यंत ऐकू येवू शकते.
वाघ जंगलात आपला वस्तीचा एरिया ठरवण्यासाठी झाडावर लघवी करून त्यांवर खूण करतात. आपल्या मुत्राने वा ग्रंथी स्त्रावाने ते आपला एरिया ठरवतात. सहसा ते दुसऱ्या नर वाघांना आपल्या एरियात प्रवेश करू देत नाहीत...
साधारणतः एक वाघ २० ते २५ वर्षांपर्यंत जगतो.त्याची लांबी २५० ते ३०० सेमी असते तर त्यांचे वजन २५० ते ३०० किलो पर्यंत असते...त्यांचा धावण्याचा वेग ताशी ६५ किमी इतका असतो.त्याची एक ढांग पाच ते सहा मीटर इतकी लांब पडू शकते.
वाघांचा जबडा आणि त्याचे पंजे सर्वात जास्त शक्तिशाली असतात.वाघांना पाण्यात पोहण्यास खूप आवडते.असा हा पट्टे पट्टे असलेला वाघ एकदम पट्टीचा पोहणारा असतो बरका.अजुन एक मजेची गोष्ट म्हणजे संस्कृत मध्ये वाघ हा शब्द पाणी या शब्दा वरून तयार झाला आहे...
पँथेरा टायग्रीस...या इंग्रजी जातकुळीतला हा मांसभक्षक प्राणी आहे.त्याच्या ७ ते ८ प्रजाती आहेत... बाली, जावा,सुमात्रा, सायबेरियन,कॅस्पियन,भारतीय बंगाल टायगर्स असे.
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे...
तो शौर्य, साहस,शक्ती आणि राजबिंडेपणा याचे प्रतीक आहे...
पुरातन काळातही महिषासुर मर्दिनी रूपातील पार्वती देवीचे वाघ हे वाहन होते.
निसर्गाच्या अन्नसाखळी मध्ये वाघ खूप महत्वाची आणि टोकाची भूमिका बजावतात. जीवो जीवस्य जीवनम...या उक्तीप्रमाणे तृणभक्षक प्राण्यांची शिकार करून ते जंगलाचे संवर्धन करतात.
अजुन एक अतिशय रंजक माहिती ती अशी की थायलंड बर्मा सीमेवर कंचनबुरी येथे
"टाइगर टेंपल" आहे. एक बौद्ध मठात येथील भिक्षू सोबत जवळपास १४० बंगाल टायगर्स माणसाळलेल्या अवस्थेत आनंदात राहतात.येथे खूप पर्यटक या अनोख्या टाइगर टेम्पल ला भेट देण्यासाठी आवर्जून येतात.ते त्यांच्या सोबत फोटोही काढतात.या टेम्पल ची खासियत ही की येथे अनाथ वाघांची पिल्ले आणून त्यांचा सांभाळ केला जातो.यांना लहानपणापासूनच माणसा संगे राहण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.

वाघ हा आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लोगोमध्ये आहे..ज्याचे चित्र आपल्या सर्व चलनी नोटांवर असते.
आपल्या भारतात जिम कॉर्बेट,कान्हा, मानस, बंदिपुर,ताडोबा,रणथंबोर,मेळघाट,सुंदरबन,
पेरियार असे बरेच व्याघ्रप्रकल्प प्रसिध्द आहेत.

नर टाइगर आणि मादी लायन यांच्या मिलनातून तयार होणाऱ्या वाघाला 'टायगन' असे म्हणतात तर मादी वाघ आणि नर सिंह यांच्या मिलनातून तयार होणाऱ्या वाघाला 'लायगर' असे म्हणतात.

वाघांची कातडी,वाघनखे आणि त्याची हाडे या साठी होणारी शिकार यामुळे वाघ हळू हळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत...त्यांचे संवर्धन करणे खूप गरजेचे आहे. सेव द टायगर्स या मोहिमअंतर्गत आपण या नामशेष होणाऱ्या वाघाला जपले पाहिजे. तरच आपण अभिमानाने म्हणू शकू 🐅 टाइगर जिंदा है....नाहीतर मग आपल्या सर्वांना आपल्या पुढच्या पिढीला
" एक था टायगर " असेच म्हणावे लागेल.

तर छोट्या दोस्तांनो,कशी वाटली तुम्हाला आपल्या लाडक्या वाघोबाची ही रोचक माहिती?
आवडली ना?


डॉ अमित.
२९ जुलै २०२०
बुधवार
जागतिक वाघ दिन विशेष.

23 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad