Bluepadसिंहगड.....वीरता आणि शौर्य याची साक्ष देणारा गड
Bluepad

सिंहगड.....वीरता आणि शौर्य याची साक्ष देणारा गड

डॉ अमित.
डॉ अमित.
26th Jul, 2020

Share

सिंहगड.....वीरता आणि शौर्य याची साक्ष देणारा गड


सिंहाची उपमा मिळाली ज्याला..
वीर तानाजी जिथे शहीद झाला
गड कोंढाण्याचा इतिहास बदलला
सिंहगड असे नाव मिळाले तयाला...


कसं असतं ना काही काही ठिकाणी जाण्याचाही योग यावा लागतो असे म्हणतात ....
तसे 'सिंहगड' पुण्यापासून अगदी जवळ. हाकेच्याच अंतरावर म्हणा ना.....
किती तरी वेळा पुणे येथे कामा निमित्त जाणे होत होते...
पण सिंहगड जाण्याचा योग काल आला आणि तो ही प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर...दुग्ध शर्करा योगच जणू माझ्यासाठी....
तानाजी मालुसरे आणि कोंढाणा यांच्या शोर्याचा इतिहास वाचून माहीत होता....तो पुन्हा नव्याने उजळून निघाला 'तान्हाजी' या चित्रपटामुळे...मी तो अजुन पाहिला नव्हता...पण तो चित्रपट पाहण्यापूर्वी त्या पवित्र आणि शोर्याची गाथा सांगणाऱ्या गडावर जाऊन शूरवीर तान्हाजी ना प्रथम वंदन करावे आणि मगचं तो चित्रपट पाहावा हा कौल मनाने दिला...मग काय...उत्साह अंगात जणू मी म्हणू लागला....
शिवनेरी नंतर गड भेटीचा हा लवकरच आलेला कालचा योग...आम्ही अक्षरशः..मनाच्या संदुकीत अलवार जतन केला...
तसे गाडी गडाच्या पायथ्याशी जाते पण गड पाहावा तो चढूनच...या विश्वासाने आम्ही भल्या पहाटे.....पाच वाजता....निघायचे असे ठरवून...निदान सहाच्या ठोक्याला....घरा बाहेर पडलो...( ठरवलं त्यापेक्षा फक्त एकच तास उशीर. आमच्या चमूत दोन स्त्रिया असूनही😃😃 बाकी तुम्ही सुज्ञ आहातच. ) साधारणतः एक तासात गडाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो...
गडाच्या पायथ्याशी मनोमन माथा टेकवून आम्ही गडावर मार्गक्रमण सुरू केले...आमची चढताना होणारी थोडी थोडी दमछाक आम्हाला मावळ्यांनी अष्टमी च्या रात्री केलेल्या पराक्रमाला वारंवार स्मरायला लावत होती...आणि आमचा उत्साह वाढवीत होती...वाटेत आम्ही लिंबू शरबत, ताक आणि गावरान रानमेवा जसे पेरू ,अननस,ओल्या शेंगा,कैरी.....अश्या पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेतला...
साधारणतः दीड तास लागला आम्हाला सर्वांना गडावर पोहोचायला...गडाच्या दरवाजावर हाती शिवरायांचा भगवा घेवून(आमच्या जवळ तो नव्हता पण एका शिवभक्ताकडून फोटो पुरता तो मी मागून घेतला) आम्ही सिंहगडाला पदस्पर्श केला...तानाजी मालुसरे यांच्या समाधी समोर नतमस्तक होवून कोंढाणेश्वर मंदिराचे दर्शन घेतले आणि किल्लेभ्रमंती पुढे सुरू ठेवली...छत्रपती राजाराम महाराजांची समाधी...टिळकांची स्मृती भवन वास्तू आणि चोहो बाजूला खोलवर उतरत गेलेली दरी(४४०० फूट समुद्र सपाटी पासून उंचीचा)... कोंढाण्या चे भव्य रूप जीव तोडून सांगत होते....
ठीक ठिकाणी लिहिलेले भित्ती लेख,मावळ्यांचे पुतळे आणि शोर्याची गाथा घडवणार्या मर्द मराठा सुभेदार तान्हाजी यांचा अर्धाकृती पुतळा आमची इतिहासाची उजळणीच घेत होते...काही त्यात नव्या माहितीची भर टाकत होते... सारा इतिहास आमच्या नजरें समोर जणू उभा करत होते...
गड पाहून मन,डोळे,आत्मा अगदी तृप्तं झाले होते..(पोट मात्र त्याच्या अस्तित्वाची खूण काव काव ने करून देऊ लागले..)
गडावर आम्हाला लागलेली भूक शमवण्यासाठी..पोटातल्या कावळ्यांना शांत करण्यासाठी जेवणाची उत्तम अशी सोय होती....पिठले भाकरी...वांग्याचे चुली वरचे भरीत...मातीच्या भांड्यात लावलेले घट्ट असे दही आणि गरमा गरम कांदा भजी...क्या बात है...
पंचपक्वानालाही लाजवेल असा मेनू..
सोबतीला असलेला छान वारा...आमच्या भुकेचा अग्नी हवा घालून आणखीनच प्रज्वलित करीत होता... या अप्रतिम जेवणावर आम्ही सर्वांनी आडवा हात मारून उभा गड उतरायचा प्रवास आरंभ केला... न थांबता न थकता आम्ही फक्त एका तासात गड उतरून आमचाच विक्रम( चढायला लागलेला वेळ दीड तासाचा) मोडला...
सुदैवाने गड चढता उतरताना इतर कशाचीही...मोडतोड झाली नाही...😂😂.(हा विक्रम सोडून)

अश्या तर्हेने आम्हा गडकर्यांना सिंहगड वरून परत आल्यावरही त्याचे भव्य रूप आणि तिथल्या पराक्रमाची गाथा स्वस्थ बसू देईना...मग आम्ही तान्हाजी या चित्रपटाला ३ D मध्ये बघायला डेक्कन च्या मल्टिप्लेक्स ला गेलो... सिंहगडाच्या चढाई ने सुरू केलेला आमचा आजचा दिवस तान्हाजी यांचा रुपेरी पडद्यावरचा भव्य चित्रपट पाहून संपला...

हा मर्द मराठा रांगडा तानाजी
अष्टमीच्या रातीला दो हजार फौजविरुद्ध...
संगतीला घेवून पाचशे मावळा फक्त...
जीवाच्या आकांताने कसा लढला
नाव दिले सिंहगड कोंढाण्याला हो जी जी....


सोडूनी दिले रायबा मुलाचे लगीन...
आधी लगीन कोंढाण्याचे केला हा पण
उदयभान राजपूत याला चीत करुन
पणाला लावले आयुष्य शिवबाला नमून
स्वतःचे प्राण अर्पूण मिळवला गड हो जी जी...


गड आला पण माझा सिंह गेला
शिवबा बोलले जेंव्हा कोंढाणा जिंकला
नाही तोड तान्हाजी च्या या शौर्य गाथेला
वर्षोंवर्षे राहील स्मरणांत प्रत्येकाला
इतिहासाचा हा अद्भुत सिंहगड हो जी जी ....
असा हा शोर्यतेचा आणि वीरतेचा प्रतीक असलेला सिंहगड मी माझ्या परीने लहान तोंडी मोठा घास घेऊन शब्दबध्दं करण्याचा छोटासां प्रामाणिक प्रयत्न करून तान्हाजी या योध्याला शब्दसुमनांजली अर्पण केली आहे....

जय भवानी....जय शिवाजी...जय तानाजी.....डॉ अमित.

19 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad