Bluepadइंडियन मॅचमेकिंग - कुर्यात सदा मंगलम्
Bluepad

इंडियन मॅचमेकिंग - कुर्यात सदा मंगलम्

Tanaya Godbole
Tanaya Godbole
25th Jul, 2020

Shareभारतीयांना असलेलं पाश्चात्यांचं आकर्षण काही नवीन नाही; मग ते खाण्यापिण्याशी, पेहरावाशी संबंधित असू दे की टीव्ही मालिकांशी. इंडियन आयडल ते बिग बॉस हे सगळे असेच पाश्चात्यांच्या मनोरंजनाचे भारतीय अवतार. असाच एक “मिलियनेअर मॅचमेकिंग” नावाचा “रियालिटि शो” अमेरिकेच्या “ब्रावो” ह्या वाहिनीवर २००८ साली रुजू झाला होता. पॅट्रेशिया उर्फ पॅटी स्टँगर नावाची “मिलियनेअर क्लब” ही डेटिंग साइट चालवणारी महिला या कार्यक्रमाची मॅचमेकर होती. करोडपती धनवतांना अनुरूप “पार्टनर” मिळवून देण्याचं काम पॅटी ह्या शोच्या माध्यमातून करायची. ह्या शोचं वेड इतकं जास्त होतं की २०१५ पर्यन्त त्याचे एकूण ८ सीझन झाले. इतक्या “पॉप्युलर शो”चं बाळ भारतात यायचं कसं राहील? ते आलं “इंडियन मॅचमेकिंग” ह्या नावाने नेटफ्लिक्स ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर. अमेरिकेतल्याप्रमाणे “पार्टनर” तर नाही पण लग्नासाठी “वधू - वर” संशोधन हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तेच ह्या मालिकेतून निकोपपणे समोर येईल असं वाटलं होतं पण झालं उलटं. यातले गुण दोष हे प्रेक्षकसापेक्ष असले तरी ते नेमके काय आहेत ते बघायला तर पाहिजेतच.

“इंडियन मॅचमेकिंग” असं नाव धरण केलेल्या ह्या “रियालिटि शो”चा उद्देश फक्त मुंबईतील तेही “सोबो” असं निकनेम असलेल्या दक्षिण मुंबई ह्या लहान परिघातील धनदांडग्यांच्या मुलांना बोहल्यापर्यन्त पोहोचवण्याचाच आहे. “सोबो” म्हणजे संपूर्ण “इंडिया” आणि “भारत” म्हणजे तर त्यांच्या लेखी “ओहह वाव, सुपर्ब!” म्हणण्यासाठीची “असलेली” व्यवस्था. यातील मॅचमेकर म्हणजेच मध्यस्थ आहे सीमा तपारीया. ही स्वत:ला “मुंबईची नंबर वन मॅचमेकर” म्हणते. ह्या दोन बाबींमध्ये सामान्य भारतीय किंवा मुंबईकर मोडत नाहीत. त्यामुळे त्यांना ह्या मालिकेविषयी ममत्व असेलच हे नक्की सांगता येत नाही. “सोबो सर्कल”मध्ये मात्र याची मोठी क्रेझ आहे आणि त्यांनीच ह्या कार्यक्रमावर उड्याही मारल्यात आणि “कुर्यात सदा टिंगलम्”ही म्हटलं आहे.

या कार्यक्रमावर ज्या मुद्द्यावर टीका होते आहे ते म्हणजे वधू आणि वर यांना बाजारात विकायला आणलेल्या वस्तुप्रमाणे उभं केलं जाणं. मुला मुलींचे रंग, जात पात, धर्म, रीतिरिवाज, त्यांचे लैंगिक कल या सगळ्यांचा पडताळा घेऊन मध्यस्थ जोड्या लावतात. ह्या मध्यस्थांची सुद्धा अनेकदा कुचंबणा होते. मालिकेत दाखवल्याप्रमाणे मुलांचे पालक विशेष करून आया जेंव्हा आपल्यासाठी सून बघण्यासाठी सीमाकडे जातात तेंव्हा त्या “सून कशी स्लीम, ट्रिम, सुशिक्षित असली पाहिजे, तिने तडजोड केली पाहिजे, जुळवून घेतलं पाहिजे.” आणि जेंव्हा मुलींचे पालक जावईशोधासाठी सीमाकडे येतात तेंव्हा ते “मुलगा नुसता मिळवता नाही तर त्याचा स्वत:चा बँक बॅलेन्स तगडा असायला हवा. तो आईच्या पदराआड लपणारा नसावा. मनमिळावू हवा. सेन्स ह्युमर चांगला हवा.” ह्या सर्व अपेक्षा ह्या कालांतराने माणसात विकसित होत असतात किंवा त्या व्यक्तीसापेक्ष असतात. पण आपल्या पालकांना पहिल्या भेटीतच असे सर्वगुणसंपन्न वधू-वर हवे असतात आणि त्यासाठी ते त्या मध्यस्थाकडे तगादा लावत असतात. ह्यामध्ये मुलामुलींची आपली एक वेगळी पसंत असते. त्यांची वेवलेंथ जुळावी लागते, मतं आणि प्राथमिकता जुळाव्या लागतात. हे सर्व नाही जुळलं तर जुळून आलेलं लग्न मोडतं. बरं हे सगळं जमून आलं तरी मग पत्रिका जुळावी लागते. कारण “कल्चर” बदलतं ते पैशाने; संस्कृती मात्र परंपरेला लगडून राहिली तर ती तशीच जुनाट जळमटं घेऊन टिकून राहते. ह्या सर्व गोंधळात लग्नाची बोलणी पुढे सरकत नाहीत. यामुळेच ह्या संपूर्ण मालिकेत “नंबर वन” म्हणवून घेणारी सीमा आंटी एकही लग्न जुळवू शकलेली नाही.

आपल्या मुलांच्या भवितव्यावर गरजेपेक्षा जास्त हक्क सांगणार्‍या भारतीय पालकांच्या मानसिकतेची ही खरी बाजू मालिका दाखवत असली तरी काही लोक आपल्या देशाची नाचक्की संपूर्ण जगात करणारी ही मालिका आहे असं म्हणून तिच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. पण त्यांच्या आसपास जेंव्हा अशाप्रकारे लग्न जमवण्याचे किंवा मोडण्याचे प्रकार होतात तेंव्हा ते त्याला किती विरोध करतात? चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसते तशी सुस्वरूप माझी सून असावी असं त्या वरमाईंना वाटतं हे टाळण्यासाठी ह्या लोकांनी मालिकांवर कधी टीका केली आहे का? “गोरी बायको हवी” अशा जाहिरातींवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर टीका का करत नाहीत? मुलाकडे पैसा असावा असं जर मुलीला वाटत असेल तर त्यात गैर काय? उलट नंतर गरजा पूर्ण करू शकला नाही म्हणून नवर्‍याला सोडून देणार्‍या बायकोपेक्षा या मालिकेतील आधीच आपली मागणी सांगणारी “अपर्णा” जास्त उजवी वाटते.

ह्या मालिकेत दाखवलेल्या गोष्टी आपल्या समाजाच्या एका छोट्या तुकड्याशी संबंधित असल्या तरी इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पाणी वरून खाली वाहतं. परंपरा पण तशीच असते. अशीच वधू पाहिजे आणि तसाच वर पाहिजे असं जर म्हटलं तर सर्वच थरातील ७५ टक्के लोकांची लग्न होणार नाहीत. त्याचं प्रतिबिंब ह्या मालिकेत सुद्धा दिसतं. १५० मुलींना बघून सुद्धा एकही मुलगी पसंत न केलेला ‘प्रद्युम्न’ शंभरात एखादा असतोच. कोणीच मिस्टर पर्फेक्शनिस्ट नसतं. आपण तसे आहोत का याचा सुद्धा आधी विचार करावा.
याशिवाय या मालिकेने निव्वळ लग्न जुळवण्यात येणार्‍या अडचणी सांगितल्या आहेत. पण यात हुंडा जो आजही श्रीमंतांच्या लग्नात दिला घेतला जातो, बिग फॅट वेडिंगमध्ये अन्न पाण्याची उधळण आणि नाश होतो, जात पात धर्म, परंपरा ह्या टोकाला जाऊन पाळल्या जातात, कुंडली, ग्रह तारे यांचं स्तोम माजवून नको नको त्या पुजा, उपास तापास, गंडे दोरे घातले जातात यावरही काही वक्तव्य नाही. लग्न ही अत्यंत वैयक्तिक बाब असते पण अनेक बाबतीत समाजमान्यता देणारं हे एक “दिखाऊ”, पण माध्यम असतं. त्याला कोणत्याही कलेत बांधा, टीका ही होणारच. पण निर्मात्यांनीही कलेला सर्वसमावेशक करण्याचे साधे संकेत पाळले तरच “कुर्यात सदा मंगलम्” म्हणता येईल. नाहीतर त्यातून समाज प्रबोधन न होता ती निव्वळ आणखी एक “मालिका” बनून राहील.

13 

Share


Tanaya Godbole
Written by
Tanaya Godbole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad