Bluepadभारताच्या डिजिटायजेशनसाठी गूगल - जिओ जोडी सज्ज
Bluepad

भारताच्या डिजिटायजेशनसाठी गूगल - जिओ जोडी सज्ज

P
Poorva Shelar
20th Jul, 2020

Shareकाही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आत्मनिर्भर भारत”चा नारा दिला आणि सर्व थरातून त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. हे आत्मनिर्भर होण्यामागचं कारण चीनी वस्तूंना अटकाव करणं हे सुद्धा होतं आणि आहेच. आपण अनेक वस्तू, खास करून सर्व इलेक्ट्रॉनिक्सच्या विदेशी किंबहुना चीनी वस्तू वापरत आलो आहोत. त्यामुळे “आत्मनिर्भरते”चा नारा ऐकू आल्यावर आपल्या देशात आता या सर्व वस्तूंना पर्याय उभे करण्यासाठी उद्योग उभे राहतील अशी एक आशेची लाट उफाळून आली. आणि ती काही गैर नव्हती. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशी हाक ऐकू येत होती. तेंव्हा “स्वावलंबन” हा शब्द होता इतकंच. पण प्रत्येक वेळी आपले सरकार असले जे नारे देते त्यावेळी त्यांच्याकडे कोणतेही पर्याय उपलब्ध नसतात. एका रात्रीत कोणी आत्मनिर्भर होत नाही. उलट पंतप्रधानच लोकांना आवाहन करून सांगतात की तुमच्याकडे काही संकल्पना असतील त्या समोर आणा. लोक आपल्या संकल्पना समोर आणतीलही पण काही मोठ्या कंपन्यांच्या मोठ्या परदेशी कंपन्यांशी केलेल्या करारामुळे इथले तरुण उत्साही लोकही संभ्रमात पडतात की खरंच आपण आत्मनिर्भर होणार आहोत की अजूनही परदेशी वस्तू आणि सेवांचं भूत आपल्या मानगुटीवर बसून आहे. ह्या महान कंपन्या पंतप्रधानांनी दिलेल्या नार्‍याला धाब्यावर बसवून बिनदिक्कत परदेशी कंपन्यांशी करार मदार करतात आणि आत्मनिर्भर होऊ पाहणार्‍या भारतीयांच्या आधीच फुकट किंवा स्वस्त वस्तूंच्या हव्यासाला आणखी मजबूत करतात. आपल्या देशातील लोकांना मागचं पुढचं न पाहता स्वस्त वस्तू घेण्याची सवय ही परदेशी कंपन्यांच्या पथ्यावर पडते. चीनी कंपन्यांनी तेच केलं. आणि भारतात रिलायन्स समूह नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यांनी यासाठी दुसर्‍या तिसर्‍या कुणाशी नाही तर थेट गूगलशी संधान बांधलं आहे आणि गूगलला सुंदर पिचाई यांच्यामुळे “देशी” टच असल्यामुळे अनेकांना गूगल आधीच “आपलासा” वाटतो.

तशी पंतप्रधानांनीच गूगलला भारतात डिजिटायजेशनसाठी दरवाजे उघडले होते. भारताला डिजिटल साक्षर आणि स्वावलंबी करायचं तर अशा मोठा विस्तार असलेल्या कंपनीसाठी पायघड्या घालणं ओघाने आलं. डिजिटायजेशन म्हणजे माहिती मिळवणं, ती देणं, संपर्क करणं, अॅडमिशन, बिल भरणं, ऑनलाइन शिक्षण, अन्न धन्य, भाज्या, फळे, अत्यावश्यक आणि लक्झरीच्या वस्तू घरपोच देणारी सेवा, ग्राहक आणि विक्रेते, वितरक यात समन्वय साधणं, आरोग्याशी संबंधित माहिती देणं, फोटो विडियो शेअर करणं, शेतकर्‍यांना खते, बियाणे यांची माहिती आणि वातावरणाची पूर्वसूचना देणं, नकाशे, जीपीएस अशा सर्व सेवा लोकांना हातावरच्या मोबाइलमध्ये असल्या तर प्रत्येक भारतीयाचं आयुष्य सुखकर होईल अशी त्यामागची अपेक्षा. या सगळ्यासाठी लोकांना आवश्यक डेटा पुरवणं आवश्यक आहे. यासाठी गूगलने १३ जुलै २०२० रोजी भारतातील कोट्यावधी लोकांना डिजिटल सहाय्य देण्यासाठी ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं जाहीर केलं. यापैकी तब्बल ३३,७३७ कोटी रुपयांची पहिली गुंतवणूक रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड या कंपनीत करण्याचं गूगलने १६ जुलै २०२० रोजी जाहीर केलं आहे. या बदल्यात गूगलला जिओमध्ये ७.७ टक्के हिस्सेदारी मिळणार आहे. याआधी फेसबुक, सिल्वरलेक, विस्टा, जनरल अटलांटिक, केकेआर. टीपीजी, कॅटरटन, इंटेल आणि क्वालकॉम या कंपन्यांनीही जिओमध्ये गुंतवणूक केली आहे.

एप्रिल २०२० मध्ये फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप विकत घेतल्यावर जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. रिलायन्सने जिओ आणल्यापासून केवळ ४ वर्षात ३८ कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला. चार वर्षात तब्बल २ कोटी ६० लाख लोकांनी आपलं ऑनलाइन प्रेजेंस नोंदवलं. ह्या एवढ्या मोठ्या ग्राहक संख्येची भुरळ कोणालाही पडू शकते. फेसबूकने गुंतवणूक केल्यानंतर गेल्या ३ महिन्यात इंटरनेटचा वापर करणार्‍या प्रत्येक भारतीयाने महिन्याला सरासरी ११ GB चा डेटा वापरला आहे. याचाच अर्थ भविष्यात हा आकडा वाढून फायदा होऊ शकतो. चीनने सर्वच अमेरिकी उत्पादन आणि सेवांना अटकाव केल्यानंतर आशिया खंडात भारत ही एक मोठी बाजारपेठ अशा कंपन्यांना मिळत आहे. भारत सरकारने 5 जी स्पेक्ट्रम जाहीर केल्यावर त्याचा फायदा भारतीय टेलिकॉम कंपन्यांना देऊन त्यांना जीवंत करण्यापेक्षा सर्वच जगाला मुठीत ठेवू पाहणार्‍या रिलायन्स ह्या खाजगी कंपनीला ही संधी दिली. यातून किती आत्मनिर्भरता साधली जाईल हा प्रश्नच आहे.

याशिवाय अशा डिजिटल माध्यमातून खाजगी माहिती उघड होत जाते आणि खाजगी माहितीचे संरक्षण हा कायदा आपल्याकडे नाही किंबहुना त्याची जाण अजून भारतीयांना नाही. अनेक देशात हा कायदा आहे त्यामुळे अशा प्रकारचा व्यवसाय त्या देशात करता येत नाही. यासाठी सुद्धा भारत ही योग्य कर्मभूमी आहे असं अनेक कंपन्यांना वाटल्यास नवल नाही. या सर्व व्यापारातून देशात घृणास्पद विडियो वायरल करू देणारी नुसती डिजिटल नाही तर माणूस म्हणून सुद्धा खरी प्रगती होवो, ही अपेक्षा.

22 

Share


P
Written by
Poorva Shelar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad