Bluepad | Bluepad
Bluepad
माती.....महती......आणि प्रगती.
डॉ अमित.
डॉ अमित.
24th Jul, 2020

Share

आज ५ डिसेंबर जागतिक माती दिवस....या दिवसाच्या निमित्ताने माझा या पूर्वी लिहिलेला माती विषयी चा लेख पुन्हा प्रकाशित करत आहे.... नि ...मृदा...या मातेसम मृदू कोमल नि मुलायम मातीस माझं वंदन समर्पित करत आहे...🙏
माती.....महती.........आणि प्रगती.
जन्म जाहला मातीतून..
अंत या मातीतच होणार...
महती तिची काय वर्णावी
माते सम ती पोटातच घेणार....
आज काल मातीचा आणि आपला स्पर्श जणू दुर्मिळ होत चालला आहे... खास करून जे शहरात राहत आहेत त्यांचा.
पण जे खेड्यात,गावी राहतात...ज्यांचा मूळ व्यवसाय शेती हाच आहे...त्यांचा मात्र अजूनही मातीशी एक वेगळाच ऋणानुबंध जोडला गेलेला आहे...हाच बंध त्यांची नाळ अजूनही मातीशी जोडून ठेवतो....
पूर्वी कसे आपण लहान असताना पाहिजे तसे मातीत खेळत असायचो....मातीत लोळत असायचो( कधी कधी मित्रांना लोळवतं असायचो.. आणि त्या नंतर आईच्या हातचा पाठीत धपाटा मिळायचा आणि त्याचा चांगलाच वळ उमटायचा तो भाग वेगळा...😀😀) पण तो आनंद अक्षरशः अवर्णनीय असायचा.आपली मुले मात्र आजकाल मातीत खेळणं जणू विसरत चालली आहेत..
शिवाय मातीची खेळणी बनवायचो...शाळेत हस्तकलेच्या परीक्षांना आपल्याला तसे प्रोजेक्ट पण मिळायचे..धमाल मजा यायची.शक्य तेवढे निसर्गाच्या जवळ राहायचो आपण...
विज्ञानाने,आयुर्वेदाने देखील हेचं तर सांगितले आहे की मातीत बरीच खनिजे असतात...क्षार असतात जे तुमचे शरीर शुध्द करण्यास मदत करतात.बरेच त्वचेचे आजार दूर करून तुमची त्वचा तेजस्वी,सतेज होण्यास ती मदत करतात...यातूनच पुढे आली मड थेरपी....मड बाथ..मड फेस पॅक..जी तुमचे मुड सुधरण्यापासून ते शरीरातील बरीच टॉक्सीन्स..विष द्रव्ये शरीराबाहेर घालवण्यास मदत करतात.सांधेदुखी,अकारण येणारा स्थूलपणा,शरीरातील अनावश्यक उष्णता कमी करते. काही प्रकारची डोकेदुखी कमी करण्यास मदत करते.तुम्हाला आतून ' शीतल'तेचा अनुभव देते.तुमची पचनशक्ती सुधारते, न बऱ्या होणाऱ्या काही जख्माही ही बरी करू शकते.काही प्रकारच्या मातीत जंतू विरोधी लढण्याची प्रतिजैविक क्षमताही असते.
या सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या पावसानंतर येणारा,मन मोहणारा मातीचा गंध- मृदगंध हा नक्कीच आपल्या सर्वांना मोहित करत असतो.
ओल्या मातीचा सुगंध हा ओला
बरसती जेंव्हा या ओल्या धारा
दरवळतो चोहीकडे मंद मृदगंध
भारून टाकतो निसर्गाचा देव्हारा
इतकी या मातीची महती असताना आपण मात्र तिच्या पासून दूर चाललो आहोत...
सद्गुरू म्हणतात कमीत कमी दर दोन ते तीन दिवसांनी अथवा कमीत कमी आठवड्यातून दोन वेळा तुम्हाला मातीचा स्पर्श होवू द्या...भले तुम्ही शेती करत नसाल...तुमच्या घराच्या बागेमध्ये काही वेळ अनवाणी काम करा...छान छान झाडे लावा...त्यांची देखभाल करा.सोबत आपल्या मुलांनाही घ्या.. नाहीतर आपल्या परिसरातील अनावश्यक वाढलेले गवत काढा...श्रमदान तर होईलच शिवाय त्या निमित्ताने तुमच्या शरीराला मातीचा स्पर्श होईल.
तुमच्या मुलांनाही मातीत खेळण्या पासून अडवू नका..जास्तीत जास्त काय कपडे खराब होतील(१० रुपये वाला सर्फ एक्सेल आहेच की..सगळे डाग काढायला😀😀 तो कधी उपयोगाला येणार म्हणा.)
ज्यांना हे सगळे थोडे ऑर्थोडॉक्स वाटतं असेल त्यांनी...याचेच वेगळे रूप..मड थेरपीचा अनुभव घ्या.पण कुठल्या ना कुठल्या रूपाने मातीशी जोडलेले रहा.कारण हीच माती तुमची मती ठिकाणावर राहण्यास ही मदत करेल.. म्हणजे काय की ही तुम्हाला नेहमी " डाऊन टू अर्थ" ठेवेल.
माते सम आहे ती ही माती...
नाळ जोडली राहू द्या तिच्या संगती.
🌲 झाड जेवढे जास्त आत खोलवर आपली मुळे मातीत वाढवते तितके ते अधिक वर उंच होत जाते... जणू त्याची ती प्रगतीचं होत असते. जीवनात कितीही मोठी झेप आपण घेत असलो तरी आपले पाय जमिनीवर राहिले,या मातीच्या संपर्कात राहिले तरचं प्रगतीची हवा आपल्या डोक्यात जाणार नाही...नाही तर मग एकदा का ही हवा डोक्यात गेली तर अधोगती व्हायलाही वेळ लागणार नाही.
म्हणूनच मी म्हणतो,
या मातीचा टिळा लावूनी भाळी
झेप घे उत्तुंग अशी तू आभाळी...
देईल ही तुझ्या आयुष्याला नवी झळाळी
हीच तर खासियत तिची आहे जरी काळी.
डॉ अमित.
५ डिसेंबर
शनिवार
जागतिक माती दिवस.

63 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad